Friday, 9 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 09.05.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 09 May 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      पाकिस्तानकडून भारतातल्या अनेक शहरांवर झालेले हल्ले सुरक्षा यंत्रणेकडून निष्क्रिय-पाकिस्तानात लाहोरसह काही ठिकाणची हवाई संरक्षण रडार प्रणाली भारतीय हल्ल्यात नष्ट 

·      ऑपरेशन सिंदूरला सर्वपक्षीय बैठकीत एकमतानं समर्थन- भारतीय सैन्यदलाचं अभिनंदन

·      छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार

·      सफाई कर्मचाऱ्यांना सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध

आणि

·      खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र ५५ पदकांसह पहिल्या स्थानावर कायम

****

पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून भारतातल्या अनेक शहरांवर केलेले हल्ले सुरक्षा यंत्रणेने निष्क्रिय केले आहेत. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री तसंच कर्नल सोफिया कुरैशी यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सात आणि आठ मे दरम्यानच्या रात्री भारताच्या उत्तर आणि पश्चिम सीमेवरच्या सैन्य तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आला, मात्र इंटिग्रेटेड काउंटर यूएएस ग्रीड आणि हवाई संरक्षण प्रणालींद्वारे हे हल्ले निष्क्रिय केले गेले. या हल्ल्यांतल्या क्षेपणास्त्रांचे अवशेष अनेक ठिकाणांहून सापडत आहेत, जे पाकिस्तानी हल्ल्यांचे पुरावे असल्याचं, कर्नल कुरैशी यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या...

बाईट - कर्नल सोफिया कुरैशी

 

दरम्यान, जम्मू काश्मीरवर काल रात्री पाकिस्तानने केलेले क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले देखील भारताने हाणून पाडल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. पंजाब, राजस्थान आणि गुजरातमधल्या सीमावर्ती शहरांवरही पाकिस्तानकडून कालही हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला.

 

भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधल्या लाहोरसह काही ठिकाणची हवाई संरक्षण रडार आणि प्रणाली नष्ट केली आहे. पंजाबमध्ये फिरोजपूर इथं घुसखोरी करणारा एक पाकिस्तानी नागरिक ठार झाल्याचं सीमा सुरक्षा दलानं सांगितलं. सीमा सुरक्षा दलाने जम्मू काश्मीरमधल्या सांबा जिल्ह्यात घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला.

****

दरम्यान, पाकिस्तानच्या हल्ल्यामुळे राजस्थान, पंजाब, जम्मू काश्मीर, चंदीगढ, हिमाचल प्रदेशसह काही राज्यांमध्ये विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. देशभरातले विमानतळ बंद केल्याच्या वृत्ताचं मात्र नागरी उड्डयन मंत्रालयानं खंडन केलं आहे. 

****

ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातले दहशतवादी तळ उध्वस्त केल्याबद्दल सर्व पक्षांनी भारतीय सैन्याचं अभिनंदन करून या कारवाईचं एकमतानं समर्थन केलं आहे. काल नवी दिल्लीत संसद भवनात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली, विविध पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी माध्यमांशी बोलतांना, अधिक माहिती दिली...

बाईट - संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू

 

दहशतवादाविरोधातल्या लढाईत सर्व राजकीय पक्ष सरकारसोबत असल्याची ग्वाही उपस्थित नेत्यांनी बैठकीत दिली. या परिस्थितीत आपण सर्वजण सरकारसोबत असल्याची भावना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केली, ते म्हणाले...

बाईट - काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे

****

ओटीटी प्लॅटफॉर्मवरून पाकिस्तानी कार्यक्रम प्रसारित करण्यास सरकारनं मनाई केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं याबाबतचं पत्र काल जारी केलं. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित कोणतीही अधिक माहिती, छायाचित्रं किंवा चित्रफिती असल्यास नागरिकांनी, ९६ ५४ ९५ ८८ १६ या मोबाईल क्रमांकावर किंवा ०११ - २४ ३६ ८८ ०० या लँडलाईन क्रमांकावर एनआयएशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन बियाणे प्रकारांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी २९ मे ते १२ जून दरम्यान 'विकासित कृषी संकल्प अभियान' ही देशव्यापी मोहीम राबवली जाणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली. या मोहिमेअंतर्गत, देशभरातल्या ७०० जिल्ह्यांमधल्या सुमारे दिड कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचं उद्दीष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

महाराष्ट्राचं आर्थिक आरोग्य अतिशय उत्तम असून त्याची वित्तीय तूटही कमी असल्याची माहिती सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया यांनी दिली. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासासाठी पन्नास हजार कोटी रुपयांचं विशेष वाटप करण्याची विनंती राज्य सरकारने केल्याचं, पनगढिया यांनी सांगितलं.

****

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट होणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर ही माहिती दिली. मराठी भाषेचा राष्ट्रीय शैक्षणिक पातळीवर समावेश करण्याची मागणीही प्रधान यांच्याकडे केली असून, त्यांनी यास सकारात्मक प्रतिसाद देत, योग्य कार्यवाहीचं आश्वासन दिल्याची माहिती भुसे यांनी दिली.

****

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी डॉ. आनंदीबाई जोशी आरोग्य शिबिर घेतलं जातं, या वर्षापासून त्यांच्या कुटुंबाची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येईल, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. त्या काल नाशिक इथं एका कार्यक्रमात बोलत होत्या. 

****

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बीड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सकाळी सव्वा अकरा वाजता ते छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून हेलीकॉप्टरने बीडकडे प्रयाण करतील, तारकेश्वर गडाचे संस्थापक नारायण महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवाला ते उपस्थित राहणार आहेत. दुपारी एक वाजता शिंदे हेलिकॉप्टरने पुण्याकडे प्रयाण करतील.

****

अमेरिकेचे रॉबर्ट फ्रांसिस प्रिवोस्ट यांची नवे पोप म्हणून निवड झाली आहे. कॅथोलिक चर्चच्या इतिहासात पोप बनलेले ते पहिले अमेरिकन आहेत. पोप लियो चौदावे या नावाने ते ओळखले जातील.

****

यांत्रिकीकृत स्वच्छतेसाठी राष्ट्रीय कृती योजना - नमस्ते योजनेच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांना प्रतिष्ठा प्रदान करून सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री वीरेंद्र कुमार यांनी म्हटलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या कार्यक्रमात बोलत होते. नॅशनल ॲक्शन फॉर मेकॅनाईज्ड सॅनिटेशन इकोसिस्टीम ही योजना पुढील तीन वर्षात देशातल्या सर्व चार हजार आठशेपेक्षा अधिक नागरी स्वराज्य संस्थांमध्ये लागू केली जाणार आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात वीरेंद्र कुमार हस्ते पाच कामगारांना आयुष्मान कार्डचं तसंच १६ सफाई कामगारांना PPE कीटचं वितरण करण्यात आलं. स्वच्छता उद्यमी योजनेअंतर्गत कर्ज मंजूर पत्रंही यावेळी प्रदान करण्यात आली. विरेंद्र कुमार यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला सांडपाणी व्यवस्थापनातील अद्ययावत ERSU कीटचं हस्तांतरण करण्यात आलं.

केंद्र शासनाने विमुक्त भटक्या जमातीतील गरजू कुटुंबाना विविध योजनांचा लाभ देण्याच्या उद्देशाने डीएनटी युनिट्सच्या सक्षमीकरणासाठी एक छत्री योजना तयार केली आहे, या अंतर्गत येत्या पाच वर्षांत अंदाजे २०० कोटी रुपये खर्च करून शैक्षणिक सक्षमीकरण, आरोग्य उपजीविका, आणि गृहनिर्माण यावर भर दिला जाणार असल्याचं कुमार यांनी सांगितलं. ते काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तिसगाव इथं या योजनेसंदर्भातल्या बैठकीत बोलत होते.

****

बिहारमध्ये सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र ५५ पदकांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. यात २१ सुवर्ण, १८ रौप्य पदकांचा समावेश आहे. राजस्थान दुसऱ्या, तर कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे. राज्यातल्या जलतरणपटूंनी आतापर्यंत सहा सुवर्ण पदकं जिंकली आहेत.

****

तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा कालबद्ध कृती कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिले आहेत. मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. तुळजापूर शहर आणि परिसराचा कायापालट करण्यासाठी एक हजार ८६६ कोटींच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. आता त्यासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम तयार करणं अत्यावश्यक असून,  पुढील तीन वर्षाचा हा विकास आराखडा पूर्ण करण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याची सूचना आमदार पाटील यांनी केली.

****

बीड, परभणी तसंच लातूर जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये आज ‘सस्ती अदालत’ हा उपक्रम राबवला जाणार आहे. महिन्यातल्या दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी ही अदालत होणार असून शेतरस्ते, पांदण रस्त्याबाबत तक्रारी असलेल्या शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे

****

मुंबईसह राज्याच्या विविध भागात कालही पाऊस झाला. रायगड तसंच रत्नागिरी जिल्ह्यात या पावसाने आंबा पिकाचं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे. अकोला जिल्ह्यातल्या पणज परिसरात केळी पिकाला या वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका बसला तर नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे डाळिंब, टोमॅटो आणि कांदा पिकासह कुक्कुट पालन केंद्रांचंही नुकसान झालं आहे.

दरम्यान, राज्यात काल सर्वाधिक ४० अंश सेल्सिअस तापमान ब्रह्मपुरी इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ३४ पूर्णांक दोन, परभणी ३७, तर बीड इथं ३७ पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

****

No comments: