Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 07 September
2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ सप्टेंबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
· जागतिक व्यापार संघटनेबरोबर खुल्या, निःपक्ष आणि समावेशक
पद्धतीच्या बहुपक्षीय व्यापार प्रणालीसाठी भारत वचनबद्ध
· गणपती विसर्जनानं गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची सांगता, विसर्जनादरम्यान
दूर्घटनांमध्ये १५ जणांचा मृत्यू
· नाथसागराची अठरा दारं दीड फुटानं उघडली
आणि
· जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत भारताला सुवर्णपदक
****
जागतिक व्यापार संघटनेबरोबर खुल्या, निःपक्ष
आणि समावेशक पद्धतीच्या बहुपक्षीय व्यापार प्रणालीसाठीची वचनबद्धता भारताने पुन्हा
एकदा स्पष्ट केल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने निवेदनात दिली आहे. शांघाय
सहकार्य संघटनेच्या काल झालेल्या बैठकीत भारताने सामायिक समृद्धीसाठी सामूहिक प्रयत्न
करण्यावरही भर दिला. निर्यातीमधलं अवलंबित्व कमी करणं, पुरवठा
साखळीतली लवचिकता वाढवणं या बाबी आवश्यक असल्याचंही भारतानं या बैठकीत अधोरेखित केलं.
व्यापार प्रवाह वाढवण्यासाठी समावेशक धोरण अवलंबणं महत्त्वाचं असल्याचंही भारतानं स्पष्ट
केलं आहे.
****
वस्तू आणि सेवा कर परिषदेने या कराच्या रचनेत नुकतेच क्रांतिकारी
बदल केले. त्यानुसार पुढच्या पिढीचं भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं लहान मुलांच्या
वापरातल्या विविध वस्तूंवरच्या करात कपात करण्यात आली आहे. त्यात बालकांना दूध पाजण्याच्या
बाटल्या,
निपल, डायपर, लहान मुलांची खेळणी, विशेषतः देशातल्या हस्तकला कारागीरांनी
बनवलेल्या बाहुल्या, इत्यादींवर १२ टक्के ऐवजी ५ टक्के कर राहणार
आहे. पेन्सिल शार्पनर आणि खोडरबर यांच्यावरचा कर शून्य टक्के झाला आहे. शालेय वह्या
पुस्तकं,
प्रयोगवह्या, आलेख वह्या, नकाशे,
अध्यापन उपयोगी उपकरणं यांच्यावरही शून्य टक्के कर राहील. कंपासपेट्या
आणि रंगपेट्या,
मुलांच्या तीनचाकी सायकल, हाताने
बनवण्यात आलेला कागद, दप्तरं, पत्त्यांचे
कॅट,
कॅरमबोर्ड आणि इतर बैठ्या आणि मैदानी खेळांचं साहित्य यावरचा
कर १२ टक्क्यांवरुन पाच टक्के झाला आहे. मात्र उंची दर्जाचे विशेष वापरासाठीचे कागद, वेष्टनासाठी वापरले जाणारे पुठ्ठे या सामुग्रीवरचा कर १२ ऐवजी १८ टक्के करण्यात
आला आहे. नवीन कररचना येत्या २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहे.
****
देशभरात काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनाने गणेशोत्सवाच्या
मंगलपर्वाची सांगता झाली. पुढच्या वर्षी लौकर येण्याचं आवाहन करीत लाडक्या गणरायाला
निरोप देण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमधील छावणी परिसरात परंपरेनुसार आज संध्याकाळी
विसर्जन मिरवणूक काढण्यात आली आहे. मुंबईत अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाला निरोप
देण्यासाठी सुरू झालेली विसर्जन मिरवणूक आज दुपारीही सुरू होती. हैदराबादमध्ये दोन
लाखापेक्षा जास्त गणेशमूर्तींचं विसर्जन शांततेत पार पडलं. खैरताबादच्या ६९ फूट उंचीच्या
महागणेश मूर्तीचं विसर्जन हुसैनसागर तलावात करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर येथील छावणी परिसरातील विसर्जन मिरवणुकीला
आज उत्साहात प्रारंभ झाला. परंपरेनुसार एक दिवस उशिरा छावणी परिसरातील गणेश मंडळाच्या
वतीनं बाप्पाला निरोप देण्यात येतो. लिटल फ्लॉवर इंग्लिश शाळेपासून मिरवणुकीस सुरुवात
झाली आहे. इंग्लिश हॉली क्रॉस शाळेजवळील विहिरीत विसर्जन करण्यात येणार आहे. यावेळी
छावणी परिसर तसेच नंदनवन कॉलनी, पडेगाव,
तिसगाव, भीमनगर, भवसिंगपुरा येथील गणेश मंडळं या मिरवणुकीत सहभागी होतात.
****
राज्यात सर्वत्र गणेश विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहोचला असतांना, काही ठिकाणी दुर्घटनांमुळं उत्सवाला गालबोट लागलं. विसर्जनादरम्यान राज्यात विविध
ठिकाणी १५ जणांचा मृत्यू झाला. यात नाशिकमधील चार जणांचा तर नांदेड जिल्ह्यातील दोन
तरुणांचा समावेश आहे. नांदेड मधील, गाडेगाव इथं आसना नदीत तर, नाशिक जिल्हात, सिन्नर तालुक्यातील सदरवाडी जवळील डोहात
आणि शहरातील आनंदवली इथं गोदावरी नदीपात्रात मूर्ती विर्सजनादरम्यान या दुर्घटना घडल्या.
वाशीम इथं एकाचा विसर्जनादरम्यान काल बुडून मृत्यू झाला.
****
आज खग्रास चंद्रग्रहण असून ते भारतातून स्पष्टपणे दिसणार आहे.
चंद्रग्रहण आज रात्री आठ वाजून ५८ मिनटांनी सुरु होईल आणि उत्तर रात्री दोन वाजून २५
मिनटांनी समाप्त होईल. सूर्य आणि चंद्राच्यामध्ये पृथ्वी येवून त्याची सावली चंद्रावर
पडते आणि चंद्रग्रहण घडते. पौर्णिमेच्या दिवशी सुर्य-पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आल्यानं
ही एक दुर्लभ खगोलीय घटना घडते. एका दशकातील सर्वात दिर्घ ग्रहणांतील हे एक आहे. भारतासह
अशिया,
ऑस्ट्रेलिया, पूर्व अफ्रीका आणि यूरोपातील
काही भागात हे खग्रास चंद्रग्रहण बघता येईल.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणच्या नाथसागर- जायकवाडी
धरणाची क्रमांक दहा ते २७ अशी एकूण १८ दारं दीड फुट उघडून गोदावरी नदीपात्रात नऊ हजार
४३२ घनफूट प्रतिसेकंद वाढीव पाणी सोडण्यात येत असून एकंदर २८ हजार २९६ घनफूट प्रतिसेकंद
पाणी सोडलं जात आहे. आवक बघून पाणी सोडण्याचं प्रमाण कमी अथवा जास्त करण्यात येणार
आहे. नदी काठच्या जनतेला प्रशासनानं सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
****
श्री नारायण गुरु यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी आज समाजावरील त्यांच्या प्रभावाचं आणि दृष्टिकोनाचं स्मरण केलं आहे. सामाजिक
संपर्क माध्यमातील आपल्या संदेशात मोदी म्हणाले की, समानता, सहानुभूती आणि जागतिक बंधुत्व या त्यांच्या शिकवणीचे आजही मोठं स्मरण केलं जातं.
पंतप्रधानांनी म्हटलं की, नारायण गुरु यांनी सामाजिक सुधारासाठी
आणि प्रेरणा देण्यासाठी शिक्षण सुरू ठेवण्याचं आवाहन केलं होतं.
****
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक परवा- मंगळवारी दिल्लीमध्ये होणार
आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ. सी.
पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, रालोआचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाच्या खासदारांची एक महत्वपूर्ण बैठक, शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उद्या दिल्लीत बोलावली
आहे. यासाठी खासदारांना आज रात्री दिल्लीत दाखल होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच
डॉ.राधाकृष्णन यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर ऑरिक स्मार्ट सिटी औद्योगिक उत्कृष्टतेच्या आणि परिवर्तनाच्या सहा वर्षांचा उत्सव
साजरा करत आहे. या अंतर्गत ६२ हजार ४०५ रोजगार निर्मीती क्षमता तसंच ७१ हजार ३४३ कोटी
रुपयांच्या गुंतवणुकीचं यश साजरं करण्यात येत आहे. बिडकीन औद्योगिक क्षेत्रात ४९ सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग, २७ मोठे उद्योग प्रकल्प आणि
चार बिगर एमएसएमई प्रकल्पांना भूखंड वाटप करण्यात आलं आहे. ऑरिक इथं उद्योगांच्या गरजा आणि कौशल्य यांचा मेळ घालण्यासाठी
सीआयआयच्या सहकार्यानं २० हजार चौरस फुटांचे कौशल्य विकास केंद्र उभारले जाणार असल्याचं
शासनातर्फे कळवण्यात आलं आहे. हे भारतातील राष्ट्रीय औद्योगिक
कॉरिडॉर विकास कार्यक्रम अंतर्गत उभारण्यात आलेल्या पहिल्या ग्रीनफिल्ड औद्योगिक स्मार्ट
सिटींपैकी एक आहे.
****
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते विविध विकास कामांचा एका शासकीय बैठकीत आढावा घेणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली
संध्याकाळी संत एकनाथ रंग मंदिरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावाही होणार आहे.
****
आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय निर्मात्या अनुपर्णा
रॉय यांना ‘साँग्ज ऑफ फरगॉटन ट्रीज’ या पहिल्याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
म्हणून पुरस्कार मिळाला आहे. महोत्सवाच्या ओरीजॉन या विभागात चित्रपटांमधील नविन प्रवाहासाठी
त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला असून. तो मिळवणाऱ्या
रॉय या पहिल्या भारतीय ठरल्या
आहेत.
****
नक्षलवाद्यांचा म्होरक्या अमित हांसदा ऊर्फ अपटन हा पोलिसांनी
केलेल्या कारवाईत ठार झाला आहे. नक्षलवादी संघटनेचा विभागीय प्रमुख असलेल्या अमितवर
दहा लाख रुपयांचं बक्षीस होतं. झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्याच्या चायबासा गावानजिक
आराहासा भागातील बुरजूवा डोंगर परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली
त्यात तो ठार झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
‘संडे ऑन सायकल’ अर्थात ‘रविवारी सायकल स्वारी’ ही आता एक चळवळ म्हणून नावारुपाला
आली असून निरोगी राहून स्वदेशीला चालना देण्यासाठी पन्नासपेक्षा जास्त खासदार आज यात
सहभागी झाले आणि त्यांनी जनतेपर्यंत आरोग्य आणि स्वदेशी वस्तू वापराचा संदेश पोहोचवल्याचं
केंद्रीय युवक कार्यक्रम आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीया यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत
रेल्वे विभागात आयोजित गर्व से स्वदेसी या कार्यक्रमात ते बोलत होते. हे अभियान देशात आतापर्यंत आठ हजार ठिकाणी आयोजित
करण्यात आलं आहे. दरम्यान, आता वस्तू आणि सेवा करांतील सुधारणेमुळं सायलवरील जी.एस.टी. कमी करुन फक्त पाच
टक्के करण्यात आल्याचं ते म्हणाले.
****
जागतिक धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघानं कंपाऊंड
प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं आहे. प्रथमेश भालचंद्र फुगे, ऋषभ
यादव आणि अमन सैनी या तिघांच्या भारतीय संघानं २५३ गुण नोंदवत फ्रांसच्या संघावर अंतिम
फेरीत मात केली. फ्रान्सच्या संघाला २३३ गुण नोंदवता आले. कोरियातील ग्वांगजू इथं ही
स्पर्धा सुरू आहे.
****
हिंगोलीत आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळेचं
उदघाटन आमदार तानाजीराव मुटकुळे आणि हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी
अंजली रमेश यांच्या हस्ते करण्यात आलं. या अंतर्गत १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान
विविध गावांमध्ये स्वच्छता, आरोग्या संदर्भात तपासणी होणार
आहे.
****
No comments:
Post a Comment