Saturday, 17 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 17.05.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 17 May 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

जम्मू-काश्मिरामध्ये राज्य तपास यंत्रणा- एसआयएनं आज अनेक ठिकाणी छापे टाकले. सुरक्षा दलांची आणि महत्त्वाच्या आस्थापनांची संवेदनशील माहिती मेसेजिंग ॲप्सद्वारे शेअर केल्याच्या प्रकरणी ही कारवाई करण्‍यात आल्‍याचं 'एसआयए'ने सांगितलं. श्रीनगर, गंदरबल, बारामुल्ला आणि कुपवाडा जिल्ह्यांमध्ये कारवाई करण्यात येत आहे.

****

हरियाणाच्या कैथलमधील मस्तगढ चिका गावातून देवेंद्र सिंह नावाच्या एका पाकिस्तानी गुप्तहेराला ताब्यात घेण्यात आलं आहे, ऑपरेशन सिंदूरबाबत पाकिस्तानला माहिती पुरवल्याचं त्यानं कबुल केलं आहे. त्याच्याकडून जप्त केलेल्या मोबाईल, लॅपटॉप आणि इतर डिजिटल उपकरणांची सायबर पोलिसांचे पथक चौकशी करत आहे. मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. देवेंद्र सिंह हा पंजाबमधील एका महाविद्यालयात राजशास्त्राचा विद्यार्थी होता. नोव्हेंबर तो २०२४ मध्ये पाकिस्तानच्या नानकाना साहिब गुरुद्वारला गेला होता, त्यावेळी त्याची पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या एजंटांसोबत ओळख झाली. तेव्हापासून तो त्यांच्या संपर्कात असल्याचं उघडकीस आलं आहे.

****

ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर पाकिस्ताननं खोट्या बातम्यांच्या आधारे जगभरात भारताविरोधात, खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र भारत आता मुत्सद्देगिरीच्या जोरावर या प्रचाराचा प्रतिकार करत आहे. या पार्श्वभूमीवर २२ मे पासून दहशतवादाविरोधातल्या भारताच्या संघर्षाचं सत्य जगभर पोहोचवण्यासाठी ७ सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळं जगभर पाठवणार आहे. हे प्रतिनिधीमंडळ विविध देशांना भेटी देणार आहेत. देशातील प्रमुख पक्षांचे नेते या प्रतिनिधीमंडळांचं नेतृत्व करतील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, द्रमुकच्या कनिमोळी करुणानिधी, संयुक्त जनता दल संजयकुमार झा, शिवसेनेचे श्रीकांत शिंदे या नेत्यांचा मंडळात समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी देखील मंडळात असतील. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाबद्दल भारताची ठाम भूमिका, दहशतवादाविरोधात भारताचं शून्य सहिष्णुता धोरण जागतिक समुदायासमोर अधिक ठळकपणे मांडण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

****

भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार चर्चा सुरू आहेत आणि कोणताही व्यापार करार दोन्ही देशांच्या हिताचा आणि फायदेशीर असला पाहिजे असं परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्म्प यांनी केलेल्या दाव्यावर जयशंकर यांनी हे उत्तर दिलं आहे.

भारतानं अमेरिकन वस्तूंवरील सर्व शुल्क रद्द करण्याची तयारी दर्शविली, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणि आपण कोणत्याही व्यापार कराराला अंतिम रुप देण्याची घाई करणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं, तसंच व्यापार चर्चा गुंतागुंतीची असून अजून त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही असही ते म्हणाले होते.

****

देशातील साखर हंगाम संपला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात १८ टक्क्यांनी अर्थात ५८ लाख टनांनी घट झाली आहे. यंदा २५७ लाख टन साखरेचं उत्पादन झालं. गेल्यावर्षी हेच उत्पादन ३१५ लाख टन झालं होतं. सरासरी साखर उताऱ्यातही घट होऊन यंदा केवळ ९ पूर्णांक ३० टक्के साखर उतारा मिळाला आहे. यंदा उत्तरप्रदेशनं ९२ लाख ८० हजार टन उत्पादन घेऊन महाराष्ट्राला मागे टाकत, अव्वल क्रमांक पटकावला. महाराष्ट्रात ८० लाख ९५ हजार टन उत्पादन झालं आहे. ऊसाची घटलेली उपलब्धता आणि साखर उताऱ्यातील घट यामुळं प्रत्यक्ष साखर उत्पादन कमी झाल्याची माहिती राष्ट्रीय साखर महासंघानं दिली आहे. मात्र देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा साठा असल्याचं महासंघानं म्हटलं आहे.

****

शासकीय नियमभंग केल्याच्या कारणावरुन गोंदियाच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कुंदा खुरपडे यांना निलंबित करण्यात आलं आहे. खुरपडे यांनी नियमभंग करत निविदा प्रक्रिया केल्याची तक्रार करण्यात आली होती, त्यावरुन ही कारवाई करण्यात आली.

****

हिंगोली इथं आज तिरंगा यात्रा काढण्यात आली. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह हातात तिरंगा झेंडा घेऊन सर्व नागरिक सहभागी झाले होते. भारत माता की जय, वंदे मातरम् च्या घोषणांनी यावेळी परिसर दुमदुमला होता.

****

रोमानियातील बुखारेस्ट इथं भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदानं सुपरबेट बुद्धिबळ क्लासिक स्पर्धा जिंकली आहे. अलिरेझा फिरोजा आणि मॅक्सिम वाचियर-लाग्राव्ह यांच्याविरुद्ध बरोबरी साधून प्रज्ञानंदानं विजय मिळवला. नऊ फेऱ्यांनंतर, तिन्ही खेळाडूंचे साडेपाच गुण बरोबरीत होते. यानंतर प्लेऑफमध्ये लढती झाल्या. पहिल्या दोन लढती बरोबरीत सुटल्या. पहिला सामना प्रज्ञानंद आणि फिरोज्जा यांच्यात झाला, त्यानंतर वाचियर-लाग्रेव्ह आणि फिरोज्जा यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. नंतर प्रज्ञानंदनं वॅचियर-लॅग्रेव्हविरुद्धची तिसरी लढत जिंकली. विश्वविजेता डी. गुकेश चार गुणांसह या स्पर्धेत नवव्या स्थानावर राहिला. ग्रँड चेस टूरचा पुढचा टप्पा, सुपरयुनायटेड रॅपिड आणि ब्लिट्झ स्पर्धा, १ जुलैपासून क्रोएशियामध्ये होणार आहे.

****

स्थगित करण्यात आलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरू होत आहे. आज, यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना बंगळुरूमध्ये चिन्नास्वामी स्टेडीयम इथं संध्याकाळी साडेसात वाजता वाजता खेळवला जाईल.

****

No comments: