Saturday, 17 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 17.05.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 17 May 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: १७ मे २०२ सकाळी.०० वाजता.

****

राष्ट्रीय तपास संस्था-एनआयए नं मुंबई इथं आज आयसीस दहशतवादी संघटनेच्या स्लीपर सेलमधील दोन फरार संशयितांना अटक केली आहे. पुणे इथं २०२३ मध्ये सुधारित स्फोटक यंत्रे-आयईडी तयार करणं आणि चाचणी घेण्यात त्यांचा सहभाग होता. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल दोन इथं सुरक्षा यंत्रणेनं या दोघांना रोखलं, यानंतर एनआयएच्या पथकानं त्यांना अटक केली. दोन्ही संशयित आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं असून गेल्या दोन वर्षांपासून ते फरार होते. दोघेही पुण्यातील एका भाड्याच्या घरात आयईडी तयार करण्याच्या प्रकरणात गुंतले होते. त्यांच्याविरुद्ध एनआयएच्या विशेष न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट देखील जारी केले होतं, असं एनआयएनं एका निवेदनात म्हटलं आहे.

****

ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर पाकिस्ताननं खोट्या बातम्यांच्या आधारे जगभरात भारताविरोधात, खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र भारत आता मुत्सद्देगिरीच्या जोरावर या प्रचाराचा प्रतिकार करत आहे. या पार्श्वभूमीवर २२ मे पासून ८ खासदारांचे पाच गट  विविध देशांना भेटी देणार आहेत. यामध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी देखील असतील. या भेटीत ते स्थानिक प्रतिनिधींना पहलगाम हल्ला, पाकिस्तानचा खोटा प्रचार आणि ऑपरेशन सिंदूरमागचं सत्य याबद्दल माहिती देतील. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाबद्दल भारताची ठाम भूमिका जागतिक समुदायासमोर अधिक ठळकपणे मांडण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

****

भारतीय रेल्वेने 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' या एका विशेष रेल्वेची घोषणा केली आहे. भारत गौरव टूरीस्ट ट्रेन अंतर्गत आयोजित ही रेल्वे सहल येत्या नऊ जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. मुंबईहून निघणाऱ्या या पाच दिवसांच्या विशेष सहलीत ही रेल्वे रायगड, पुणे, शिवनेरी, भीमाशंकर, प्रतापगड, कोल्हापूर आणि पन्हाळगडाला भेट देऊन मुंबईत दादरला परतणार आहे.

****

भंडारा जिल्ह्यातील मोहाडीत नागरिकांच्या वतीनं ऑपरेशन सिंदुर तिरंगा रॅलीचे काल आयोजन करण्यात आलं होतं. रॅली दरम्यान पाकिस्तान विरोधात घोषणा देत नागरिकांनी निषेध व्यक्त करत भारत मातेचा आणि सैनिकाचा जय जयकार केला.

****

दरम्यान, नाशिक शहरात काल तिरंगा यात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन तिरंगा यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. मंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे हे या तिरंगा यात्रेत सहभागी झाले होते.

****

मुंबईत वानखेडे मैदानावर क्रिकेटपटू रोहित शर्मा याच्या नावानं उभारण्यात आलेल्या स्टॅण्डचं अनावरण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. एखादा क्रिकेटपटू खेळत असतानाच त्याचं नाव मैदानातील स्टॅन्डला देण्याचा हा ‘वानखेडे मैदानाच्या इतिहासतील पहिलाच क्षण असल्याचं सांगत, मुख्यमंत्र्यांनी रोहित शर्माच्या कामगिरीचं कौतुक केलं. मुंबई क्रिकेट संघटनेने एक लाख प्रेक्षक क्षमतेचे भव्य क्रिकेट मैदान उभारावं, संघटनेने प्रस्ताव दिल्यास मैदानासाठी जागा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावाच्या स्टॅण्ड्सचंही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं.

****

दोहा डायमंड लीगमध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्रानं दुसरे स्थान पटकावलं. त्यानं ९० पूर्णांक २३ मीटरच्या विक्रमी अंतरापर्यंत भालाफेक करण्यात यश मिळवलं. जर्मनीच्या ज्युलियन वेबरनं ९१ पुर्णांक शुन्य सहा मीटरसह पहिलं स्थान पटकावलं. नीरजनं त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच ९० मीटरचा टप्पा ओलांडला. ९० मीटरचा टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राचं अभिनंदन केलं. ही सर्वोत्तम कामगिरी नीरजच्या अटळ समर्पण, शिस्त आणि आवडीचे परिणाम असल्याचे मोदींनी सामाजिक माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. या यशानं भारताला अभिमान आणि आनंद होत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केलं.

****

दरम्यान दोहा इथल्या याच स्पर्धेत भारताच्या पारुल चौधरी हिनं महिलांच्या तीन हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात सहावं स्थान पटकावलं. तिनं नऊ मिनिटं १३ पूर्णांक ३९ सेकंद वेळेसह स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडला.

****

एका आठवड्यानंतर आज पुन्हा आयपीएल क्रिकेट स्पर्धा सुरू होत आहे. आज, यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना बंगळुरूमध्ये चिन्नास्वामी स्टेडीयम इथं संध्याकाळी साडेसात वाजता वाजता खेळवला जाईल.

यापूर्वी, भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळं नऊ मे रोजी आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. स्पर्धेतील उर्वरित सामन्यांचं नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. मोहाली आणि धर्मशाला इथं आता सामने होणार नाही. याशिवाय, २५ मे रोजी होणारा अंतिम सामना आता ३ जून रोजी होणार आहे. प्लेऑफच्या ठिकाणांची घोषणा नंतर केली जाणार आहे.

****

राज्याच्या पुढील आठवड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. दरम्यान, काल  सर्व विभागांमध्ये तुरळक ठिकाणी काल हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊसाची नोंद झाली आहे.

****

No comments: