Tuesday, 6 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.05.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 06 May 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

पहलगाममधील अतिरेकी हल्ल्यानंतर पंतप्रधानांकडून सुरक्षाविषयक बैठका सातत्याने घेतल्या जात आहेत. आज राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोबाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही बैठक झाली.

****

सुरक्षा यंत्रणांनी अतिरेक्यांची शोध मोहीम वेगाने हाती घेतली आहे. आज जम्मू काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात दोन संशयितांना सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतलं. या दोघांवर अतिरेक्यांना मदत केल्याचा आरोप आहे. त्या दोघांचीही कसून चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, पंजाबमध्ये सुरक्षा दलाने आयएसआयच्या कारवायांचा भांडाफोड केला आहे. पंजाबच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.

****

पाकिस्तानी सैन्याने काल रात्री जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर येथे नियंत्रण रेषेवर अकारण गोळीबार केला. भारतीय लष्कराने या गोळीबाराला योग्य उत्तर दिले असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.

****

उद्या होणाऱ्या नागरी संरक्षण मॉक ड्रिलबाबत केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत बैठक घेत आहेत. नवी दिल्लीत होत असलेल्या या बैठकीला नागरी संरक्षण महासंचालक, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.

गृह मंत्रालयाने देशभरातील २४४ वर्गीकृत नागरी संरक्षण जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण कवायती आणि तालीम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण पातळीवर हा उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे. या मॉक ड्रिलचा मुख्य उद्देश हवाई हल्ल्याची माहिती देणारी प्रणाली, भारतीय हवाई दलाशी हॉटलाइन किंवा रेडिओ कम्युनिकेशन लिंक्सचे ऑपरेशन आणि नियंत्रण कक्षाच्या कामकाजाची प्रभावीता तपासणे आहे. या सरावात शत्रू देशांकडून हल्ला झाल्यास स्वतःचे रक्षण करण्यासाठी नागरी सुरक्षेच्या पैलूंवर नागरिक आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. मॉक ड्रील दरम्यान, ब्लॅकआऊट केला जाणार आहे. या मॉक ड्रीलमध्ये त्या त्या राज्यातील सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी सहभागी होणार आहेत. याशिवाय एनएसएस, एनसीसीच्या कॅडेट्सना देखील यात सहभागी करून घेतले जाणार आहे.

****

नांदेड जिल्ह्यात उद्या आणि परवा वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. ताशी ३० ते ४० किलो मीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवत विभागानं जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात स्मशानभूमी समस्या निवारणासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत स्थानिक ग्रामपंचायत, सरपंच आदींनी प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे. स्वामी यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा सध्या चौथा टप्पा सुरू असून त्यात स्मशानभूमीच्या समस्यांची गावनिहाय माहिती संकलित केली जात आहे. आपल्या गावातील स्मशानभूमीच्या समस्यांची यादी, किंवा स्मशानभूमी नसल्यास त्यासाठी जागेबाबतचा प्रस्ताव, सुविधा नसल्यास त्याबाबत माहिती तहसील कार्यालयात कळवावी, असं आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केलं आहे.

****

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आज राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी अकोल्यात आले आहेत. सकाळी त्यांचं शिवनी विमनतळावर आगमन झालं. प्रशासनातर्फे यावेळी गडकरी यांचं स्वागत करण्यात आलं.

****

कृत्रिम बुद्धीमत्ता-एआयचा वापर करून महाराष्ट्र अन्नधान्य उत्पादनात आणि निर्यातीत जगातील सर्वोत्तम राज्य बनू शकतो, असा विश्वास निती आयोगाच्या फेलो आणि नॅसकॉमच्या माजी अध्यक्षा देबजानी घोष यांनी व्यक्त केला आहे. टेक वारी - महा तंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताह अंतर्गत मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात ‘विकसित महाराष्ट्रासाठी फ्रंटियर तंत्रज्ञान’ या विषयावर त्या आज बोलत होत्या. सध्या जग अन्नधान्याच्या तुटवड्याच्या संकटाला सामोरे जात आहे. महाराष्ट्राकडे तज्ज्ञ, कृषी उपकरणं, प्रशिक्षित कामगार आणि नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याची क्षमता असल्याचं घोष यांनी नमूद केलं.

****

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना आज अभिवादन करण्यात येत आहे. सामाजिक समता प्रस्थापित करणारे, बहुजनांचे तारणहार असलेले शाहू महाराज यांच्या महान विचार आणि कार्याला शतश: प्रणाम, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाहू महाराजांना अभिवादन करताना म्हटलं आहे सामाजिक परिवर्तनाला गती देत समाज विकासात शाहू महाराजाचं योगदान अमूल्य असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाहू महाराजांना अभिवादन करतांना म्हंटलं आहे.

****

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं काल जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीमध्ये भारतीय क्रिकेट संघानं एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये अव्वल स्थान राखलं आहे. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये भारत चौथ्या स्थानी घसरला आहे. ऑस्ट्रेलियानं कसोटी क्रिकेटमध्ये आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. या क्रमवारीत बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडनं दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.

****

No comments: