Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 05 September
2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ सप्टेंबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
· मुलींच्या शैक्षणिक गुंतवणुकीची कुटुंब, समाज
आणि देशाच्या उभारणीत अनन्यसाधारण भूमिका-राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्यात
राष्ट्रपतींचं प्रतिपादन
· मुस्लीम धर्मियांचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद ए मिलादुन्नबी
सर्वत्र साजरी
· उद्या अनंत चतुर्दशीनिमित्त गणपती विसर्जन मिरवणुकां पार्श्वभूमीवर प्रशासनाची
जय्यत तयारी
आणि
· महिला आशिया चषक हॉकी स्पर्धेत थायलंडवर मात करत भारताची विजयी सलामी
****
मुलींच्या शिक्षणातली गुंतवणूक ही कुटुंब, समाज आणि देशाच्या उभारणीत अनन्यसाधारण भूमिका बजावते, असं
प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. आज नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. अन्न, वस्त्र आणि निवारा या
मूलभूत गरजांप्रमाणेच शिक्षण हे व्यक्तीचा स्वाभिमान आणि संरक्षणासाठी अत्यावश्यक असून
संवेदनशील शिक्षक या भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवतात, असं
राष्ट्रपतींनी नमूद केलं. पुरस्कारविजेत्या शिक्षकांमध्ये महिलांची, तसंच ग्रामीण भागातल्या शिक्षकांची संख्या लक्षणीय असल्याचा उल्लेख करत, आधुनिक भारताच्या उभारणीत सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचा राष्ट्रपतींनी गौरवपूर्ण
उल्लेख केला. त्या म्हणाल्या –
बाईट - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित
होते. राष्ट्रपतींनी देशातल्या ६६ शिक्षकांना यावेळी पुरस्कार देऊन गौरव केला, त्यात राज्यातल्या ५ शिक्षकांचा समावेश आहे. यामध्ये बारामतीचे पुरुषोत्तम पवार, मुंबईच्या डॉ. नीलाक्षी सुभाष जैन आणि सोनिया विकास कपूर, नांदेडचे डॉ.शेख मोहम्मद वकीउद्दीन आणि लातूरचे प्राध्यापक डॉ. संदिपान जगदाळे
यांचा समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक
आणि विज्ञान विषयाचे शिक्षक डॉ.शेख मोहम्मद वकीउद्दीन यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून
शाळेला शिक्षणासोबतच सामाजिक सुधारणांचं केंद्र करण्याचं काम केलं. त्यांनी मुलींसाठी
तात्पुरत्या स्वरुपात शाळेची शाखा सुरु केली. ५ लाख सॅनीटरी नॅपकीन उपलब्ध करुन दिले
तसंच सामाजिक सहकार्यानं निधी उभारून शिक्षणासाठीची डिजीटल सामग्री उपलब्ध करून दिली.
लातूरच्या दयानंद कला महाविद्यालयातले संगीत विषयाचे प्राध्यापक
डॉ. संदिपान जगदाळे यांनी संगीत विषयाच्या अध्यापनाला शास्त्रीय ज्ञानासोबतच, नाविन्यपूर्ण प्रयोगांची जोड दिली. त्यांनी ब्रेल लिपीत संगीत अभ्यासक्रमाची पुस्तकं
तयार केली तसंच QR कोडवर आधारित अभ्यास साहित्य विकसित करून
संगीत शिक्षण अधिक सुलभ आणि परिणामकारक केलं. त्यांनी गोंड आदिवासी वस्त्यांमध्ये जाऊन
शिक्षणाचा प्रसार केला, तसंच एचआयव्ही बाधित विद्यार्थी
तसंच दिव्यांग विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व घेतलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या
आहेत. व्यक्तीमत्वांची जडणघडण करण्यासाठीचा शिक्षकांचा समर्पण भाव म्हणजे अधिक मजबूत
आणि उज्ज्वल भविष्याचा पाया असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
थोर विचारवंत आणि शिक्षक माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त
त्यांचं स्मरणही पंतप्रधानांनी केलं.
****
विकसित भारताची संकल्पना साकारण्यासाठी शिक्षकांनी ज्ञानदानातून
सक्षम पिढी घडवावी, असं आवाहन विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक
राम शिंदे यांनी केलं आहे. आज अहिल्यानगर इथं, जिल्हा
शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री
राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी सन २०२२, २३ आणि २४ या वर्षातील जिल्हा शिक्षक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात
करण्यात आले.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून दिल्या
जाणाऱ्या आदर्श पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे, यंदा
जिल्ह्यात नऊ प्राथमिक आणि सहा माध्यमिक अशा एकूण १५ शिक्षकांना आदर्श पुरस्कार जाहीर
झाले आहेत. येत्या १३ तारखेला या हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत.
****
दिवंगत डॉ. पतंगराव कदम हे शेती आणि मातीशी नातं जोडणारे नेते
असल्याचं,
माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
सांगली जिल्ह्याच्या कडेगाव तालुक्यात वांगी इथं पतंगराव कदम यांच्या “लोकतीर्थ” या
स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याच्या वर्षपूर्ती निमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत
होते. या कार्यक्रमाला आमदार विश्वजीत कदम, यांच्यासह
अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
ओबीसी समाजाच्या बारा मागण्या तातडीनं मंजूर करून त्याबाबतचा
शासन आदेश एक महिन्याच्या आत काढण्याचं आश्वासन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याणमंत्री
अतुल सावे यांनी दिला; त्यानंतर ओबीसी राष्ट्रीय महासंघानं आपलं
साखळी उपोषण काल मागे घेतलं. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊ नये आणि मराठा समाजाचा
समावेश कुणबी जातीत करू नये या प्रमुख मागण्यांसाठी नागपूर इथं संघटनेचे राष्ट्रीय
अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ३० ऑगस्टपासून साखळी उपोषण सुरू
करण्यात आलं होतं.
****
मुस्लिम धर्मियांचे
प्रेषीत हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद ए मिलादुन्नबी आज साजरी होत आहे. राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांनी ईदनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोहम्मद पैगंबर यांनी
एकता आणि मानवतेचा संदेश दिला; त्यांच्या शिकवणीतून प्रेरणा
घेऊन प्रत्येकानं समाजात प्रेम आणि बंधुतेची भावना जोपासण्यासाठी प्रयत्न करावेत, असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.
आज ईद ए मिलाद निमीत्त छत्रपती संभाजीनगर शहरात अन्नदान आणि
रक्तदान शिबीरांचं आयोजन करण्यात आलं आहे. यासोबतच विविध सामाजिक उपक्रमही राबवण्यात
येत आहेत. ईद-ए-मिलाद-उन-ईदनिमित्त जुन्या शहरातील मुख्य चौकात आकर्षक रोषणाई केली
आहे. दरवर्षी ईदच्या दिवशी विशेष मिरवणूक काढली जाते. परंतु यावर्षी पोलिस प्रशासनाच्या
विनंतीवरून ही मिरवणूक आजच्या ऐवजी सोमवारी ८ सप्टेंबर रोजी काढण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथं पैगंबर यांचा पवित्र
पोशाख तसंच पवित्र केसाचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं या ठिकाणी दाखल होत
आहेत. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
जश्न ईद ए मिलादुनबी निमित्त हिंगोलीत भव्य मोफत आरोग्य शिबीर
घेण्यात आलं. तज्ज्ञ डॉक्टरा मार्फत तपासणी करून मोफत औषध वाटप करण्यात आलं. ४६० गरजवंत
रुग्णांनी या मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतला.
****
गणेशोत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण राज्यभरात उत्साहाचं वातावरण
पाहायला मिळत आहे. दहा दिवसांच्या या चैतन्य पर्वाची उद्या शनिवारी अनंत चतुर्दशीला, सांगता होणार आहे. मोठ्या गणेश मूर्तींचं विसर्जन ऐवजी त्या संकलित करण्याचं आवाहन
करण्यात आलं असून, ठिकठिकाणी त्यासाठी संकलन केंद्र उभारण्यात
येणार आहेत. विसर्जन सोहळ्याची प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे.
गणेश विसर्जन सोहळ्यासाठी मुंबई पुण्यासह ठिकठिकाणच्या स्थानिक
प्रशासनानं सुरक्षा, स्वच्छता, आरोग्य
आणि पर्यावरणपूरक व्यवस्थेची काटेकोर आखणी केली आहे. ठिकठिकाणी विसर्जनासाठी कृत्रिम
तलावांची व्यवस्था करण्यात आली असून अनेक ठिकाणी मूर्तीदानाचा उपक्रम राबवण्यात येणार
आहे. वाहतुकीचं नियमन करण्यात येत असून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
पुण्यात उद्या सकाळी साडे नऊ वाजल्यापासून विसर्जन मिरवणुकीला
सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातले १७ रस्ते सकाळी सात वाजल्यापासून
ते मिरवणूक संपेपर्यंत बंद राहणार आहेत. आज मध्यरात्रीपासून ते ८ सप्टेंबरपर्यंत पुणे
शहरात सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेशबंदी देखील करण्यात आली आहे. वाहतूक पोलीस
विभागाने पर्यायी मार्ग तसंच पार्किंसाठीची व्यवस्था निश्चित केली असून नागरिकांनी
सहकार्य करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर
इथं वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. शहरातले मुख्य रस्ते उद्या सकाळपासून ते
विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहतील. शहरात गणेश विसर्जनाकरता
उद्या तीन हजार पोलिस तैनात केले असल्याची माहिती वाहतूक पोलिस आयुक्त सुभाष भुजंग
यांनी दिली. विसर्जनासाठी शहरात १४ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी पोलिस
आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
लातूर शहरातलेही मुख्य रस्ते उद्या वाहतुकीसाठी बंद असतील. नागरिकांनी
या काळात पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असं आवाहन शहर पोलिस
प्रशासनानं केलं आहे. लातूर महानगरपालिकेनं १५ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारले असून, यासाठी ४३० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात
आली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना मोठ्या मूर्तींचं विसर्जन १२ नंबर पाटी जवळील खदानीत
करता येणार आहे.
नांदेड जिल्ह्यात गणेश विसर्जन व्यवस्थेची तयारी अंतिम टप्प्यात
आली आहे. विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी पोलिस प्रशासनानेही चोख बंदोबस्त
लावला आहे.
बीड जिल्ह्यात सण-उत्सव शांततेत, सौहार्दपूर्ण
वातावरणात साजरे करण्याचं आवाहन पोलिस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी केलं आहे. उत्सवासाठी
कोणीही नागरिक किंवा व्यापाऱ्याकडून वर्गणीची सक्ती झाल्यास संबंधित व्यक्ती, मंडळ किंवा समितीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा
इशारा त्यांनी दिला.
****
अहिल्यानगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर इथं गणेशोत्सवानिमित्त
सामुहिक अथर्वशीर्ष पठण तसंच महाआरती करण्यात आली. शेकडो महिला यामध्ये सहभागी झाल्या.
एका ताल-सुरातल्या अथर्वशीर्ष पठणाने परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी देवस्थान ट्रस्टच्यावतीने
प्रातिनिधीक स्वरुपात महिलांचा सन्मान करण्यात आला, त्यानंतर
महाआरती तसंच प्रसाद वाटप करण्यात आलं.
****
महिला आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने थायलंडचा ११ -
शून्य असा पराभव करत या स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. या स्पर्धेत भारताचा उद्या
जपान संघासोबत सामना होणार आहे.
****
हवामान
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यासह राज्यात
जळगाव,
नाशिक, सातारा कोल्हापूर आणि रत्नागिरी
जिल्ह्याच्या काही भागांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment