Friday, 9 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 09.05.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 09 May 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ०९ मे २०२ सकाळी .०० वाजता.

****

पाकिस्तानकडून आज पुन्हा ड्रोन हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन चंदीगढमध्ये सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. नागरीकांना घरातच राहण्याची सूचना हवाई दलानं केली आहे.

दरम्यान, पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरमधल्या सतवारी, सांबा, आरएसपुरा आणि आर्निया भागात आठ क्षेपणास्त्र सोडली. मात्र भारतीय संरक्षण दलांनी सर्व क्षेपणास्त्र निकामी केल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. सीमा सुरक्षा दलानं जम्मू काश्मीरमधल्या आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या सांबा भागात घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडला.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकट उद्भवलं असून, अनेक देशांकडे त्यांनी कर्जाची मागणी केल्याचं याबाबातच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सीमा रक्षण दलांच्या महासंचालकांशी संवाद साधून सीमावर्ती परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सीआयएसएफच्या महासंचालकांशीही चर्चा करून विमानतळ सुरक्षेबाबत माहिती घेतली.

****

परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी काल संध्याकाळी अमेरिकीचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी चर्चा केली. भारतानं सीमेपलीकडील दहशतवादाला लक्ष्यित आणि संतुलित प्रत्युत्तर दिलं असल्याचं त्यांनी यावेळी अधोरेखित केलं. जयशंकर यांनी काल युरोपीय महासंघाच्या परराष्ट्र आणि सुरक्षा धोरण विभागाचे वरिष्ठ प्रतिनिधी काजा कल्लास तसंच इटलीचे परराष्ट्र मंत्री एंटोनिओ ताजानी यांच्याशीही सध्या सुरू असलेल्या घडामोडींबद्दल चर्चा केली. पाकिस्तानसोबतच्या कोणत्याही तणावाला कडक प्रतिसाद दिला जाईल, असंही त्यांनी नमूद केलं.

****

दरम्यान, पाकिस्तानच्या या हल्ल्यामुळे राजस्थान, पंजाब, जम्मू काश्मीर, चंदीगढ, हिमाचल प्रदेशसह काही राज्यांमध्ये विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. देशभरातले विमानतळ बंद केल्याच्या वृत्ताचं मात्र नागरी उड्डयन मंत्रालयानं खंडन केलं आहे. 

****

माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं देशातले सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म, मीडिया स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यांच्यासाठी अधिकृत सूचना जारी केल्या आहेत. राष्ट्रीय सुरक्षा जपण्याच्या दृष्टीनं या प्लॅटफॉर्म्सवर कोणत्याही प्रकारची पाकिस्तानी आशय सामुग्री प्रसारित केली जाऊ नये, असं प्रसारण तात्काळ बंद करावं, असे निर्देश दिले आहेत. यात वेब सीरिज, चित्रपट, गाणी, पॉडकास्ट यांचा समावेश आहे.

****

सायबर सुरक्षेसाठी देशातल्या अत्याधुनिक सुविधा महाराष्ट्रात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र सायबरच्या आर्टिफिशियल इंटिलिजन्स बॉट आणि सायबर जागरुकता माहितीपटाचं अनावरण काल मुंबईत झालं; त्यावेळी ते बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित हा चॅटबॉट महाराष्ट्र सायबरच्या १ ९ ४ ५ या हेल्पलाईनशी जोडला असून, सायबर गुन्ह्याबबत तक्रार कशी करावी, यासंबंधीची माहिती या चॅटबॉटमध्ये मिळणार आहे.

****

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था - आयटीआयच्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहेत. आपत्ती व्यवस्थापन ही काळाची गरज असून याचं प्रशिक्षण प्रत्येक नागरिकाने घेतलं पाहिजे, असं कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सांगितलं. आयटीआय मध्ये सहा नवे अभ्यासक्रम लागू करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. यात कृत्रिम बुद्धिमत्ता, इलेक्ट्रिक वाहन व्यवस्थापन, इंडस्ट्रिअल रोबोटिक्स आणि थ्री डी प्रिंटिंग, ड्रोन तंत्रज्ञान, सोलर टेक्निशियन या अभ्यासक्रमांचा समावेश असून येत्या शैक्षणिक वर्षापासूनच याची सुरुवात होणार आहे.

****

२००८ च्या मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेचं विशेष न्यायालय ३१ जुलै रोजी निकाल देण्यात येणार आहे. १९ एप्रिलला सुनावणी झाल्यानंतर न्यायालयानं हा निकाल राखून ठेवला होता. या प्रकरणाची सुनावणी एप्रिलमधेच पूर्ण झाली आहे, मात्र अंतिम निकाल देण्याआधी सर्व कागदपत्रं तपासणं गरजेचं असल्याचं न्यायालयानं सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महावितरणच्या धडक मोहिमेत तीसगावातील खवडा डोंगर परिसरात अनेक ठिकाणी लघुदाब विद्युत वाहिनीवर आकडे टाकून वीजचोरी केल्याचे प्रकार उघड झाले. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात ४७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या सर्वांनी मिळून चार लाख १५ हजार २६९ रुपयांची २० हजार ७८४ युनिट वीजचोरी केली.        

****

बिहारमध्ये सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र ५५ पदकांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. यामध्ये २१ सुवर्ण, १८ रौप्य आणि १६ कांस्य पदकांचा समावेश आहे. काल संपलेल्या सायकलिंग आणि मल्‍लखांब स्‍पर्धेची महाराष्ट्राने सुवर्ण सांगता केली. राज्याने सायकलिंग स्‍पर्धेत तीन सुवर्णांसह सहा पदकं, मल्‍लखांब स्‍पर्धेत दोन सुवर्णांसह नऊ पदकं, तर जलतरणात राज्याने सर्वाधिक १९ पदकं जिंकली. सायकलिंगमध्ये पुण्याच्या सिद्धेश घोरपडेने, पुण्याच्या शांभवी क्षीरसागर हिने नेमबाजीत दहा मीटर एअर रायफलमध्ये, तर मल्लखांबमध्ये साताऱ्याच्या आर्या साळुंखे यांनी सुवर्ण पदक जिंकलं.

****

No comments: