Thursday, 22 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.05.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 22 May 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ मे २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      राज्यातल्या १५ रेल्वे स्थानकांसह १०३ पुनर्विकसित अमृत भारत रेल्वेस्थानकांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

·      ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची संयुक्त अरब अमिरातीच्या मंत्र्यांशी चर्चा

·      महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या संयुक्त शेतीधारक शेतकऱ्यांना वीजपुरवठा होण्यासाठी कमी मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार

·      छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेकडून प्लास्टिक प्रदूषण निर्मूलनासाठी आजपासून विशेष मोहीम

आणि

·      ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ धाराशिव तसंच नांदेड इथं तिरंगा यात्रा

****

पायाभूत सुविधांचा वेगाने विकास आणि स्थानकांचं आधुनिकतेकडे होणारं परिवर्तन हे ‘विकासही आणि वारसाही’ या मंत्राचं उत्तम उदाहरण असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राजस्थानात बिकानेर इथं १८ राज्यांमधल्या १०३ पुनर्विकसित अमृत भारत रेल्वेस्थानकांचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं, त्यावेळी ते बोलत होते. २६ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी झालं, तसंच बिकानेर-मुंबई दरम्यानच्या नव्या रेल्वेला देखील सुरुवात झाली.

देशातले रस्ते, विमानतळ, रेल्वे आणि रेल्वेस्थानकं आधुनिक करण्यात येत आहेत. सरकार एकाच वेळी देशातल्या तेराशे रेल्वे स्थानकांना अमृत भारत योजनेअंतर्गत आधुनिक स्वरुप देत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. गेल्या ११ वर्षात देशात उत्तम पायाभूत सुविधा निर्माण झाल्याचं सांगून पंतप्रधानांनी, विकसित भारताच्या निर्माणासाठी देशभरात आधुनिक पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात काम सुरु असल्याचं सांगितलं. ते म्हणाले

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

ऑपरेशन सिंदूर बद्दल बोलताना पंतप्रधानांनी, दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करुन भारताने पाकिस्तानला सडेतोड प्रत्यूत्तर दिल्याचं सांगितलं. आपल्या तिनही संरक्षण दलांच्या रणनितीमुळे पाकिस्तानला हार मानावी लागली, असं ते म्हणाले

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

गेल्या ११ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेनं पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व सुधारणा केल्याचं प्रतिपादन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याप्रसंगी केलं. ते म्हणाले

बाईट – रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

****

अमृत ​​भारत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील १५ स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला, यात आमगाव, चांदा फोर्ट, चिंचपोकळी, देवळाली, धुळे, केडगाव, लासलगाव, लोणंद जंक्शन, माटुंगा, मूर्तिजापूर जंक्शन, इतवारी जंक्शन, परळ, सावदा, शहाड आणि वडाळा रोड यांचा समावेश आहे. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईच्या परळ स्थानकावरून दूरदृश्यप्रधालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

अमृत भारत स्थानक योजनेतून मुंबई शहराचं वैभव आणि युनेस्को जागतिक वारसास्थळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीचा पुनर्विकास करण्यात येणार असून, यासाठी दोन हजार आठशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. विमानतळ परिसरात उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक सोयी सुविधा या अमृत भारत रेल्वे स्टेशनच्या माध्यमातून आता सर्वसामान्य नागरिकांसाठीही उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं.

जळगाव इथून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, धुळे रेल्वे स्थानकावरून माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार अनुप अग्रवाल या कार्यक्रमात सहभागी झाले होते. प्रकल्प जलद गतीने पूर्ण केल्याबद्दल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्रालयाचे आभार मानले.

****

दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, सात बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळं येत्या १५ दिवसांत ३२ वेगवेगळ्या देशांना भेटी देणार आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज सकाळी संयुक्त अरब अमिरातीत तिथले सलोखा विषयक विभागाचे मंत्री शेख नाहयान बिन मुबारक अल नाहयान यांच्याबरोबर चर्चा केली. या ऑपरेशन सिंदूरचा भाग म्हणून अशा प्रकारचं आयोजन करणारा युएई हा पहिलाच देश आहे.

खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ देखील आज जपानला पोहोचलं. दहशतवादाच्या विरुद्धच्या लढाईत जपान भारताला दृढ पाठिंबा देईल, असा विश्वास जपानच्या नेत्यांनी व्यक्त केला.

द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखाली तिसरं शिष्टमंडळ स्पेन, ग्रीस, स्लोव्हेनिया, लाटविया आणि रशिया या पाच देशांच्या दौऱ्यावर रवाना झालं.

****

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केंद्र शासनातर्फे आजपासून एक राष्ट्र, एक अभियान: प्लास्टिक प्रदूषणाचा अंतही मोहीम राबवण्यात येत आहे. केंद्रीय पर्यावरण, मंत्री भूपेंद्र यादव यांनी सामाजिक माध्यमांवरून प्लास्टिक प्रदूषण संपवण्यासाठी सामूहिकरित्या प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आहे.

****

रायगड जिल्ह्यात ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अॅन्ड ट्रेनिंग’ अर्थात ‘सी ट्रिपल आयटी’ मंजूर झालं असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने याबाबात केंद्र मंजूरीचं पत्र पवार यांना पाठवलं आहे. टाटा आणि राज्य शासनाच्या सहकार्यातून रोहा औद्योगिक वसाहतीत नवीन केंद्र उभं राहणार आहे. याआधी बीड, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरच्या दोन ‘सी ट्रिपल आयटी’ केंद्रांना मंजुरी मिळाली आहे.

****

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या संयुक्त शेतीधारक शेतकऱ्यांना वीजपुरवठा होण्यासाठी कमी मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येतील, अशी माहिती, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मुंबईत महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यासाठी महाजनको आणि संबंधित शासकीय उपक्रमांकडून प्रस्ताव मागवून कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

जन्म नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने तयार केलेल्या प्रमाणित कार्य पद्धतीचा अवलंब करण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी अन्य एका बैठकीत दिले.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेकडून प्लास्टिक प्रदूषण निर्मूलनासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. स्वच्छ भारत ग्रामीण मिशन अंतर्गत जिल्ह्यात गावपातळीवर विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांनी आज दिली. आजपासून पाच जून पर्यंत प्लास्टिक प्रदूषण निर्मूलन मोहीम राबवण्यात येणार असून, सोबतच गावातल्या सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गतच २८ मे रोजी मासिक पाळी व्यवस्थापन दिनसाजरा करण्यात येणार आहे.

****

ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ धाराशिव शहरात आज शिवसेनेच्या वतीनं तिरंगा यात्रा काढण्यात आली. राष्ट्रमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावरून काढण्यात आलेल्या या रॅलीत शालेय विद्यार्थ्यांनी केलेल्या भारतीय सैनिकांच्या वेशभूषेनं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. या रॅलीत शाळा आणि महाविद्यालयातले विद्यार्थी, माजी सैनिक, नागरिक सहभागी झाले होते.

नांदेड शहरातही शिवसेनेच्या वतीनं आमदार हेमंत पाटील आणि आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या नेतृत्वात तिरंगा मोटरसायकल रॅली काढण्यात आली. जुना मोंढा ते तरोडा नाकापर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीत नागरीक उत्साहानं सहभागी झाले होते.

****

जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयाच्या वतीनं देशातली पहिली झऱ्यांची गणना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १५ मे पासून ही गणना सुरु झाली आहे. नागरिकांनी भूजल सर्वेक्षण विभागाला आपापल्या भागातील झऱ्यांची माहिती ८०० ७४० १४०८ या क्रमांकावर कळवावी, असं आवाहन वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या गणनेत १३ झरे आढळून आले आहेत.

****

No comments: