Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date 21 May 2025
Time 11.00 to 11.05
AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ मे २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
पाकिस्तानप्रणीत दहशतवादाच्या विरोधातली भारताची भूमिका
जगभरातल्या देशांसमोर मांडण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या शिष्टमंडळांपैकी पहिलं
शिष्टमंडळ आज दौऱ्यावर निघणार आहे. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या
नेतृत्वाखाली हे मंडळ संयुक्त अरब अमिरात, लायबेरिया, कॉंगो आणि सिएरा लेओन इथं जाणार आहे.
****
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ आणि
विज्ञान साहित्यिक जयंत नारळीकर यांचं काल पुण्यात निधन झालं, ते शहाऐंशी वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नारळीकर यांच्या
पार्थिवाचं दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान दिवंगत राजीव
गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केली आहे. काँग्रेस नेते राहुल
गांधी आणि मल्लिकार्जून खरगे यांनी दिल्ली इथं राजीव गांधी यांच्या समाधीस्थळी
जाऊन पुष्पांजली अर्पण केली. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर
इथं आज माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि देशासाठी बलिदान
देणाऱ्या शहीद जवानांना अभिवादन करण्यासाठी काँग्रेसतर्फे तिरंगा यात्रा निघत आहे.
या यात्रेची सुरुवात शाहगंज इथल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून होत असून, चेलीपुरा आणि अण्णाभाऊ साठे चौक मार्गे राजीव गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत ही
यात्रा पोहोचेल. या ठिकाणी राजीव गांधी यांना अभिवादन करून या यात्रेचा समारोप
होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं विमानतळाच्या आजुबाजुच्या परिसरात
असणारे फार्म हाउस, मंगल कार्यालयातील विवाह सोहळे तसंच
अन्य सामाजिक कार्यक्रमामध्ये लेझर लाईटस, बीम
लाईटसच्या वापरावर येत्या ९ जुलै पर्यंतच्या कालावधीसाठी बंदी घालण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी हे आदेश निर्गमित केले आहेत.
****
बीड शहरातून जाणाऱ्या बिंदुसरा नदीपात्रात स्वच्छता आणि
खोली करण्याच्या कामाचा आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते काल शुभारंभ करण्यात
आला. खोलीकरणाच्या या कामामुळे शहरातल्या पाणी पातळीत मोठी वाढ होणार असल्यानं
समाधान व्यक्त केलं जात आहे.
****
कल्याणमध्ये एका रहिवासी इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या
दुर्घटनेत एका लहान मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला, तर
पाच जणांना वाचवण्यात यश आलं. काल दुपारी या इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब
कोसळून ही दुर्घटना घडली, यात ढिगाऱ्याखाली ११ जण
अडकले होते.
****
संघ लोकसेवा आयोगामार्फत येत्या रविवारी नागरी सेवा पूर्व
परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षांसाठी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर ६ हजार ३०४
उमेदवार प्रविष्ठ होणार असल्याची माहिती जिल्हा पर्यवेक्षकीय समन्वय अधिकारी तथा
उपजिल्हाधिकारी सामान्य संगीता राठोड यांनी दिली आहे.
****
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी
डॉ. महेंद्र कल्याणकर यांचा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते
मंत्रालयात सन्मान करण्यात आला. या
समारंभात राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, मंत्री
छगन भुजबळ,
प्राधिकरणातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्रातल्या ९५ महामंडळांपैकी बृहन्मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
कार्यालयाचा प्रथम क्रमांक आला. क्षेत्रीय शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसाठी
१०० दिवसांसाठी ७ कलमी कृती आराखडा अंतर्गत
कार्यालयीन मूल्यमापन १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीमेत बांद्रा
बृहन्मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयानं प्रथम क्रमांक मिळवला
याबद्दल कल्याणकर यांना सन्मानित करण्यात आलं.
****
आदिवासी बहुल जिल्हा असलेल्या पालघरला नवे उपप्रादेशिक
परिवहन कार्यालय मंजूर झालं असून आता पालघर जिल्ह्याला MH-60 हि नवीन परिवहन ओळख मिळाल्याची
माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ९ एप्रिल रोजी पालकमंत्री या
नात्यानं पालघर इथं झालेल्या लोकदरबारामध्ये लवकरच पालघर मधल्या नागरिकांसाठी
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात येईल असं आश्वासन मी दिलं होत, त्याची पूर्तता या निमित्ताने होत असल्याचं ते म्हणाले.
****
अटारी-वाघा संयुक्त चेकपोस्टवर आज सायंकाळपासून बीटीगं
रिट्रीट सोहळ्याला पुन्हा सुरुवात होत आहे. भारत-पाकिस्तान संघर्षाच्या
पार्श्वभूमीवर काही काळ हा सोहळा स्थगित करण्यात आला होता. फिरोजपूर, हुसेनीवाला आणि फाजिल्का इथंही बिटींग रिट्रीट सोहळा होणार आहे.
****
गृह मंत्रालयानं पद्म पुरस्कार २०२६ साठी नामांकनं अर्ज
मागवले आहेत. ३१ जुलैपर्यंत ऑनलाईन नामांकन दाखल करण्याची मुदत असून, राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर नामांकन दाखल करण्यात येतील.
****
कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं
राज्यभरात पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आज छत्रपती संभाजीनगर, बीड,
धाराशिव जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट तर जालना, परभणी,
हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात
आला आहे. दरम्यान, राज्यात काल अनेक ठिकाणी जोरदार पाऊस
झाला. मुंबई आणि पुण्यात काल संध्याकाळी मुसळधार पाऊस पडला. छत्रपती संभाजीनगर
शहरात मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात काल
वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.
****
No comments:
Post a Comment