Sunday, 7 September 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.09.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 07 September 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

आज पश्चिम राजस्थान आणि गुजरातमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याच्या इशारा हवामान विभागानं दिला असून या संदर्भातला लाल बावटा जारी केला आहे. वेधशाळेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार पूर्व राजस्थान, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा होण्याची शक्यता आहे. उर्वरीत देशातही पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. देशाच्या काही भागात पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं असून विशेषत: पंजाब राज्याला याचा मोठा फटका बसल्याचं दिसून येत आहे. या राज्यातल्या नद्यांमध्ये पुराचा प्रकोप कमी झाला असला तरी शेतजमिनी अद्याप पाण्याखाली आहेत. आताच आलेल्या वृत्तानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या  पैठणच्या नाथसागर- जायकवाडी धरणाची क्रमांक दहा ते २७ अशी एकूण १८ दारं दीड फुट उघडून गोदावरी नदीपात्रात नऊ हजार ४३२ क्युसेक वाढीव  विसर्गाद्वारे  एकंदर २८ हजार २९६  क्युसेक विसर्ग सुरू असणार  आहे. आवक बघून विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येईणार आहे. नदी काठच्या जनतेला प्रशासनानं सतर्कतेचं आवाहन केलं आहे.

****

वस्तू आणि सेवा कर-जी.एस.टी.च्या नव्या दरांमुळे सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणास चालना मिळणार असणार असून उत्पादन वाढीसह त्यांच्या मागणीतही वाढ होण्यासोबतच सहकारी संस्थांच्या उत्‍पन्‍नात वाढ होणार आहे. केंद्रीय सहकार मंत्रालयातर्फे ही माहिती देण्यात आली आहे. सुमारे जवळपास दहा कोटी दुग्ध उत्पादक कुटुंबियांना याद्वारे लाभ मिळणार आहे असही मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं. दुग्धोत्पादनांवरील जी.एस.टी.अठरावरुन पाच टक्के करण्यात आल्यानं ग्रामिण स्तरावरील उद्योजकता -महिलांचा सहभाग असलेल्या स्वयंसहायता गटांची कार्यक्षमता वाढीस लागणार असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

आज खग्रास चंद्रग्रहण असून ते भारतातून  स्पष्टपणे दिसणार आहे. चंद्रग्रहण आज रात्री  आठ वाजून ५८ मिनटांनी सुरु होईल आणि उत्तर रात्री दोन वाजून  २५  मिनटांनी  समाप्त होईल. सूर्य आणि चंद्राच्यामध्ये  पृथ्वी येवून त्याची सावली चंद्रावर पडते आणि चंद्रग्रहण घडते. पौर्णिमेच्या दिवशी सुर्य-पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आल्यानं ही एक दुर्लभ खगोलीय घटना घडते. एका दशकातील सर्वात दिर्घ  ग्रहणांतील हे एक ग्रह आहे. भारतासह अशिया, ऑस्ट्रेलिया, पूर्व अफ्रीका आणि यूरोपातील काही भागात हे खग्रास चंद्रग्रहण बघता येईल.

****

नक्षलवाद्यांचा म्होरक्या अमित हांसदा ऊर्फ अपटन हा पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला आहे. नक्षलवादी संघटनेचा विभागीय कमांडर असलेल्या अमितवर दहा लाख रुपयांचं बक्षीस होतं. झारखंडच्या पश्चिम सिंहभूम चिल्ह्याच्या चायबासा गावानजिक आराहासा भागातील बुरजूवा डोंगर परिसरात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली त्यात तो ठार झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. पोलिसांना प्राप्त माहितीनंतरच्या शोधमोहिमेदरम्यान ही कारवाई झाली. सध्या या संपूर्ण डोंगराळ परिसराला सुरक्षादलांनी वेढा टाकला असून नक्षलवाद्यांना  पळून जाण्याचे मार्ग बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

****

इटलीच्या व्हेनीस इथं आयोजित ८२व्या व्हेनीस आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय निर्मात्या अनुपर्णा रॉय यांना साँग्ज ऑफ फरगॉटन ट्रीज या पहिल्याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार मिळाला आहे. महोत्सवाच्या ओरीजॉन या विभागात चित्रपटांमधील नविन प्रवाहासाठी त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला असून तो मिळवणा-या रॉय या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत.

****

`संडे ऑन सायकल` अर्थात `रविवारी सायकल स्वारी` ही आता एक चळवळ म्हणून नावारुपाला आली असून निरोगी राहून स्वदेशीला चालना देण्यासाठी पन्नासपेक्षा जास्त खासदार आज यात सहभागी झाले आणि त्यांनी जनतेपर्यंत आरोग्य आणि स्वदेशी वस्तू वापराचा संदेश पोहोचवल्याचं केंद्रीय युवक कार्यक्रम आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीया यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत रेल्वे विभागात आयोजित गर्व से स्वदेशी या कार्यक्रमात ते बोलत होते. हे अभियान देशात आतापर्यंत आठ हजार ठिकाणी आयोजित करण्यात आलं असून दरम्यान,आता वस्तू आणि सेवा करांतील सुधारणेमुळं सायलवरील जी.एस.टी. कमी करुन फक्त पाच टक्के करण्यात आल्याचं ते म्हणाले.

****

आशिया करंडक पुरूष हॉकी स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत आणि दक्षिण कोरियादरम्यान होणार आहे. बिहारच्या राजगिर इथं सायंकाळी साडेसात वाजता हा सामना होईल. काल भारतानं सुपर फोरच्या सामन्यात चीनवर सात - शून्य असा दणदणीत विजय मिळविला.

****

प्रख्यात कवी-साहित्यीक दिवंगत बी.रघुनाथ उर्फ भगवान रघुनाथ कुलकर्णी यांचा आज स्मृतीदिन. फुलारी या टोपण नावानं त्यांच्या तत्कालीन मासिकांमधून कविता प्रसिध्द झाल्या.

मराठवाड्यात परभणी इथं नोकरीनिमित्त त्यांचं दीर्घ काळ वास्तव्य होतं. आज यानिमित्त, छत्रपती संभाजीनगर इथं बी. रघुनाथ स्मृती सोहळा होत आहे. टिळक नगरच्या ग्रंथमित्र भास्करराव आर्वीकर सभागृहात प्रसाद कुमठेकर यांच्या 'इतर गोष्टी' या कथा संग्रहाला बी. रघुनाथ पुरस्कार वितरण  तसंच मान्यवारांच्या  कविता सादरीकरणाचा कार्यक्रम होत आहे.

****

No comments: