Tuesday, 2 September 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.09.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 02 September 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ सप्टेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      भविष्यात भारताची मायक्रोचीप जगाला दिशा देईल-सेमिकॉन इंडियाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटियरची तत्काळ अंमलबजावणी करण्यासंदर्भातला शासननिर्णय राज्यशासनाकडून जारी 

·      तीन दिवसांच्या ज्येष्ठा गौरी उत्सवाची सांगता-पारंपरिक पद्धतीने महिला वर्गाचा गौरींना निरोप

आणि

·      राज्याच्या बहुतांश भागाला दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट

****

सेमीकंडक्टरमध्ये जगाचा विकास करण्याची शक्ती असून भविष्यात भारताची मायक्रो चीप जगाला दिशा देईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या यशोभूमी इथं आज सेमिकॉन इंडिया २०२५चं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. जागतिक चिप बाजारपेठेत भारताच्या वाढत्या प्रभावाकडे त्यांनी लक्ष वेधलं. २१ व्या शतकात, या लहान चिप्समध्ये मोठी शक्ती असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले.

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

२०२१ पासून मंजूर झालेल्या १० सेमीकंडक्टर प्रकल्पांमध्ये १८ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. या तीन दिवसीय परिषदेचा उद्देश भारताच्या सेमिकंडक्टर परिसंस्थेला गती देणं हा आहे. यामध्ये सेमिकॉन इंडिया कार्यक्रमाची प्रगती, स्मार्ट उत्पादन, संशोधन आणि विकास तसंच कृत्रिम बुद्धिमत्तेमधला नवोन्मेष, गुंतवणूक संधी, राज्यस्तरीय धोरण अंमलबजावणी इत्यादी विषयांवर सत्रं होणार आहेत.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यावेळी उपस्थित होते. इंडिया सेमिकंडक्टर मोहिम सुरू झाल्यापासून जग पूर्ण आत्मविश्वासाने भारताकडे पाहत असल्याचं ते म्हणाले. देशात पाच सेमिकंडक्टर युनिट्सचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. काही महिन्यांत आणखी दोन युनिट्द्वारे उत्पादन सुरू होईलं असं वैष्णव यांनी सांगितलं.

****

मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटियरची तत्काळ अंमलबजावणी करण्यासंदर्भातला शासननिर्णय राज्यशासनाने जारी केला आहे. आज मुंबईत मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या सुमारे तीन तास चाललेल्या बैठकीनंतर, मराठा समाज बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याकरता हैदराबाद आणि सातारा गॅझेटियरच्या अंमलबजावणीसंदर्भातल्या शासन आदेशाचा मसुदा अंतिम करण्यात आला. मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी या मसुद्याचं प्रारूप मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना दाखवून चर्चा केली.

 

या मसुद्यानुसार मराठा समाजातल्या पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठी चौकशी करून, सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्यासाठी गावपातळीवर समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीत ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी तसंच सहायक कृषी अधिकारी, यांचा समावेश असेल, असं या निर्णयात म्हटलं आहे.

 

राज्यशासनाने हैदराबाद गॅझेटियरचा शासन आदेश जारी केल्यावर मराठा आरक्षण आंदोलन थांबण्याची तयारी मनोज जरांगे पाटील यांनी दर्शवल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

 

मराठा आंदोलकांवर दाखल खटले मागे घेण्याबाबत महिनाअखेर पर्यंत निर्णय, या आंदोलनादरम्यान मरण पावलेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांना आठवडाभरात आर्थिक मदत, मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना सरकारी महामंडळात नोकरी, आदी आश्वासनंही सरकारच्या वतीनं देण्यात आले आहेत. आंदोलकांच्या वाहनांवर मुंबईत लादलेला दंड मागे घेण्याची तयारीही सरकारने दाखवली आहे.

****

राज्य सरकारनं एसटी, अर्थात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताब्यातल्या अतिरिक्त जमिनींचा व्यापारी तत्वावर त्वरित वापर करायला मान्यता दिली आहे. त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक स्थैर्य साधण्यात मदत होईल, असं परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. सरकारच्या सुधारित धोरणानुसार, एसटीच्या अतिरिक्त जमिनींचा विकास PPP, अर्थात सार्वजनिक-खाजगी सहभाग पद्धतीनं केला जाणार आहे. त्यासाठीची भाडेपट्टा कालमर्यादा ४९ वर्षे, अधिक ४९ वर्षे, अशी एकूण ९८ वर्षे इतकी असेल. या कालावधीत संबंधित जमिनींचा व्यापारी वापर करून मिळणाऱ्या उत्पन्नाचा ठराविक हिस्सा एसटी महामंडळाला जमा करणं बंधनकारक असेल.

****

भारत राष्ट्र समिती- बीआरएसच्या नेत्या के कविता यांना त्यांचे वडील आणि पक्षाचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांनी, पक्षातून निलंबित केलं आहे. कविता यांच्या पक्षविरोधी कारवायांमुळे ही कारवाई केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

चालू आर्थिक वर्षी एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान भारतातल्या व्यावसायिक कोळसा खाणींमधलं उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत ११ पूर्णांक ८८ शतांश टक्क्यांनी वाढल्याची माहिती कोळसा मंत्रालयानं दिली आहे. यंदा कोळशाचं उत्पादन १ कोटी ४४ लाख ३० हजार टन उत्पादन नोंदवलं गेलं आहे.

****

घरोघरी स्थापन ज्येष्ठा कनिष्ठा गौरींना आज निरोप दिला जात आहे. गेले दोन दिवस घरोघरी स्थापन झालेल्या आणि सोळा सुग्रास भाज्यांसह पंचपक्वान्नांचा प्रसाद ग्रहण करून संतुष्ट झालेल्या गौरींचं आज विसर्जन केलं जातं. आज सायंकाळनंतर सुवासिनींना सौभाग्यदानं देऊन या तीन दिवसीय उत्सवाची सांगता होत आहे.

****

सातासमुद्रापार राहणाऱ्या मराठी घरांमध्ये गणपती तसंच ज्येष्ठा गौरी उत्सवासाठी धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यात काटी इथे तयार झालेल्या मूर्ती तसंच मुखवट्यांची स्थापना करण्यात आली. काटी इथल्या कुंभार बंधूंनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून साधलेल्या यशाबद्दल श्रीकांत कुंभार यांनी माहिती दिली...

बाईट - श्रीकांत कुंभार

****

बालरंगभूमी परिषदेच्या बीड शाखेच्या वतीने गणेशोत्सवाचे औचित्य साधून अथर्वशीर्ष पठण हा उपक्रम दिनांक चार सप्टेंबर रोजी राबवला जाणार आहे. सौ के एस के महाविद्यालयाच्या सभागृहात परवा सकाळी ११ वाजता होणाऱ्या या उपक्रमात बीड मधल्या सर्व शाळांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन बीड नाट्य परिषदेच्या अध्यक्ष डॉ. दीपा क्षीरसागर यांनी केलं आहे. भारतीय संस्कृती, परंपरा याची माहिती मुलांना असावी तसंच त्याच्यांवरती उत्तम संस्कार व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे.

****

परभणी इथं जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, तसंच गंगाखेडच्या श्री संत जनाबाई कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने "पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा" घेण्यात आला. विविध क्षेत्रातल्या ३०० रिक्त पदांसाठी या मेळाव्यात मुलाखती घेण्यात आल्या, ३५१ उमेदवार या मेळाव्याला उपस्थित होते, त्यापैकी ८७ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी घेण्यात येतो. परंतु या महिन्यातील पहिल्या सोमवारी दिनांक एक सप्टेंबरला खुलताबाद इथल्या जर जरी जर बक्ष ऊर्स निमित्त स्थानिक सुट्टी होती. त्यामुळे महानगरपालिकेचा लोकशाही दिन आता येत्या सोमवारी आठ तारखेला सकाळी १० वाजता मनपाच्या प्रशासकीय समिती कक्षात होणार आहे.

****

नाशिक जिल्ह्याच्या सारूळ गावाच्या शिवारातील एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या जिलेटिन स्फोटकाचा डिटोनेटरसह मोठा अवैध साठा दडून ठेवल्याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने टाकलेल्या धाडीत अमोनियम नायट्रेटयुक्त असलेल्या जिलेटीनच्या कांड्यानी भरलेले ४९ बॉक्स असा सुमारे एक लाख रुपये किंमतीचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे.

****

भटक्या विमुक्त समाजाच्या समस्या आणि आव्हाने या विषयांवर आज छत्रपती संभाजीनगर इथं एक दिवसीय परिसंवाद घेण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि संशोधन संस्थेच्या सभागृहात झालेल्या या परिसंवादात भटके विमुक्त घुमंतू समाज कल्याण मंडळाचे सदस्य प्रवीण घुगे, संस्थेचे संचालक डॉ. संजय साळुंके, भटके विमुक्त विकास परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय पुरी तसेच व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. गजानन सानप यांची उपस्थिती होती.

****

विभागात पैठणच्या जायकवाडी धरणातून तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या सिद्धेश्वर धरणातून सध्या सुमारे साडे चौदा हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

माजलगाव धरणातून सुमारे सहा हजार दशलक्ष घनफूट, नांदेड जिल्ह्यात इसापूर धरणातून १५ हजार घनफूट तर परभणी जिल्ह्यातल्या येलदरी धरणातून सुमारे साडे पंधरा हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

****

हवामान

कोकण, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात हवामान विभागाने आज आणि उद्या पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यात आज पावसाची शक्यता आहे. विदर्भातल्या काही जिल्ह्यांना आज आणि उद्या तर कोकणात उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

****

No comments: