Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 08 May 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ मे २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या धोरणात्मक क्षमतेचं प्रतिक-संरक्षण
मंत्रालयाकडून भूमिका स्पष्ट
·
देशभरात काल युद्ध सज्जता सराव-आपत्कालीन स्थितीत वागणुकीची
प्रात्यक्षिकं सादर
·
राज्यात कार्यालयीन सुधारणांच्या दृष्टीने १५० दिवसांचा
कार्यक्रम मुख्यमंत्र्यांकडून जाहीर
·
ज्येष्ठ अभिनेते-ग्दर्शक माधव वझे यांचं निधन
·
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र १३ सुवर्ण
पदकांसह पहिल्या स्थानावर
आणि
·
क्रिकेटपटू रोहित शर्माची आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून
निवृत्ती जाहीर
****
ऑपरेशन
सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये करण्यात आलेली कारवाई ही संयमी, अचूक आणि
निर्णायक होती, भारताच्या धोरणात्मक क्षमतेचं हे प्रतिक असल्याचं,
संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. भारतीय संरक्षण दलांनी राबवलेल्या ऑपरेशन
सिंदूर विषयी परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, भारतीय लष्कर आणि हवाई
दलाने काल संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी कर्नल सोफिया कुरेशी, हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंह आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री
यांनी या कारवाईमागची भूमिका सांगितली.
ऑपरेशन
सिंदूर अंतर्गत भारतानं पाकिस्तानमधल्या लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद,
हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांचे बहावलपूर, चक आमरू, भिंबेर, मुरीदके,
मुझफ्फराबाद, कोटली, सियालकोट,
गुलपूर आणि बाघ इथले तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानात काही ठिकाणी १००
किलोमीटर आत असलेल्या दहशतवादी तळांनाही लक्ष्य केलं. मध्यरात्री एक वाजून पाच मिनिटं
ते एक वाजून तीस मिनिटांपर्यंत ही कारवाई करण्यात आल्याचं कर्नल कुरेशी यांनी सांगितलं.
त्या म्हणाल्या...
बाईट - कर्नल सोफिया कुरेशी
गेली ३०
वर्षं पाकिस्ताननं पुरवलेल्या पायाभूत सुविधांच्या आधारे इथं दहशतवाद्यांना प्रशिक्षण
दिलं जात होतं. पाकिस्तानच्या कोणत्याही नागरी वस्तीला किंवा लष्करी आस्थापनांना धक्का
न लावता ही मोहीम फत्ते झाल्याचं विक्रम मिस्त्री यांनी सांगितलं. पाकिस्तानचे दहशतवादाशी
लागेबांधे उघड झाल्याचंही मिस्त्री यांनी नमूद केलं.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या
कारवाईची माहिती दिली. या अचूक कारवाईबद्दल पंतप्रधानांनी भारतीय सैन्यदलाची प्रशंसा
केली आहे. दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी अनेक देशांच्या राष्ट्रीय
सुरक्षा सल्लागारांना या कारवाईची माहिती दिली. पाकिस्ताननं काही कारवाई करण्याचा प्रयत्न
केल्यास त्याला भारत चोख उत्तर देईल, असं डोवाल यांनी म्हटलं
आहे.
ऑपरेशन
सिंदूरच्या संदर्भात सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
****
ऑपरेशन
सिंदूरनंतर देशांतर्गत अनेक विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. जम्मू, श्रीनगर,
लेह, जोधपूर, अमृतसर,
भुज, जामनगर, चंदीगड आणि
राजकोटला जाणारी विमानं या महिन्याच्या १० तारखेपर्यंत रद्द करण्यात आल्याची माहिती
एअर इंडियानं दिली आहे.
****
भारतीय
संरक्षण दलानं राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' चं केंद्रीय गृहमंत्री अमित
शहा, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, माजी
संरक्षण मंत्री शरद पवार यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी कौतुक केलं आहे.
लोकसभेचे
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्याला भारतीय लष्कराचा अभिमान असल्याचं म्हटलं
आहे. तर, दहशतवादाविरोधात कोणतीही निर्णायक कारवाई करण्यासाठी लष्कर आणि
सरकारच्या पाठीशी आपला पक्ष ठामपणे उभा असल्याचं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे
यांनी म्हटलं आहे.
**
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईच्या नावामधूनच याबाबतचं गांभीर्य स्पष्ट होतं, असं म्हटलं
असून, लष्करानं या कारवाईचं चित्रिकरणच उपलब्ध करून दिल्यामुळे
या कारवाईबाबत कोणी शंका उपस्थित करू शकणार नाही, असं म्हटलं
आहे.
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
आणीबाणीच्या
प्रसंगाला तोंड देण्याची तयारी तपासण्याच्या आणि वाढवण्याच्या उद्देशानं देशभरात काल
मॉक ड्रिल म्हणजेच युद्ध सज्जता सराव घेण्यात आला. यावेळी हवाई हल्ल्याची सूचना देणारे
भोंगे वाजवण्यात आले आणि या सूचनेनंतर सुरक्षेसाठी कसं वागावं, याची प्रात्यक्षिकं
करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल घेण्यात आली. खासदार
डॉ. भागवत कराड यावेळी उपस्थित होते.
****
केंद्रीय
सामाजिक न्याय मंत्री डॉ. विरेंद्र कुमार आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
येत आहेत. नमस्ते योजनेच्या लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड आणि पीपीई किट वाटप त्यांच्या
हस्ते होणार आहे.
****
छत्तीसगढच्या
बीजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत २६ नक्षलवादी ठार झाले. यामध्ये
चार महिलांचा समावेश आहे. तेलंगणा आणि छत्तीसगढच्या सीमेवर असलेल्या कारेगुट्टा परिसरात
ही कारवाई करण्यात आली.
****
राज्यात
कार्यालयीन सुधारणांच्या दृष्टीने १५० दिवसांचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी काल जाहीर केला. ते काल मंत्रालयात बोलत होते. या उपक्रमांतर्गतच 'विकसित भारत
२०४७' च्या धर्तीवर 'विकसित महाराष्ट्र
२०४७' चे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचे
निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. आगामी १५० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कामकाजाचा
निकाल दोन ऑक्टोबर रोजी घोषित केला जाणार आहे. या कार्यक्रमात, सर्वोत्तम जिल्हाधिकारी गटात नांदेडचे राहुल कर्डिले यांचा, तर सर्वोत्तम पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक गटात नांदेडचे पोलिस महानिरीक्षक
शहाजी उमाप यांचा सत्कार करण्यात आला.
****
ज्येष्ठ
अभिनेते, दिग्दर्शक माधव वझे यांचं काल निधन झालं, ते ८६ वर्षांचे होते. श्यामची आई या चित्रपटात माधव वझे यांनी साकारलेली
"श्याम"ची प्रमुख भूमिका खूप गाजली होती. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा
पहिला सुवर्ण कमळ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला होता. डिअर जिंदगी,
थ्री इडियट्स या हिंदी चित्रपटांमध्ये ही त्यांनी भूमिका केल्या होत्या.
****
बिहारमध्ये
सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र १३ सुवर्ण पदकांसह पहिल्या
स्थानावर आहे. काल या स्पर्धेत नेमबाजीत महाराष्ट्राच्या वेदांत नितीन याने ५० मीटर
थ्री पोजीशन्स राइफल प्रकारात, तिरंदाजीत उज्ज्वल ओळेकर आणि श्रावणी
शेंडे यांनी सुवर्ण पदक पटकावलं तर वैष्णवी पवारनं रौप्य पदक जिंकलं.
****
क्रिकेटपटू
रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने काल
सामाजिक माध्यमावरुन ही माहिती दिली. कसोटी क्रिकेटमध्ये देशाचं नेतृत्त्व करणं हा
सन्मान असून, एकदिवसीय सामन्यांमध्ये यापुढेही देशाचं प्रतिनिधीत्व करत राहीन,
असं त्याने या संदेशात म्हटलं आहे. रोहितने २०१३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या
कसोटी पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावलं होतं. त्याने ६७ कसोटी सामन्यांमध्ये
४० पूर्णांक ५७ च्या सरासरीने १२ शतकं आणि १८ अर्धशतकांसह चार हजार ३०१ धावा केल्या
आहेत.
****
श्रीलंकेत
सुरु असलेल्या महिलांच्या तिरंगी क्रिकेट एकदिवसीय मालिकेत काल भारतानं दक्षिण अफ्रिका
संघाचा २३ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारतानं नऊ बाद ३३७ धावा केल्या.
प्रत्युत्तरात दक्षिण अफ्रिकेचा संघ सात बाद २१४ धावाच करू शकला. या स्पर्धेचा
अंतिम सामना रविवारी भारत आणि यजमान श्रीलंका संघात होणार आहे.
****
विना अपघात
सेवा बजावणाऱ्या एसटीच्या चालकांना दरवर्षी रोख रक्कम देऊन गौरवण्यात येणार आहे. परिवहन
मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. राज्यातल्या
२०४ बस स्थानकावर एटीएम केंद्रं सुरू करणार असून, दुर्गम भागातल्या
आदिवासी पाड्यांपर्यंत बससेवा पुरवण्याकरता शंभर मिनी बसेस खरेदी करणार असल्याची माहितीही
सरनाईक यांनी दिली.
****
"टेक वारी: महाराष्ट्र टेक
लर्निंग वीक" याअंतर्गत काल ‘सायबर सुरक्षा’ विषयावर नॅस्कॉमचे अधिकारी
प्रसाद देवरे यांनी मार्गदर्शन केलं. सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर
सर्वसामान्य नागरिकांनी अधिक सजग राहावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
संवाद मराठवाड्याशी"
या उपक्रमातंर्गत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी काल वेबिनारच्या माध्यमातून दिव्यांगांशी
संवाद साधला. छत्रपती संभाजीनगर विभागातल्या दिव्यांग बांधवांच्या प्रलबिंत अडचणी सोडवण्यासाठी
संबंधित जिल्हा प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
****
छत्रपती
संभाजीनगर इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीने विनापरवानगी झाडं तोडल्याप्रकरणी महानगरपालिकेच्या
उद्यान विभागानं चार लाख २५ हजार रुपयांचा दंड आकारला आहे. त्याचबरोबर १८५ नवीन रोपांची
लागवड करण्याचे निर्देश देखील दिले आहेत.
****
राज्यात
काल अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे तापमानात काही प्रमाणात घट झाली
आहे. छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात काल दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. या
पावसात शहरातल्या सेवा योजना कार्यालयासमोर राजु चित्ते यांच्या कारवर झाड कोसळून त्यांचा
मृत्यू झाला.
राज्यात
काल सर्वाधिक ४० पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. धाराशिव
इथं ४०, परभणी ३८, तर छत्रपती संभाजीनगर इथं ३६ पूर्णांक
पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
मराठवाडा
आणि विदर्भात आज काही ठिकाणी वादळी वार्यासह पाऊस आणि गारपीटीची शक्यता हवामान विभागाने
वर्तवली आहे.
****
No comments:
Post a Comment