Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 23 May 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ मे २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
राज्यातल्या १५ रेल्वे स्थानकांसह १०३ पुनर्विकसित अमृत
भारत रेल्वे स्थानकांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
·
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताचं पाकिस्तानला सडेतोड
प्रत्युत्तर, पंतप्रधानांचं प्रतिपादन
·
ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी गेलेल्या
शिष्टमंडळांची संयुक्त अरब अमिरात आणि जपानच्या मंत्र्यांशी चर्चा
·
अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे तातडीने
पंचनामे करण्याचे मंत्री मकरंद जाधव यांचे निर्देश
आणि
·
पुढील दोन दिवस मराठवाड्यासह राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार
पावसाची शक्यता, लातूर जिल्ह्यात नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
****
१८ राज्यांमधल्या
१०३ पुनर्विकसित अमृत भारत रेल्वेस्थानकांचं उद्घाटन काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
हस्ते झालं. राजस्थानात बिकानेर इथं झालेल्या या कार्यक्रमात २६ हजार कोटी रुपयांच्या
विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण, तसंच बिकानेर-मुंबई दरम्यानच्या नव्या रेल्वेला देखील सुरुवात झाली.
पायाभूत
सुविधांचा वेगाने विकास आणि स्थानकांचं आधुनिकतेकडे होणारं परिवर्तन हे ‘विकासही आणि
वारसाही’ या मंत्राचं उत्तम उदाहरण असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. सरकार एकाच
वेळी देशातल्या तेराशे रेल्वे स्थानकांना अमृत भारत योजनेअंतर्गत आधुनिक स्वरुप देत
असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या ११ वर्षात देशात उत्तम पायाभूत सुविधा निर्माण झाल्याचं
सांगून पंतप्रधानांनी, विकसित भारताच्या निर्माणासाठी देशभरात आधुनिक पायाभूत सुविधांवर
मोठ्या प्रमाणात काम सुरु असल्याचं सांगितलं. ते म्हणाले...
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
ऑपरेशन
सिंदूर बद्दल बोलताना पंतप्रधानांनी, दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करुन भारताने
पाकिस्तानला सडेतोड प्रत्यूत्तर दिल्याचं सांगितलं. आपल्या तिनही संरक्षण दलांच्या
रणनितीमुळे पाकिस्तानला हार मानावी लागली, असं ते म्हणाले,
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
****
अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत महाराष्ट्रातल्या १५ स्थानकांचा पुनर्विकास करण्यात
आला. यात आमगाव, चांदा फोर्ट, चिंचपोकळी, देवळाली, धुळे, केडगाव,
लासलगाव, लोणंद जंक्शन, माटुंगा,
मूर्तिजापूर जंक्शन, इतवारी जंक्शन, परळ, सावदा, शहाड आणि वडाळा रोड
या स्थानकांचा समावेश आहे. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबईच्या परळ स्थानकावरून दूरदृश्यप्रधालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
अमृत भारत
स्थानक योजनेतून मुंबई शहराचं वैभव आणि युनेस्को जागतिक वारसास्थळ असलेल्या छत्रपती
शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीचा पुनर्विकास करण्यात येणार असून, यासाठी दोन
हजार आठशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी
दिली. विमानतळ परिसरात उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक सोयी सुविधा या अमृत भारत रेल्वे
स्टेशनच्या माध्यमातून आता सर्वसामान्य नागरिकांसाठीही उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं.
जळगाव इथून
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, धुळे रेल्वे स्थानकावरून माजी खासदार
डॉ. सुभाष भामरे या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
****
दहशतवादाविरोधात
भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, सात बहुपक्षीय
प्रतिनिधिमंडळं येत्या १५ दिवसांत ३२ वेगवेगळ्या देशांना भेटी देणार आहेत. खासदार श्रीकांत
शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने काल संयुक्त अरब अमिरातीत तिथले सलोखा विषयक
विभागाचे मंत्री शेख नाहयान बिन मुबारक अल नाहयान यांच्याबरोबर चर्चा केली. या ऑपरेशन
सिंदूरचा भाग म्हणून अशा प्रकारचं आयोजन करणारा युएई हा पहिलाच देश आहे.
खासदार
संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ देखील काल जपानला पोहोचलं. दहशतवादाच्या
विरुद्धच्या लढाईत जपान भारताला दृढ पाठिंबा देईल, असा विश्वास जपानच्या
नेत्यांनी व्यक्त केला.
द्रमुक
खासदार कनिमोळी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखाली तिसरं शिष्टमंडळ स्पेन, ग्रीस,
स्लोव्हेनिया, लाटविया आणि रशिया या पाच देशांच्या
दौऱ्यावर रवाना झालं.
****
राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात काल पहिल्या टप्प्यातले शौर्य पुरस्कार
प्रदान करण्यात आले. या टप्प्यात एकूण ३३ शौर्य चक्र आणि सहा कीर्ती चक्र प्रदान करण्यात
आले, ज्यात सात शौर्य चक्र आणि चार कीर्ती चक्र मरणोत्तर होते. उपराष्ट्रपती
जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण
मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
राज्यात
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेत पिकांचे
तातडीने पंचनामे करावेत, असे निर्देश मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी दिले आहेत.
पंचनामे करण्यासाठी महसूल आणि कृषी विभागाने पथके गठीत करून ही कार्यवाही गतीने पूर्ण
करण्याचं त्यांनी सूचित केलं.
****
राज्यातल्या
तूर उत्पादक शेतकरी आणि लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेता केंद्रीय कृषी मंत्रालयानं
तूर खरेदीस २८ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे राज्यातल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना
मोठा दिलासा मिळाला असल्याचं, पणन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं
आहे. राज्यात एक लाख ३७ हजार ४५८ शेतकऱ्यांची तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी झालेली असून,
त्यापैकी १३ मे पर्यंत ६९ हजार १८९ शेतकऱ्यांकडून एक लाख दोन हजार ९५१
मेट्रिक टन तून खरेदी झालेली आहे.
****
भाजप महायुतीच्या
सत्ताकाळात राज्यात गुन्हेगारीने नवा उच्चांक गाठला असून, बहुतांश गुन्हेगारी
घटनांतले आरोपी हे सत्ताधारी पक्षाशी संबंधित असून त्यांना सरकारचे अभय असल्याची टीका
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत
बोलत होते. बीड मस्साजोग घटना, पुणे पोर्शे कार अपघात,
वैष्णवी हगवणे यांचा हुंडाबळी, या प्रकरणातले आरोपी
राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असून, या संपूर्ण प्रकरणात राज्य
महिला आयोगाचा असंवेदनशीलपणा पुन्हा दिसून आल्याचंही सपकाळ म्हणाले.
****
ऑपरेशन
सिंदूरच्या गौरवार्थ धाराशिव शहरात काल शिवसेनेच्या वतीनं तिरंगा यात्रा काढण्यात आली.
राष्ट्रमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावरून काढण्यात आलेल्या
या रॅलीत शालेय विद्यार्थ्यांनी केलेल्या भारतीय सैनिकांच्या वेशभूषेनं सर्वांचे लक्ष
वेधून घेतलं.
नांदेड
शहरातही शिवसेनेच्या वतीनं आमदार हेमंत पाटील आणि आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या
नेतृत्वात तिरंगा मोटरसायकल रॅली काढण्यात आली.
****
अहिल्यानगर
जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातल्या ब्राम्हणवाडा गावाचे भूमिपुत्र संदीप पांडुरंग गायकर
यांना काल जम्मू काश्मीरमधे दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलं. ते लष्कराच्या १५ मराठा
बटालियनमध्ये होते. आज त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यस्कार करण्यात येणार
आहेत.
****
धाराशिव
जिल्ह्यातल्या १०० सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या शिवारात स्मार्ट 'पीआयएस'
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृत्रीम बुद्धिमत्ता - एआयचा वापर करण्यात
येणार आहे. त्यासाठी राहुरीच्या कृषी विद्यापीठाकडून जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांना
पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. येत्या सोमवारी जिल्ह्यातले शेतकरी
या अनुषंगाने राहुरी विद्यापीठात अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत. आगामी काळात कृत्रिम
बुद्धिमत्ता, ड्रोन आणि रोबोटिक्ससारख्या तंत्रज्ञानाच्या प्रभावी
वापरातून शेती उत्पादन आणि उत्पन्न वाढीसाठी हा महत्वपूर्ण प्रकल्प हाती घेतल्याचं
आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितलं.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्हा परिषदेकडून प्लास्टिक प्रदूषण निर्मूलनासाठी विशेष मोहीम राबवण्यात
येत आहे. स्वच्छ भारत ग्रामीण मिशन अंतर्गत जिल्ह्यात गावपातळीवर विविध उपक्रमांची
अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
तथा प्रशासक अंकित यांनी काल दिली. पाच जून पर्यंत प्लास्टिक प्रदूषण निर्मूलन मोहीम
राबवण्यात येणार असून, सोबतच गावातल्या सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता
मोहीम राबवण्यात येणार आहे.
****
लातूर जिल्ह्यात
मांजरा, तेरणा आणि तावरजा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचा जोर
वाढत असल्यानं या नद्यांवरचे प्रकल्प आणि कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्यांमध्ये येणारं
अतिरिक्त पाणी नद्यांमार्फत सोडावं लागणार आहे. त्यामुळे नदी काठावरील शेतकरी तसंच
नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, येत्या दोन
दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार ते अती
जोरदार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. आज रायगड आणि
रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
****
No comments:
Post a Comment