Sunday, 11 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.05.2025 रोजीचे सायंकाळी 05.20 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 11 May 2025

Time 17.20 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ११ मे २०२५ सायंकाळी ५.२०

****

·      पंतप्रधानांकडून युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय बैठकीत परिस्थितीचा आढावा

·      युद्धविराम आणि हवाई हद्दीच्या उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम सिमेवरील सैन्य दलांना चोख प्रत्युत्तराचे पूर्ण अधिकार

·      सिंधूदुर्ग जिल्ह्यात मालवणमध्ये शिवसृष्टी उभारणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आणि

·      खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत ७४ पदकांसह महाराष्ट्र अव्वल स्थानावर

****

पाकिस्तानबरोबर शस्त्रसंधी जाहीर केल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतल्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक घेतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच

तिन्ही सेनादलांचे प्रमुख बैठकीला उपस्थित होते. युद्ध विरामाच्या घोषणेनंतर पंतप्रधानांनी काल घेतलेल्या बैठकीला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर सुब्रह्मण्यम जयशंकर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, आणि तिन्ही सेनादलांचे प्रमुख उपस्थित होते. भारतानं पाकिस्तानच्या कुरापतींना प्रत्युत्तर देण्यासाठी सुरु केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. कोणत्याही दहशतवादी कृत्याला देशाविरुद्ध युद्धाची कृती मानून त्याला प्रत्युत्तर देण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे.

****

दहा आणि अकरा मे च्या रात्री झालेल्या युद्धविराम आणि हवाई हद्दीच्या उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पश्चिम सीमेवरील लष्करी कमांडरसोबत आज सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. डीजीएमओ चर्चेत झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या बाबतीत लष्करी कमांडर्सना चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कर प्रमुखांनी पूर्ण अधिकार दिले आहेत.

****

ऑपरेशन सिंदूर ही केवळ लष्करी कारवाई नाही तर भारताच्या राजकीय, सामाजिक आणि धोरणात्मक इच्छाशक्तीचं प्रतिक असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. त्यांनी आज लखनऊमध्ये ब्रह्मोस एरोस्पेस एकीकरण आणि परीक्षण सुविधेचं दुरदृष्य प्रणाली द्वारे उद्घाटन केलं.  ते म्हणाले...

बाईट - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

****

भारत आणि पाकिस्ताननं परस्परांविरोधातली लष्करी कारवाई थांबवून शस्त्रसंधी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं काल संध्याकाळी पाच वाजल्यापासून जमीन, हवाई आणि समुद्री मार्गांनी सुरू असलेले हल्ले आणि सैनिकी करवाया थांबवण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी यांनी काल निवेदनाद्वारे दिली. मात्र, पाकिस्ताननं काल झालेल्या शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, भारतानं याची गंभीर दखल घेतली असून सशस्त्र दलं त्यावर पुरेसा आणि योग्य प्रतिसाद देत आहेत. दरम्यान, सीमावर्ती भागात आज शांतता असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे.

****

भारत पाकिस्तान दरम्यान युद्धविराम करण्याच्या निर्णयाचं जगभरातल्या देशांनी स्वागत केलं आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी युद्धविरामाचं स्वागत केलं असून उभय देशांनी विकासावर भर द्यावा असं आवाहन केलं आहे. हा करार शाश्वत शांततेसाठी योगदान देईल आणि या दोन देशांमधील व्यापक, दीर्घकालीन समस्यांवर चर्चा करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करेल अशी गुटेरस यांना आशा असल्याचं त्यांचे प्रवक्ते स्टेफान डुजारिक यांनी सांगितलं. युरोपीय संघाचे परराष्ट्रव्यवहार प्रमुख काजा कल्लास यांनी शस्त्रसंधीचं महत्त्व अधोरेखित करुन त्याच्या पालनाबाबत सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली आहे. शांततेसाठी उचलेल्या पावलांचं स्वागत करीत यूनायटेड किंगडमनं युद्धविरामाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

****

भारत-पाकिस्तान दरम्यान युद्धविरामाच्या घोषणेनंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या दरम्यान काल रात्री दूरध्वनीवरून चर्चा झाली. या चर्चेत ऑपरेशन सिंदूर हा मुख्य विषय होता. भारताला युद्ध नको होतं, मात्र दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देणं गरजेचं असल्याचं डोवाल या चर्चेत म्हणाले.

****

भारतीय हवाई दलानं ऑपरेशन सिंदूरमधे सोपवलेली कामगिरी सफाईनं आणि नेमकेपणानं राष्ट्रीय उद्दिष्टांनुसार पूर्ण केली आहे. अद्याप ही कारवाई सुरु असल्यानं

त्याबाबतची तपशीलवार माहिती यथावकाश प्रसिद्ध केली जाईल असं भारतीय हवाईदलाच्या सूत्रांनी सांगितलं. यासंदर्भात अधिक तर्क लढवू नये तसंच अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन हवाईदलानं केलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी सामाजिक संपर्क माध्यमावरून दिलेल्या संदेशात आपल्या शास्त्रज्ञांप्रती अभिमान आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे तसंच १९९८ मधल्या पोखरण चाचणीची आठवण करून दिली आहे. त्यांनी विज्ञान आणि संशोधनाच्या माध्यमातून भावी पिढ्यांना सक्षम करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार देखील केला आहे. हा दिवस आपल्या शास्त्रज्ञांविषयी अभिमान आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे आणि पोखरण चाचणी आठवण्याचा आहे. त्या घटना आपल्या देशाच्या विकासप्रवासात प्रामुख्यानं आत्मनिर्भरतेच्या दिशेने मैलाचा दगड ठरल्या आहेत, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

****

सिंधूदूर्ग जिल्ह्यातल्या मालवणमधील राजकोट इथं उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची भव्यता आणखी वाढवण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. त्यांनी या पुतळ्याचं पूजन केलं, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले...

बाईट -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात शिवसृष्टी उभारण्याचं काम लवकर सुरू होईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

****

चीनमधील शांघाय इथं आज धनुर्विद्या विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात दीपिका कुमारी आणि पार्थ साळुंखे यांनी कांस्यपदक जिंकली. भारतानं या स्पर्धेत सात पदकं  पटकवली. दीपिकानं कोरियाच्या कांग चाययुंगचा ७-३ असा पराभव केला. तिच्या विजयानं महिला रिकर्व्ह प्रकारात भारतानं या वर्षातलं पहिलं पदक पटकावलं. तर, २१ वर्षांखालील जागतिक विजेत्या पार्थ साळुंखेनं पुरुषांच्या रिकर्व्ह प्रकारात आपलं पहिलं विश्वचषक पदक जिंकलं. भारतानं या स्पर्धेत दोन सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्य पदकं जिंकली आहेत.

****

खेलो इंडिया युवा क्रीडास्पर्धांमध्ये महाराष्ट्रानं सुरेख कामगिरी बजावताना पदक तालिकेतलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. राज्यातल्या खेळाडुंनी आतापर्यंत २७ सुवर्ण आणि २२ रौप्य पदकांसह ७४ पदकं जिंकली आहेत. कर्नाटक १४ सुवर्ण आणि १९ रौप्य पदकांसह ३९ पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे तर राजस्थान पदक तालिकेत तिसऱ्या स्थानावर कायम आहे.

****

श्रीलंकेनं भारताविरुद्ध तिरंगी एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या विजेतेपदाच्या सामन्यात षटकांत सात बाद १९७ धावा केल्या आहेत. भारतानं श्रीलंकेसमोर विजयासाठी ३४३ धावांचं कठीण लक्ष्य ठेवलं आहे. कोलंबो इथं सुरू असलेल्या या सामन्यात स्म्रिती मंधनानं १०१ चेंडूंत १५ चौकार आणि दोन षटकारांसह शतक झळकवताना ११६ धावा केल्या. शिवाय हरलीन देवलनं ४७, जेमीमा रॉड्रीग्ज ४४ आणि हरमनप्रित कौरनं ४१ धावा केल्यामुळं भारतीय संघानं निर्धारित ५० षटकांत सात बाद ३४२ धावांची मोठी धावसंख्या उभारली. भारतानं या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारत आणि श्रीलंकेसह दक्षिण आफ्रिका संघाचा या मालिकेत सहभाग होता.  

****

छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातल्या काही भागात आज पुन्हा अवकाळी पाऊस झाला. जिल्ह्यातल्या सिल्लोड, सोयगाव, कन्नड, खुलताबादसह पैठण परिसरात अवकाळी पाऊस झाल्यामुळं शेतकऱ्यांना काढलेली पिकं वाचवण्यासाठी धावपळ करावी लागली.

****

छत्रपती संभाजीनगर शहरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्त साठ्यात तुटवडा असल्यानं जिल्हा प्रशासनानं पुढाकार घेत जिल्हाधिकारी कार्यालयात आज रक्तदान शिबिर घेतलं. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये याचं उदघाटन झालं.

****

गडचिरोली जिल्ह्यातल्या आरमोरी तालुक्यात मानापूर इथं आज आलेल्या दोन रानटी हत्तींना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांच्या मदतीनं पुन्हा जंगलात जाण्यास भाग पाडलं. या हत्तींमुळं गावकऱ्यांची काही काळ तारांबळ उडाली होती. यावेळी एक महिला जखमी झाली.

****

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दिलीप माने तर, उपसभापतीपदी सुनील कळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आज झालेल्या या निवडणुकीसाठी या दोघांचेच उमेदवारी अर्ज आल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली.

****

No comments: