Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 06
September 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ सप्टेंबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र यांनी अमेरिकेचे
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी
व्यक्त केलेल्या भावना आणि भारत-अमेरिका यांच्यातल्या संबंधांबद्दल सकारात्मक कृतज्ञता
व्यक्त केली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात अत्यंत सकारात्मक आणि भविष्याभिमुख व्यापक
जागतिक धोरणात्मक भागीदारी असल्याचं ते म्हणाले. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्यक्त केलेल्या भावना आणि उभय राष्ट्रांच्या संबंधांबद्दलच्या
वक्तव्याचं स्वागत केलं आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात 'सर्वसमावेशक आणि जागतिक धोरणात्मक
भागीदारी' असून, ती अत्यंत सकारात्मक आणि भविष्याचा वेध घेणारी आहे, असंही परराष्ट्र मंत्रालयानं
स्पष्ट केलं.
****
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष
डोनाल्ड ट्रम्प यांनी काल रात्री वॉशिंग्टनमध्ये पत्रकारांशी बोलताना भारत आणि अमेरिकेचं
विशेष नातं असून दोन्ही देशांमधील संबंधांबद्दल काळजी करण्याचे कारण नाही, असं म्हटलं, तसंच नरेंद्र
मोदी हे एक महान पंतप्रधान असून ते नेहमी मित्र राहतील असं भाष्य ट्रंम्प यांनी केलं.
या पार्श्वभुमीवर भारताकडून ही सकारात्मक प्रतिक्रिया आली आहे.
****
देशभरातील निवडणूक प्रक्रियांचा
आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं येत्या १० सप्टेंबरला एक बैठक बोलावली आहे.
देशातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना या महत्वपूर्ण बैठकीला बोलवण्यात आलं आहे.
****
राज्यात दहा दिवसांपासून सुरू
असलेल्या गणेशोत्सवाची आज अनंत चतुर्दशीला सांगता होत असून गणरायाला मनोभावे निरोप
दिला जात आहे. मुंबई, पुणे, मराठवाड्यासह इतर सर्व शहरांमध्ये सार्वजनिक तसंच घरगुती
गणपतींचं विसर्जन सुरू आहे.
****
दरम्यान, पुण्यात मानाचा
पहिला कसबा गणपती यांस पुष्पहार अर्पण करून भव्य वैभवशाली मिरवणूकीला सुरुवात झाली
आहे. या मिरवणुकीत केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री
अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील सहभागी झाले आहेत.
****
मुंबईचे मुख्य आकर्षण असलेल्या
लालबागचा राजा मंडळाच्या गणेशमूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीला काही वेळापुर्वीच सुरुवात
झाली आहे. गणेश मूर्ती आणि विसर्जन सोहळ्याचे भव्य रूप डोळ्यात आणि कॅमेरा साठवण्यासाठी
राजाच्या विसर्जन मिरवणूक मार्गावर भाविकांची अलोट गर्दी झाली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं घरगुती
गणपती विसर्जनास सुरुवात झाली आहे. धुळ्यातही सकाळ पासूनच पांझरा नदीत गणपती विसर्जनासाठी
भाविक गर्दी करत आहेत, नदीवर ११ ठिकाणी गणेश मूर्ती संकलनाची व्यवस्था करण्यात
आली आहे.
****
जालना शहरात महानगरपालिकेच्या
वतीनं गणपती विसर्जनाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनाकडूनही विसर्जन
मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक तयारी पुर्ण झाली असून, संपूर्ण विसर्जन मिरवणुकीवर
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे.
यावर्षी प्रथमच महानगरपालिकेनं
पर्यावरणपूरक गणपती विसर्जनासाठी मोती तलावाच्या पश्चिम बाजूला सुमारे १९ कोटी रुपयांची
निधी खर्चुन छत्रपती संभाजी महाराज विसर्जन कुंडाची निर्मिती केली आहे.
****
रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास
३६ हजार ५०५ घरगुती आणि ६१ सार्वजनिक गणेशमूर्तींचं विसर्जन केलं जाणार आहे. जिल्हा
प्रशासनाने या अनुषंगाने चोख व्यवस्था केली आहे. मांडवी किनारी नगर परिषदेने विशेष
व्यवस्था केली असून, निर्माल्य कलशही ठेवले आहेत.
****
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी
नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील सर्व तलावांमध्ये गणेश मुर्तींच्या विसर्जनाला पूर्णत:
बंदी घालण्यात आली असून शहरातील प्रमुख तलावांचे परिसर तसेच अन्य २१६ ठिकाणी एकूण ४१९
कृत्रिम विसर्जन तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार
सिंगल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना चोख बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
****
तेलंगणातील हैदराबादमध्ये
गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी हैदराबाद आणि सिकंदराबादमध्ये
जवळपास ३०हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मुख्य विसर्जन सोहळा हुसेनसागर
तलावावर होणार आहे. गणेश चतुर्थी उत्सव मिरवणुकीत लाखो भाविक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. हे लक्षात घेता, आज सकाळी सहा
वाजेपासून सर्व दारु दुकानं, बार-रेस्टॉरंट चोवीस तास बंद राहणार असल्याचं सूत्रांनी
सांगितलं.
****
प्रतिकूल हवामान आणि सुरक्षेच्या
कारणास्तव माता वैष्णो देवी यात्रा आज सलग १२व्या दिवशीही बंद आहे, गेल्या काही
दिवसांतील मुसळधार पावसामुळे त्रिकुटा पर्वतरांगांमध्ये भूस्खलन आणि रस्त्यात अडथळे
निर्माण झाले असून यात्रेकरूंकरिता मार्ग असुरक्षित असल्यानं हा निर्णय घेण्यात आला
आहे.
****
भारताच्या परकीय चलन साठ्यात
तीन अब्ज ५१ कोटी डॉलर्सची वाढ होऊन तो ६९४ अब्ज २० कोटी डॉलर्सपेक्षा जास्त झाला आहे.
२९ ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेच्या साप्ताहिक सांख्यिकी प्रकाशनानुसार, हा साठा सुमारे
पाचशे त्र्याऐंशी अब्ज नव्वद कोटी डॉलर्सवर पोहोचला आहे.
****
केंद्र आणि राज्यांचा समावेश
असलेल्या जीएसटी परिषदेनं जीएसटीत सुधारणा आणि दर कपात केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित
पवार यांनी स्वागत केलं आहे. जीएसटीतील बदल आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी
करण्याचा केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय आहे. यामुळे सामान्य माणसांचं राहणीमान सुधारेल, बाजारपेठेतील
मागणी वाढून अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळेल याचा लहान व्यावसायिकांना होईल, असं पवार यांनी
सामाजिक माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment