Sunday, 11 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 11.05.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 11 May 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ११ मे २०२ सकाळी .०० वाजता.

****

ऑपरेशन सिंदूरनंतर काल झालेल्या शस्त्रसंधीचं पाकिस्ताननं पुन्हा उल्लंघन केलं आहे. भारतीय सैन्यदल शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला सडेतोड उत्तर देत आहेत, अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली. शस्त्रसंधीची पाकिस्ताननं काटेकोर अंमलबजावणी करावी, असं भारतानं आवाहन केलं आहे. भारतीय सैन्यदल परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला चोख प्रत्युत्तर देण्याचे निर्देश सैन्याला देण्यात आल्याचं परराष्ट्र सचिवांनी सांगितलं. दरम्यान, गुरुवारी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर मोहिमेत जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनांचे ५ दहशतवादी ऑपरेशन सिंदूरमधे मारले गेल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं.

****

सध्या सुरू असलेल्या भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धाच्या व्हिडीओ गेमच्या चित्रफित भारत-पाकिस्तान संघर्षाच्या खऱ्या चित्रफित म्हणून प्रसारित केल्या जात आहेत. जनतेला असे खोटे संदेश टाळण्याचं तसंच यापासून सावधगिरी बाळगण्याचं आवाहन पत्र सूचना कार्यालयानं केलं आहे. संरक्षण मंत्र्यांच्या कार्यालयाच्या नावानं सामाजिक माध्यमांवर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षाची परिस्थिती लक्षात घेता नागरीकांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देणारा संदेश खोटा असल्याचं आणि असे कोणतेही निर्देश दिलेले नसल्याचं कार्यालयानं स्पष्ट केलं आहे.

****

पाकिस्तानी सैन्याचे चुकीच्या दिशेने लक्ष्य केले गेलेले एक क्षेपणास्त्र त्यांच्याच शहरी भागातील गुरुद्वाराजवळ पडल्याचं निदर्शनास आलं आहे. या स्फोटामुळे गुरुद्वाराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या मात्र कोणतीही जीवीत हानी झाली नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पाकिस्तानी सैन्याच्या या अयशस्वी हल्ल्यामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण बिघडू शकते. २०२२ आणि २०२४ मध्ये पाकिस्तानी सैन्याकडून अयशस्वी हल्ले झाले होते.

****

आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन आहे. १९९८ मध्ये आजच्याच दिवशी भारतानं राजस्थानमधील पोखरण इथं अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली. या दिवशी देशाच्या प्रगती आणि विकासात तंत्रज्ञानाच्या महत्त्वाच्या भूमिकेचं स्मरण केलं जातं. देशातले पहिले स्वदेशी विमान हंसा-३ च्या प्रक्षेपणात आणि सहाव्या जागतिक अणुचाचणीत शास्त्रज्ञ, अभियंते आणि नवोन्मेषकांच्या योगदानाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. दैनंदिन जीवनात तंत्रज्ञानाची भूमिका अधोरेखित करणं आणि तरुणांना विज्ञान आणि तंत्रज्ञानात रस निर्माण करण्यास प्रोत्साहित करणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे.

****

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यांमध्येही सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, जम्मू आणि काश्मीर, लडाख, तमिळनाडू, बिहार आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. नैऋत्य मोसमी पाऊस, मान्सूनचं यंदा नेहमीपेक्षा चार दिवस आधीच येत्या २७ मे रोजी केरळमध्ये आगमन होण्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. असं झालं तर २००९ नंतर प्रथमच मोसमी पावसाचं लवकर आगमन होईल, २००९ साली २३ मे रोजी मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाला होता. या आठवड्यात १३ मेपर्यंत मोसमी पाऊस अंदमान निकोबार बेटांवर पोहोचेल आणि आठ जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

****

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी नांदेड जिल्हा दौऱ्यावर आगमन झालं. ते मुखेड तालुक्यात चव्हाणवाडी इथं एका कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. देगलूर इथं हुतात्मा सैनिक सचिन यादवराज वनजे यांच्या कुटुंबीयांची ते सांत्वनपर भेट घेणार आहेत.

****

शांघायमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक धनुर्विद्या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात भारतानं काल तीन पदकं जिंकली. यामध्ये भारतानं मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं.

****

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र ७३ पदकांची कमाई करत पदक तालिकेत अव्वल स्थानावर आहे. यात २७ सुवर्ण, २२ रजत आणि २४ कांस्यपदकांचा समावेश आहे. कर्नाटक ३९ तर राजस्थान २३ पदकांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

****

आयपीएल स्पर्धेतील उर्वरित सामने लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील, असं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी म्हटलं आहे. स्पर्धेत साखळी फेरीतले बारा आणि `प्ले ऑफ` चे चार असे एकूण १६ सामने अद्याप बाकी आहेत.

****

चंद्रपूर जिल्ह्यातल्या सावली तालुक्यात काल तीन विद्यार्थ्यांचा वैनगंगा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. व्हॉलीबॉल खेळत असताना पाण्यात गेलेला चेंडू काढण्यासाठी नदी पात्रात उतरले असताना काल संध्याकाळी ही दूर्घटना झाली. हे तिघं छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा आणि शिर्डी इथले रहिवासी असून गडचिरोली इथं वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकत होते.

****

बीड इथं काल झालेल्या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये जिल्ह्यातली ६९० प्रकरणं तडजोडीनं निकाली निघाली आहेत.

****

No comments: