Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 02
September 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ सप्टेंबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील यशोभूमी
येथे सेमिकॉन इंडिया-२०२५ परिषदेचं उद्घाटन केलं. भारताच्या सेमिकंडक्टर इकोसिस्टमला
गती देण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या तीन दिवसांच्या परिषदेत देशातील मजबूत, लवचिक आणि शाश्वत सेमिकंडक्टर इकोसिस्टम पुढे नेण्यावर
भर दिला जाईल. यामध्ये सेमिकॉन इंडिया कार्यक्रमाची प्रगती, स्मार्ट उत्पादन, संशोधन आणि विकास आणि कृत्रिम बुद्धिमत्तेतील नवोपक्रम, गुंतवणूक संधी, राज्यस्तरीय धोरण अंमलबजावणी इत्यादी विषयांवर सत्रे होतील.
यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले...
बाईट
- पंतप्रधान नरेंद्र मोदी
****
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई इथले माजी पोलीस निरीक्षक सुनील
नागरगोजे यांनी काल रात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मूळचे परळी
तालुक्यातील नागदरा इथले सुनील नागरगोजे यांनी परभणी, लातूर, आणि बीड इथे सेवा बजावली होती.
****
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आझाद मैदानात मनोज जरांगे-पाटील
बेमुदत उपोषण आज पाचव्या दिवशीही सुरू आहे. पोलिसांकडून आझाद मैदान रिकामे करण्याची
नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी मैदान न सोडण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. ते म्हणाले, “आरक्षणाशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही. न्यायदेवता आमच्यावर
अन्याय करणार नाही. हैदराबाद आणि सातारा संस्थान गॅझेटची अंमलबजावणी झाल्याशिवाय आम्ही
इथून उठणार नाही.”
दरम्यान, आंदोलकांसोबत चर्चा करून चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघेल, असा विश्वास भंडाऱ्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी व्यक्त
केला आहे.
****
राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या
ताब्यातील अतिरिक्त जमिनींच्या व्यापारी तत्त्वावर वापरासंदर्भात महत्त्वाचा निर्णय
घेतला आहे. या निर्णयानुसार सार्वजनिक-खाजगी भागिदारीतून विकसित होणाऱ्या प्रकल्पाच्या
भाडेपट्टीची मुदत, ६० वर्षावरून ९८ वर्षापर्यंत
वाढवण्यात आली आहे. यामुळे एस.टी. महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक स्थैर्य
साधण्यास मदत होणार आहे, असं परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक
यांनी म्हटलं आहे.
****
सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय देताना स्पष्टपणे
सांगितले आहे की, फक्त आधार कार्डाचा
आधारावर कोणालाही भारतीय नागरिक म्हणून मान्यता दिली जाऊ शकत नाही. बिहारमध्ये सुरू
असलेल्या एस आय आर प्रक्रियेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने ही टिप्पणी केली. न्यायमूर्ती
सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठाने सांगितले की, आधार कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून वापरले जाऊ शकते, परंतु ते नागरिकत्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार
नाही. ही संपूर्ण सुनावणी राष्ट्रीय जनता दलाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या
पार्श्वभूमीवर झाली. बिहारमध्ये निवडणूक आयोगाने फक्त आधार कार्डाच्या आधारे नागरिकत्व
सिद्ध होत नाही, या कारणावरून ६५ लाख लोकांची नावे
मतदार यादीतून वगळली आहेत.
****
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत
संपल्यानं शासनानं हे मंडळ बरखास्त करुन पणन संचालक विकास रसाळ यांची प्रशासकपदी नियुक्ती
केली आहे. त्यांनी काल आपल्या पदाची सूत्रं हाती घेतली.
****
जागतिक बैडमिंटन चैंपियनशिप ही स्पर्धा पुढील वर्षी ऑगस्ट
महिन्यात नवी दिल्लीत होणार आहे. बैडमिंटन विश्व महासंघ-बी डब्ल्यु एफने ने काल पॅरिस
मध्ये बैडमिंटन विश्व चैंपियनशिप २०२५ च्या समारोप सोहळ्यात ही घोषणा केली. ही स्पर्धा
भारतात १७ वर्षांनी तर आशिया खंडात ४ वर्षांनंतर होत आहे. २००९ मध्ये हैदराबाद इथे
या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.
****
जम्मू काश्मीर मधल्या वैष्णो देवी मातेची तीर्थयात्रा
आज सलग आठव्या दिवशी स्थगित करण्यात आली. सातत्यानं पडत असलेला पाऊस आणि भूस्खलनाच्या
घटनांमुळे यात्रेचा मार्ग असुरक्षित झाल्यानं ही यात्रा थांबवण्यात आली आहे. प्रशासनाकडून
अधिकृत परवानगी मिळेपर्यंत भाविकांनी ही यात्रा करू नये, असं आवाहनही जम्मू काश्मीर प्रशासनानं केलं आहे.
****
No comments:
Post a Comment