Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 07 May
2025
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ मे २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
भारतीय लष्कराचा ऑपरेशन
सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधल्या नऊ दहशतवादी तळांवर हल्ला
·
देशभरात आज युद्ध सज्जता
सराव, राज्यात छत्रपती संभाजीनगरसह १६ ठिकाणांचा समावेश
·
पाच हजार ५०३ कोटी
रुपयांच्या मंदीर विकास आराखड्यांना राज्य मंत्रिमंडळाची मान्यता, महिलांच्या
सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबवण्याचा निर्णय
·
येत्या चार महिन्यात
स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुका घेण्याचे सर्वोच्च
न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
·
खेलो इंडिया क्रीडा
स्पर्धेत सायकलिंगमध्ये पुण्याच्या सिद्धेश घोरपडेला सुवर्ण पदक, महाराष्ट्र
१२ पदकांसह तिसऱ्या स्थानी
आणि
·
मराठवाड्यात आज अवकाळी
पावसासह गारपीटीची शक्यता
****
भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत मध्यरात्री
पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधल्या नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला. पहलगाम
दहशतवादी हल्ल्याला भारताने चोख प्रत्यूत्तर दिलं असून, या
हल्ल्याची योजना आखलेल्या तळांवर हा हल्ला केल्याचं, संरक्षण मंत्रालयानं
सांगितलं. कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळाला यात लक्ष्य केलं नाही, असंही
मंत्रालयानं स्पष्ट केलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २५ भारतीय आणि एका नेपाळी
नागरिकाची हत्या करण्यात आली होती. भारत सरकारने आपली कटिबद्धता निश्चित केली
असल्याचंही संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.
दरम्यान, भारतीय लष्कर आज सकाळी दहा वाजता
पत्रकार परिषद घेऊन ऑपरेशन सिंदूरची माहिती देणार आहे.
****
देशभरात आज मॉक ड्रिल म्हणजेच युद्ध सज्जता सराव घेण्यात
येणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधल्या तणावाच्या
पार्श्वभूमीवर युद्धसदृश स्थिती उद्भवण्याची शक्यता गृहीत धरून सुसज्ज राहण्याच्या
उद्देशानं हा सराव होत आहे. देशातल्या २५९ शहरांमध्ये युद्धजन्य मॉकड्रिल घेण्यात
येणार आहे. यासाठी राज्यातल्या १६ ठिकाणांची तीन गटांमध्ये विभागणी करण्यात आली
आहे. पहिल्या गटात मुंबई,
उरण आणि तारापुर, दुसऱ्या गटात ठाणे, पुणे, नाशिक, रोहा-धाटाव-नागोठाणे, मनमाड, सिन्नर, थळ
वायशेत, पिंपरी-चिंचवड,
तर तिसऱ्या गटात छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
या ठिकाणांचा समावेश आहे. हवाई हल्ल्याच्या वेळी वाजवला जाणारा सायरन या
सरावादरम्यान वाजवला जाईल. हल्ला झाल्यास करण्याच्या हालचालींविषयी नागरिकांना, विशेषतः
विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणं, तसंच धोक्याचा इशारा देणारी यंत्रणा, नियंत्रण
कक्ष, इत्यादींची सज्जता तपासून पाहणं हा या सरावाचा भाग आहे.
****
राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्राच्या विकासाकरता पाच हजार
५०३ कोटी ६९ लाख रुपयांच्या विकास आराखड्यांना राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली
आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्तानं
राज्य मंत्रिमंडळाची बैठक काल अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातल्या चौंडी
इथं घेण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.
चौंडी इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळाचं जतन
आणि संवर्धन करण्यासाठी ६८१ कोटी, अष्टविनायक गणपती
मंदिरांचा जिर्णोद्धार - १४७ कोटी, श्री क्षेत्र
तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखडा - एक हजार ८६५ कोटी, श्री क्षेत्र ज्योतीबा मंदिर विकास आराखडा - २५९ कोटी, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर विकास आराखडा - २७५ कोटी, श्री क्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा - एक हजार ४४५ कोटी आणि श्री
क्षेत्र माहुरगड विकास आराखड्यासाठी ८२९ कोटी रुपयांना यावेळी मान्यता देण्यात
आली.
राज्यातल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान
राबवण्याचा निर्णयही मरंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. हे अभियान उत्कृष्टपणे
राबवणार्या ग्रामपंचायतींना आदिशक्ती पुरस्कारही देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात
आला.
अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करणं, मुलींसाठी स्वतंत्र आयटीआय स्थापन करणं, आहिल्यादेवींच्या
जीवनावर बहुभाषिक चित्रपट तयार करणं, धनगर समाजातल्या
विद्यार्थ्यांना नामांकित शाळांना प्रवेश देण्याबाबत यशवंत विद्यार्थी योजना
राबवणं, धनगर समाजातल्या मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी
वसतिगृह योजना सुरू करणं,
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधीकरण अध्यादेश-२०२५ जारी
करणं, आदी निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.
****
विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स विषयक सुधारणा
आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा या तीन बाबींवर आधारित दीडशे दिवसांचा कृती
आराखडा मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केला. शंभर दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा
आणि धोरणात्मक बाबींवर आधारित कार्यक्रमात ७०६ विषयांवर आधारित निर्णय घेऊन आवश्यक
बदल करण्यात आले. दीडशे दिवसांच्या कार्यक्रमाबाबत आज तपशील देणार असल्याचं
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
येत्या चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि
महापालिकांच्या निवडणुका घ्याव्यात, असे आदेश सर्वोच्च
न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. यासंदर्भात काल झालेल्या सुनावणीत
न्यायालयानं,
२०२२ च्या आधी अस्तित्वात असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या
स्थितीनुसारच या निवडणुका घेण्याचे तसंच चार आठवड्यांच्या आत निवडणुकीसंदर्भात
अधिसूचना काढण्याचे आदेश दिले आहेत.
****
सातव्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत काल पुण्याच्या
सिद्धेश घोरपडेनं सायकलिंगच्या स्क्रॅच रेस प्रकारात महाराष्ट्राला सुवर्णपदक
मिळवून दिलं,
तर मुलींच्या गटात जळगावच्या आकांक्षा म्हेत्रे हिनं मेडल
टाइम ट्रायल प्रकारात रौप्य आणि स्क्रॅच रेस प्रकारात कांस्यपदक अशा दोन पदकांची
कमाई केली. मल्लखांब मध्ये सांघिक प्रकारात महाराष्ट्राच्या मुलांनी रौप्य पदक
पटकावलं. या स्पर्धेत तीन सुवर्ण, तीन रौप्यं आणि सहा कांस्य पदकांसह एकूण
१२ पदकांची कमाई करत महाराष्ट्र पदकतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे.
****
राज्यात अनेक भागात कालही अवकाळी पाऊस झाला. छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड,
खुलताबाद, सिल्लोड, सोयगाव तालुक्यात
वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. तसंच गंगापूर तालुक्यातल्या मांजरी इथं गारपीट
झाली.
नाशिक जिल्ह्यात निफाड, पेठ, बागलाण
तालुक्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचं नुकसान झालं. अनेक
ठिकाणी कांदा चाळीवरील पत्रे उडाले. जोरदार वाऱ्यामुळे आंबा पिकाचंदेखील नुकसान
झालं.
****
दरम्यान, पुढचे चार दिवस मराठवाड्यात काही ठिकाणी
मेघगर्जना,
विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह
हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान
केंद्रानं वर्तवली आहे. यामध्ये आज छत्रपती संभाजीनगर, जालना
आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.
****
दरम्यान, राज्यात काल सर्वात जास्त ४१ पूर्णांक
आठ अंश सेल्सिअस तापमान मालेगाव इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात परभणी आणि बीड इथं
सरासरी ४१,
धाराशिव इथं ४० पूर्णांक सहा, तर छत्रपती
संभाजीनगर इथं ३८ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
****
भारताच्या पहिल्या जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन
अर्थात वेव्हज शिखर परिषदेत गौरवण्यात आलेल्या आसावरी बोधनकर जोशी यांचा काल
लातूरच्या दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीनं सत्कार करण्यात आला. त्या या
महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत. भारत की गूंज, या
राष्ट्रीय स्तरावरच्या रिअॅलिटी शोमध्ये आसावरी यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत
स्टार ऑफ द सिझन हा पुरस्कार पटकावला असून, हा बहुमान मिळवणाऱ्या त्या
भारतातल्या पहिल्या कलाकार ठरल्या आहेत.
****
बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या
विविध ठिकाणच्या एकूण पंधरा हजार प्रमाणपत्रांमधली ५० टक्के जन्म प्रमाणपत्र बोगस
असल्याचा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. बीड इथं पोलिस अधीक्षक
नवनीत काँवत यांची भेट घेतल्यानंतर ते काल माध्यमांशी बोलत होते. सोमय्या यांनी
बोगस प्रमाणपत्र संदर्भात बीड जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली.
****
लातूर इथं काल जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण - दिशा
समितीची आढावा बैठक खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार
ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत पार पडली. केंद्र शासनाच्या निधीतून
जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, या
माध्यमातून नागरिकांना दर्जेदार आरोग्य, शैक्षणिक, कृषी
विषयक आणि दळणवळण यासह पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा
सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
****
छत्रपती संभाजीनगर नजीक सातारा परिसरात महावितरणच्या सातारा
उपकेंद्रात १० एमव्हीएचा नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर काल महावितरणचे संचालक अरविंद
भादिकर यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आला. सातारा आणि देवळाई परिसरातल्या
ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने ३३ केव्ही
उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढ केली आहे. यामुळे या परिसरातल्या १२
हजार ग्राहकांना लाभ होणार आहे.
****
जालना शहरातल्या गांधीनगर भागात काल सकाळी मोकाट
कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एका आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. संध्या प्रभूदास
पाटोळे, असं मृत मुलीचं नाव आहे. जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी या घटनेबाबत
दुख:व्यक्त करत महापालिका आयुक्तांशी संवाद साधून मोकाट कुत्र्यांचा तातडीनं
बंदोबस्त करण्याचे निर्देश दिले.
****
छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन जायकवाडी पंपगृहातला वीजपुरवठा तांत्रिक अडचणीमुळे काल काही वेळ बंद
झाल्यामुळे सुमारे साडेपाच तास पाण्याची उचल होऊ शकली नाही. त्यामुळे शहराचा
पाणीपुरवठा काही काळासाठी विस्कळीत होणार असल्याची माहिती, जायकवाडी
पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डी.पी. गायकवाड यांनी दिली आहे.
****
No comments:
Post a Comment