Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 22 May 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ मे
२०२५ सकाळी ७.१० मि.
****
· पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८ राज्यांतल्या १०३ अमृत
भारत रेल्वे स्थानकांचं आज उद्घाटन, राज्यातल्या
१५ स्थानकांचा समावेश
· खरीप हंगामात दोन कोटी चार लाख टन उत्पादनाचं लक्ष्य ठेवल्याची
मुख्यमंत्र्यांची माहिती
· शेतकऱ्यांना २०० रुपये शुल्क भरून जमिनीच्या हिस्सेवाटपाची मोजणी
आणि नकाशे देण्याचा सरकारचा निर्णय
· छत्रपती संभाजीनगर शहरात ड्रेनेज स्वच्छतेसाठी महानगरपालिकेकडून
रोबोटिक यंत्रणा कार्यान्वित
आणि
· मान्सूनचं वेळेआधीच आगमन होण्याची शक्यता हवामान विभागाकडून
व्यक्त
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिकानेर इथून १८ राज्यांमधल्या १०३
अमृत भारत स्थानकांचं उद्घाटन करणार आहेत. या रेल्वे स्थानकांवर अद्ययावत प्रतीक्षालय, शौचालय आणि निवाऱ्याचा समावेश आहे. याशिवाय विविध सुविधा या रेल्वे
स्थानकांवर देण्यात आल्या आहेत. यामध्ये राज्यातल्या आमगाव, चांदा
फोर्ट, चिंचपोकळी, देवळाली, धुळे, केडगाव, लासलगाव,
लोणंद जंक्शन, माटुंगा, मुर्तिजापूर,
इतवारी, परेल, सावदा,
शहाड, वडाळा रोड स्थानकांचा समावेश आहे.
दरम्यान, रेल्वे स्थानकांच्या
या आधुनिकीकरणाबाबत धुळे इथल्या प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले,
****
यंदाच्या खरीप हंगामात राज्यानं दोन कोटी चार लाख टन उत्पादनाचं
लक्ष्य ठेवल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. मुंबईत काल पार पडलेल्या
खरीप हंगामाच्या तयारीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यंदा सरासरीपेक्षा
जास्त पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला
असून, त्यामुळे खरीप हंगामात चांगलं उत्पादन होण्याची अपेक्षा
त्यांनी व्यक्त केली. राज्यात बियाणं आणि खतांचा पुरेसा साठा असून, कोणत्याही प्रकारचा तुटवडा जाणवू दिला जाणार नाही, असं
त्यांनी सांगितलं. बोगस बियाण्यांवर आळा घालण्यासाठी राज्य सरकारनं पहिल्यांदाच 'साथी' पोर्टलवर बियाणांची नोंदणी सक्तीची केली असल्याची
माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले,
बाईट
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं.
त्यामुळे हवामान विभागाच्या मदतीनं नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना शेतकऱ्यांना दिली
जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी
काल मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकही घेतली. यंदाच्या मान्सूनच्या काळात जीवित आणि
मालमत्तेचं नुकसान रोखण्यासाठी काम करावं, आपत्तीच्या काळात सर्व
प्रशासकीय अधिकार्यांनी जबाबदारी म्हणून मुख्यालयाच्या संपर्कात राहून २४ तास काम करावं,
आपत्तीच्या काळात तातडीने प्रतिसाद द्यावा, असे
निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
****
शेतकऱ्यांना केवळ दोनशे रुपये मोजणी शुल्क भरून जमिनीच्या हिस्सेवाटपाची
मोजणी आणि नकाशे देण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे.
महसूल विभागातल्या जमाबंदी आयुक्त आणि भूसंपादन संचालकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात
आला. या निर्णयामुळे राज्यभरातल्या लाखो शेतकरी कुटुंबांना कायदेशीर जमीन वाटपाची प्रक्रिया
सोप्या पद्धतीने पूर्ण करता येणार आहे.
****
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवावर
काल पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. काल
सकाळी त्यांचं पार्थिव आयुका इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासह इतर मान्यवरांनी डॉ. नारळीकर
यांचं अंत्यदर्शन घेतलं.
****
राज्यातल्या काही सनदी अधिकाऱ्यांचा बदल्या काल करण्यात आल्या
आहेत. छत्रपती संभाजीनगर इथले विभागीय आयुक्त दिलीप गावडे सेवानिवृत्त होत असून, त्यांच्या जागी धुळ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची बदली
करण्यात आली आहे. तर छत्रपती संभाजीनगर इथल्या सिडकोच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी भाग्यश्री
विसपुते यांची धुळ्याच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
****
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी काल दहशतवाद विरोधी
दिन म्हणून पाळण्यात आली. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं राजीव गांधी यांना
अभिवादन करण्यात करुन, दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिनानिमित्त
उपस्थितांना शपथ देण्यात आली.
दरम्यान, शहरात काल जिल्हा
काँग्रेस कमिटीतर्फे "तिरंगा यात्रा" काढून, राजीव
गांधी यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
****
ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ नांदेड शहरातल्या महिलांनी काल
भर पावसात सिंदूर यात्रा काढली. भारतीय जनता महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा
वाघ आणि आमदार श्रीजया चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या या यात्रेदरम्यान
महिलांनी राष्ट्रभक्तीचा आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला.
****
ऑपरेशन सिंदूरबद्दलची माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर
व्योमिका सिंग यांनी प्रसार माध्यमांना दिली, याबद्दल लातूर
इथल्या आयुर्वेद तज्ञ डॉ. उमा देशपांडे यांनी समाधान व्यक्त केलं. त्या म्हणाल्या –
बाईट
- डॉ. उमा देशपांडे
****
छत्रपती संभाजीनगर शहरातली ड्रेनेज स्वच्छता अधिक प्रभावी आणि
सुरक्षित करण्यासाठी महानगरपालिकेने रोबोटिक यंत्रणा कार्यान्वित केली आहे. आयुक्त
तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरु
करण्यात आला. या अत्याधुनिक रोबोटिक यंत्राच्या सहाय्याने ड्रेनेज साफ करण्याचं काम
आता अधिक वेगाने आणि काटेकोरपणे होणार आहे. यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना थेट नाल्यात
उतरावं लागणार नसल्यानं, त्यांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न मिटणार
असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मुख्यमंत्री शंभर दिवस कार्यक्रमात धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा
पोलीस ठाण्याने पहिला क्रमांक पटकावला आहे. या पोलीस ठाण्यात आकर्षक सजावट करण्यात
आली असून, मियावाकी वृक्ष लागवड देखील करण्यात आली
आहे. यासोबतच पोलीस ठाण्याच्या प्रशासकीय कामांमध्ये देखील सुसूत्रता आली आहे. उमरगा
आणि तालुक्यातल्या अनेक नागरिकांनी पोलीस ठाण्याच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं.
यासंदर्भात उमरगा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले म्हणाल्या,
बाईट
- अश्विनी भोसले
****
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरचे निवृत्त कर्मचारी माजी सैनिक नामदेव
बोर्डे यांचं काल निधन झालं, ते ८५ वर्षांचे
होते.
****
लातूर जिल्ह्यात काल सलग चौथ्या दिवशी अवकाळी पाऊस झाला. या
पावसामुळे रेणा नदी प्रवाहित झाली आहे. जिल्ह्यातल्या शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं, सरकारने नुकसान भरपाई देऊन या अवकाळीच्या संकटातून बाहेर काढण्याची
मागणी शेतकरी करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
धाराशिव जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यात काल मेघगर्जनेसह विजांच्या
कडकडाटात रदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान होत आहे. जिल्ह्यातले
शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून वस्तुनिष्ठ
अहवाल शासनाकडे पाठवाण्याची सूचना, आमदार राणा
जगजितसिंह पाटील यांनी केली.
****
यंदा मान्सूनचं आगमन वेळेआधीच होण्याची शक्यता हवामान विभागानं
व्यक्त केली आहे. केरळमधे एक जूनला मान्सून पोचतो, मात्र यावेळी तो पाच दिवस आधीच म्हणजे येत्या तीन ते चार दिवसात पोचण्यासाठी
परिस्थिती अनुकूल आहे, असं हवामान विभागाचं शास्त्रज्ञ नरेश कुमार
यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.
दरम्यान, महाराष्ट्र,
केरळ, गोवा, आणि कर्नाटक
किनारपट्टीवर जोरदार पाऊस सुरु असून, पुढचे पाच ते सहा दिवस अशीच
परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
****
उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं नाव धाराशिव रेल्वे स्थानक करण्यास
केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी रेल्वेच्या वरिष्ठ
अधिकार्यांसोबत बैठक घेऊन, रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्याबाबत तात्काळ
कार्यवाही करण्याची मागणी केली होती.
****
No comments:
Post a Comment