Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 23 May 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ मे २०२५ दुपारी १.०० वा.
****
विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी
ईशान्य भारताचा विकास अतिशय महत्त्वाचा असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं रायझिंग नॉर्थ ईस्ट
इन्व्हेस्टर्स समिटचं आज उद्घाटन करण्यात आलं. ईशान्येकडील वैविध्य हीच मोठी शक्ती
असल्याचं पंतप्रधान म्हणाले. गेल्या दहा वर्षांत ईशान्येकडील १० हजार युवकांनी शस्त्र
खाली टाकून मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. ईशान्यकडील
राज्ये सरकारसाठी अष्टलक्ष्मी आहेत, असं पंतप्रधान म्हणाले.
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
****
१९७१ चं युद्ध आणि बांगलादेशाच्या
निर्मितीत सीमा सुरक्षा दलाची महत्वाची भूमिका राहिली, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी
म्हटलं आहे. दिल्ली इथल्या विज्ञान भवनात झालेल्या सीमा सुरक्षा दलाच्या २२ व्या पुरस्कार
वितरण सोहळ्यात आज ते बोलत होते. यावेळी शाह यांच्या हस्ते बीएसएफ जवानांचा पदक देऊन
गौरव करण्यात आला. निवडणुका, कोरोना काळ तसच नक्षलवादाचा बिमोड
करण्यात सीमा सुरक्षा दलांनी अतुलनीय काम केलं, असं शाह यावेळी
म्हणाले.
****
राज्याचा आधुनिक शेती आणि वाढत्या
यांत्रिकीकारणाचा वेग लक्षात घेऊन महसूल विभागानं पारंपरिक अरुंद शेतरस्ते १२ फूट करण्याचा
निर्णय घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाजमाध्यमावरील संदेशात या
निर्णयाची माहिती दिली. कृषी अवजारांची ये - जा सुलभ व्हावी, तसंच शेतीमाल योग्य वेळेत बाजारपेठेत
पोहचावा यासाठी शेतरस्ते ३ ते ४ मीटर, म्हणजे जवळपास १२ फूट करण्यात
येणार आहेत.
****
राज्यात अवकाळी पावसामुळं झालेल्या
नुकसानीचे पंचनामे करुन नुकसानभरपाई देण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
कोल्हापूर इथं त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात
पोलीस योग्य ती कारवाई करतील, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस आज कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इचलकरंजी
इथं विविध विकासकामांचं उद्घाटन, लोकार्पण आणि भूमीपूजन करण्यात
आलं.
****
१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा
कार्यक्रमात महसूली विभागांमधील ४० विभागस्तरीय कार्यालयांच्या आणि सर्व जिल्ह्यांमधील
४२ जिल्हास्तरीय कार्यालयांच्या स्पर्धेचा निकाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
आज जाहीर केला. माहिती उपसंचालक कार्यालय आणि प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी
कार्यालय श्रेणीत छत्रपती संभाजीनगर कार्यालयानं प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर, वनसंरक्षक, सामाजिक
वनीकरण विभागात छत्रपती संभाजीनगरला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. याशिवाय अप्पर राज्यकर
आयुक्त, राज्य वस्तू आणि सेवा कर कार्यालय तसंच विभागीय शिक्षण
उपसंचालक कार्यालय वर्गवारीत छत्रपती संभाजीनगरचा द्वितीय क्रमांक आहे. प्रादेशिक परिवहन
कार्यालयात लातूर कार्यालयाला द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
****
जागतिक संस्था फिच रेटिंग्जने आगामी
पाच वर्षांत भारताच्या जीडीपी- सकल देशांतर्गत उत्पादनाच्या वाढीचा अंदाज ६.४ टक्के
राहील, असं
म्हटलं आहे. सकल रोजगारात वाढ झाल्यामुळे भारताचा अंदाजित जीडीपी विकास दर शुन्य पुर्णांक
दोन टक्क्यांनी जास्त असण्याची शक्यता आहे, असंही म्हटलं आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने गेल्या महिन्यात प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारत हा सर्वात
वेगाने वाढणारा प्रमुख देश असून पुढील दोन वर्षांत सहा टक्क्यांपेक्षा जास्त विकास
दर वाढणारा एकमेव देश असेल असं म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर विभागातल्या नगरपालिका
क्षेत्रात वार्ड भेट समस्या समाधान अभियाना"च्या माध्यमातून काल विभागीय आयुक्त
दिलीप गावडे यांनी थेट नागरिकांशी संवाद साधला. पीएम स्वनिधी, प्रधानमंत्री आवास योजना, पाणीपुरवठा तसच नागरी क्षेत्रातील नागरिकांना येणाऱ्या अडचणी तत्परतेने सोडवा,
असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.
****
FIH स्पर्धेच्या युरोपीय फेरीसाठी भारतीय
पुरुष हॉकी संघाचीं घोषणा काल करण्यात आली. २४ सदस्यीय संघाची घोषणा करताना हॉकी इंडियानं
हरमनप्रीत सिंहकडं नेतृत्व सोपवलं आहे, तर हार्दिक सिंह उपकर्णधार
आहे. ७ ते २२ जूनदरम्यान होणाऱ्या स्पर्धेत भारतीय संघ सात जून रोजी नेदरलँडसविरुद्ध
आपला पहिला सामना खेळणार आहे.
****
No comments:
Post a Comment