Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 06 September 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ सप्टेंबर २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
राज्यात दहा दिवसांपासून सुरू असलेल्या
गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची आज अनंत चतुर्दशीला सांगता होत आहे. लाडक्या बाप्पांना
भावपूर्ण निरोप देण्यासाठी गणेश मंडळं तसंच घराघरात जय्यत तयारी केली जात आहे. मुंबईत
७० नैसर्गिक स्थळं आणि २९० कृत्रिम तलावांमध्ये विसर्जनाची सोय करण्यात आली असून मुंबईतील
या विसर्जन सोहळ्यासाठी होणारी अलोट गर्दी लक्षात घेऊन विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे
पार पडावा, यासाठी मुंबई पोलिस सज्ज आहेत.
१८ हजाराहून अधिक पोलिस मुंबईत ठिकठिकाणी
तैनात केले आहेत. दहा हजार सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या माध्यमातूनही विसर्जन सोहळयावर
लक्ष ठेवण्यात येत आहे.
****
पुण्याच्या वैभवशाली पाच मानाच्या
गणपतींची ढोल ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढली जाते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज
सकाळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा केली. दरम्यान, शहरात आठ हजार पोलिस तैनात करण्यात
आले आहेत.
****
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी छत्रपती
संभाजीनगर शहरातले मुख्य रस्ते आज सकाळपासून
ते विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहेत. महानगरपालिकेनं
शहरात २१ ठिकाणी विसर्जन विहिरींची तसंच कृत्रीम तलावांची व्यवस्था केली असून, ४१ ठिकाणी गणेशमूर्ती संकलन केंद्रं उभारली आहेत.
****
परभणीमध्ये गेल्यावर्षी प्रमाणेच
यावर्षीही डीजे डॉल्बीमुक्त मिरवणूक काढण्याचं आवाहन पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी
यांनी सर्व गणेश मंडळांना केलं आहे.
****
नंदुरबारमध्ये मानाच्या दादा गणपतीचा
रथ दोरीने ओढत विसर्जन मिरवणूक सुरु झाली आहे. दादा आणि बाबा गणपतीच्या रथांची हरीहर
भेट ही या गणेश उत्सव मिरवणूकीच्या आकर्षणाचे केंद्रबिदु असते. दादा गणपतीचा रथ हा शहर भरातून फिरल्यानंतर त्याची जागोजागी भक्तांकडून
पुजा अर्चा आरती केली जातो. यानंतर रात्री दहाच्या सुमारास ही हरीहर भेट अपेक्षीत आहे.
दरम्यान, मिरवणूकीचा रथ ओढण्यासाठी आमदार विजयकुमार
गावितांसह सर्वपक्षीय नेते सहभागी झाले आहेत.
****
भारत रशियाकडून तेल आयात करणं सुरूच
ठेवेल, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला
सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. भारताच्या आयातीमध्ये कच्च्या तेलाचा वाटा सर्वात
जास्त असून देशाच्या हितालाच सर्वोच्च प्राधान्य दिलं जाईल असं त्या म्हणाल्या.
'जीएसटीमध्ये केलेल्या सुधारणांमुळे लोकं जास्त खरेदी
करतील, यामुळे देशाचा विकास होईल असा विश्वास
त्यांनी एका मुलाखतीत व्यक्त केला. सध्या ९९ टक्के वस्तू आणि सेवांवर शून्य, पाच किंवा १८ टक्के जीएसटी लागतो.
पेट्रोलियम आणि अल्कोहोलला मात्र जीएसटीच्या बाहेरच ठेवलं जाईल,' असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेनं
५० टक्के आयात शुल्क लावल्यामुळे अडचणीत आलेल्या भारतीय निर्यातदारांना सरकार मदत करणार
आहे. त्यांच्यासाठी लवकरच एक मदत पॅकेज तयार केलं जाईल, असंही सीतारामन यांनी सांगितलं.
****
मुसळधार पावसामुळे कालपर्यंत तात्पुरती
स्थगित करण्यात आलेल्या चार धाम यात्रा पुन्हा सुरु होणार आहे. उत्तराखंडमधील हवामानात
सुधारणा आणि रस्त्यांच्या दुरुस्तीमुळे, आजपासून चार धाम यात्रा आणि नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरू
झाली आहे. अतिवृष्टीमुळे रस्ते खराब झाल्याने गंगोत्री आणि यमुनोत्रीची यात्रा अजूनही
स्थगित आहे. रस्ता खुला झाल्यानंतर या दोन्ही तीर्थस्थळांची यात्रा पुन्हा सुरू होऊ
शकते. यासंदर्भात जिल्हा दंडाधिकाऱ्यांना गरजेनुसार यात्रा व्यवस्थापित करण्याचे किंवा
स्थगित करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
****
राज्यशासनाच्या कौशल्य विभागामार्फत
रोजगार आणि स्वयंरोजगार सेवा पंधरवडा साजरा केला जाणार आहे. १७ सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर
दरम्यान होणाऱ्या या पंधरवड्यात राज्यातल्या सुमारे ७५ हजार युवक आणि युवतींना कौशल्यविषयक
प्रशिक्षण दिलं जाणार आहे. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात
लोढा यांनी ही माहिती दिली. या पंधरवड्यात एक ऑक्टोबर रोजी राज्यातल्या ४१९ औद्योगिक
प्रशिक्षण संस्थांमध्ये या अभ्यासक्रमांचा शुभारंभ केला जाणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा लोकशाही दिन येत्या सोमवारी आठ तारखेला सकाळी
१० वाजता महानगर पालिकेच्या प्रशासकीय समिती कक्षात होणार आहे. धाराशिव जिल्ह्यातही
सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी सकाळी
११ ते एक या वेळेत जनता दरबार आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कीर्ती किरण
पुजार यांनी दिली.
****
राज्यात झालेल्या अतिवृष्टीचा अनेक जिल्ह्यांना फटका बसला असून २९ जिल्ह्यांतील
१९१ तालुक्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. राज्यातलं १४ लाख ४४ हजार ७४९ हेक्टर क्षेत्र
बाधित झालं आहे. या बाधित भागात सुरू केलेलं पंचनाम्याचं काम अंतिम टप्यात असून शेतकऱ्यांना
तातडीनं मदत देण्यात येईल, अशी ग्वाही कृषी मंत्री
दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळं नांदेड, वाशीम, यवतमाळ, धाराशिव, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये पिकांचं
मोठं नुकसान झालं आहे.
****
मध्य महाराष्ट्राचा घाट प्रदेश आणि
मराठवाड्यात आज सोसाट्याचा वारा, वीजांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. उत्तर कोकणातही मुसळधार पावसाची शक्यता
आहे.
****
आजपासून दक्षिण कोरियाच्या ग्वांगजू
शहरात विश्व धनुर्विद्या स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेत भारताचा १२ खेळाडूंचा संघ
सहभागी झाला आहे. गेल्या स्पर्धेत भारतानं ३ सुवर्णपदकं आणि १ कांस्यपदक जिंकून पहिलं
स्थान मिळवलं होतं.
****
No comments:
Post a Comment