Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 10 May 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० मे २०२५ दुपारी १.०० वा.
****
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर
पाकिस्तान सातत्यानं चिथावणीखोर कारवाया करत असल्याचं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री
यांनी सांगितलं. आज सकाळी परराष्ट्र मंत्रालयानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी
सीमेवरील स्थितीची माहिती दिली. पश्चिम सीमेवर पाकिस्तानच्या आक्रमक कारवाया सुरूच
आहेत. पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारतानं जबाबदारीनं प्रत्युत्तर दिल्याचंही त्यांनी
स्पष्ट केलं. पाकिस्तानी लष्कर नियंत्रण रेषेकडे चाल करून येत आहे. पाकिस्तानी सैन्याची
ही चाल दोन्ही देशातील संघर्ष चिघळवणारी आहे. पाकिस्तान सैन्यानं कोणतीही आगळीक केल्यास
त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असंही या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलं.
लष्कराच्या प्रवक्त्या कर्नल सोफिया
कुरेशी म्हणाल्या की, पाकिस्ताननं
वैद्यकीय केंद्र आणि शाळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्यानं प्रत्युत्तरादाखल
केलेल्या कारवाईत पाकिस्तानचं मोठं नुकसान केलं आहे. पाकिस्तान सातत्यानं खोट्या बातम्या
पसरवित असल्याचंही त्या म्हणाल्या. सिरसा विमानतळाचं नुकसान केल्याचा पाकिस्तानचा दावा
पूर्णतः खोटा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
****
भारतीय सैन्यानं जम्मूजवळील पाकिस्तानी
चौक्या आणि दहशतवादी लाँच पॅड उद्ध्वस्त केले आहेत. येथून ट्यूब लाँच ड्रोन सोडले जात
होते. आज पहाटे पाच वाजता अमृतसरमधील खासा कॅन्टवर शत्रूचे अनेक सशस्त्र ड्रोन दिसल्याचं
लष्करानं सांगितलं. भारताच्या पश्चिम सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रास्त्रांसह ड्रोन
हल्ले सुरूच आहेत. भारताच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करण्याचा आणि नागरिकांचा जीव धोक्यात घालण्याचा पाकिस्तानचा
प्रयत्न अस्वीकार्य असल्याचं लष्करानं म्हटलं आहे.
***
भारतीय सैन्यानं बारामुल्ला ते भुज
पर्यंतच्या २६ ठिकाणी आंतरराष्ट्रीय सीमा आणि पाकिस्तानशी असलेल्या नियंत्रण रेषेवर
ड्रोन हल्ले उधळून लावले आहेत. निवासी आणि लष्करी ठिकाणांना धोका ठरू शकणाऱ्या ड्रोनचाही
यामध्ये समावेश आहे. संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामुल्ला, श्रीनगर,
अवंतीपुरा, नागरोटा, जम्मू,
फिरोजपूर, पठाणकोट, फाजिल्का,
लालगढ जट्टा, जैसलमेर, बारमेर,
भुज, कुआरबेट आणि लाखी नाला या भागांमध्ये हे ड्रोन
हल्ले उधळून लावण्यात आले.
पंजाबच्या फिरोजपूर, अमृतसर आणि पठाणकोटसह सीमावर्ती जिल्ह्यांवर
पाकिस्तानकडून सशस्त्र ड्रोनद्वारे हल्ला करण्याचे प्रयत्न झाले आहेत, परंतु भारतीय सुरक्षा दलांनी हे प्रयत्न हाणून पाडले. तथापि, फिरोजपूरमध्ये ड्रोनने एका घराचे नुकसान झाले आहे. यात तीन नागरिक जखमी झाले
आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. फिरोजपूरचे
पोलिस प्रमुख भूपेंद्रक सिंग सिद्धू म्हणाले की, ड्रोनमुळे नुकसान
झाल्याची ही एकच घटना आहे. लष्कराने बाकी सर्व ड्रोन हल्ले निष्क्रिय केले आहेत.
***
भारत-पाकिस्तान तणावाच्या परिस्थितीत
नागरिकांनी खातरजमा करुनच संदेश सामायिक करावे, असं आवाहन सरकारनं केलं आहे. देशातले एटीएम
पुढील दोन - तीन दिवस बंद राहणार असल्याचं वृत्तही निराधार असल्याचं पत्र सूचना कार्यलयानं
स्पष्ट केलं आहे. दरम्यान, नागरिकांना एखाद्या बातमीबाबत किंवा
संदेशाबाबत खातरजमा करायची असल्यास पत्र सूचना कार्यालयाच्या 8799711259 या क्रमांकावर किंवा socialmedia@pib.gov.in या ईमेलवर
संपर्क साधण्याचं आवाहन सरकारनं केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन
आपत्तकालीन परिस्थितीसाठी सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
जिल्ह्यात आज सायंकाळी पैठण इथं आणि छत्रपती संभाजीनगर शहरात उद्या रविवारी मॉक ड्रिल
घेण्यात येणार आहे.
बाईट - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
****
भारत-पाकिस्तान सीमेनजिक असलेल्या
राजस्थानच्या जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्यांनंतर अतीदक्षतेचा इशारा देण्यात
आला आहे. आज सकाळी बाडमेर, जैसलमेर
आणि बालोतराच्या अनेक भागात हल्ले झाले असून अनेक ठिकाणी ड्रोनचे तुकडे आणि क्षेपणास्त्रसदृश्य
अवशेषही आढळले आहेत.
****
No comments:
Post a Comment