Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 07 September
2025
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ सप्टेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
· दहा दिवसांच्या
गणेशोत्सवाची सांगता-ढोल ताशांच्या गजरात गणरायाला निरोप
· छत्रपती
संभाजीनगर मनपाचा अभिनव उपक्रम-निर्माल्य जमा करणाऱ्यांना सेंद्रीय खताची भेट
· जीएसटी
सुधारणेमुळे सकल राष्ट्रीय उत्पादनात २० लाख कोटी रुपयांची भर पडणार - केंद्रीय मंत्री
अश्विनी वैष्णव यांची माहिती
· हैदराबाद
गॅझेटियर विरोधात ओबीसी संघटनांचा पुढच्या महिन्यात महामोर्चाचा इशारा
आणि
· आशिया करंडक
पुरूष हॉकी स्पर्धेत आज भारत - दक्षिण कोरियादरम्यान अंतिम सामना
****
दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची
काल सांगता झाली. जवळपास १२ तासांहून अधिक काळ चाललेला हा विसर्जन मिरवणूक सोहळा मोठ्या
उत्साहात पार पडला. मिरवणुका सुरळीत पार पडाव्यात यासाठी सर्वत्र प्रशासनाने चोख व्यवस्थापन
केलं होतं, शिवाय सगळीकडे पोलिस बंदोबस्तही लावण्यात आला होता.
मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी स्थापन केलेल्या गणेशाचं पारंपरिक
पद्धतीनं घराच्या अंगणात उभारलेल्या कृत्रीम कुंडात विसर्जन केलं. विसर्जनानंतर पत्रकारांशी
साधलेल्या संवादात मुख्यमंत्री म्हणाले...
बाईट- मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस
मुंबई गिरगाव चौपाटीवरही गणरायाला
निरोप देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुंबई महानगरपालिकेनं श्री गणरायला निरोप देण्यासाठी
विविध सोयी-सुविधांसह सुसज्ज ७० नैसर्गिक जलस्रोत आणि सुमारे २९० कृत्रिम तलाव उपलब्ध
करुन दिले होते.
पुण्यात विसर्जन मिरवणुका
मोठ्या जल्लोषात पार पडल्या. मानाच्या पाच गणपतींच्या पाठोपाठ इतरही मोठ्या मंडळांच्या
गणपतींचं शिस्तबद्ध मिरवणुकीत ढोल ताशांच्या निनादात विसर्जन झालं.
छत्रपती संभाजीनगर इथं ग्रामदैवत
संस्थान गणपतीची महाआरती करून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. महानगरपालिकेने शहरात
२१ ठिकाणी विसर्जन विहिरींची तसंच कृत्रीम तलावांची व्यवस्था केली तर ४१ ठिकाणी गणेशमूर्ती
संकलन केंद्रं उभारली होती. छत्रपती संभाजीनगरचे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी केलेल्या डीजे बंदीच्या
आवाहनाला प्रतिसाद देत, ढोल- ताशे, लेझीम आणि झांज वादनाच्या
पार्श्वभूमीवर निघालेल्या मिरवणुका सर्वांचं लक्ष वेधून घेत होत्या. विधान परिषदेचे
माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही ढोल वाजवत मिरवणुकीत सहभाग घेतला.
परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह
परदेशी यांनीही डॉल्बी मुक्त मिरवणुकांचं आवाहन केलं होतं. परभणी शहरातून टाळ मृदंगाच्या
गजरात निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत परदेशी यांनीही टाळ वाजवत सहभाग घेतला.
नांदेड इथं महापालिकेच्या
वतीनं २८ ठिकाणी मूर्ती संकलन तसंच निर्माल्य संकलन केंद्रांची व्यवस्था करण्यात आली
होती. याठिकाणी काल २५ हजार मेट्रिक टन निर्माल्य संकलित करण्यात आलं.
धाराशिव शहरात गणेश विसर्जन
मिरवणुकीत देशभक्तीपर देखावे साकारले होते. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना
फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर देशभरात उसळलेली संतापाची लाट आणि देशभक्तीची भावना, लोकमान्य
टिळक गणेश मंडळाने आपल्या मिरवणुकीतून सादर केली.
कालच्या विसर्जन मिरवणुकीचा
संक्षिप्त आढावा घेणारा हा वृत्तांत...
डीजे मुक्त मिरवणुका, गणेश मूर्तीचं दान आणि संकलन
तसंच विसर्जनासाठी कृत्रीम तलावांचा वाढता वापर, ही यंदाच्या गणेश विसर्जन
मिरवणुकीची महत्त्वाची वैशिष्ट्यं ठरली. गणेशभक्तांनी काल सकाळपासूनच घरगुती
गणपतींना निरोप द्यायला सुरुवात केली. दुपारनंतर मंडळांचे गणपती ढोल ताशाच्या
गजरात विसर्जन स्थळी यायला सुरुवात झाली. यंदा अनेक महापालिकांनी गणेश मूर्ती
संकलन उपक्रम राबवला. छत्रपती संभाजीनगर महापालिकेने तर गणेश मूर्तीसोबत
निर्माल्याचंही संकलन केलं, आणि त्याबदल्यात भाविकांना सेंद्रीय खताची भेट देऊन
सत्कार केला. ढोल ताशाचा गजर, गुलालाची उधळण, पावसाच्या बरसत्या धारा आणि ठिकठिकाणच्या गणेश
मंडळांच्या भंडाऱ्यांचा प्रसाद घेत भाविकांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला.
दरम्यान, नांदेड
जिल्ह्यात विसर्जनादरम्यान दोन तरुण बुडाल्याची घटना घडली. गाडेगाव इथं आसना नदीत तीन
तरुण बुडाले होते, त्यातल्या एकाला शोधण्यात आलं, तर १७ वर्षीय
योगेश उबाळे आणि १८ वर्षीय बालाजी उबाळे हे दोघे अद्यापही बेपत्ता आहेत. राष्ट्रीय
आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाकडून या दोघांचा शोध घेण्यात येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
वस्तू आणि सेवा कर -जीएसटीच्या
पुनर्रचनेचा लाभ सवर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा, याकडे जातीने लक्ष देणार असल्याचं, केंद्रीय
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या काल एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या
मुलाखतीत बोलत होत्या. नागरिकांना नव्या कर रचनेचे लाभ मिळत नसतील तर, त्यांनी
संबंधित यंत्रणेकडे तक्रार करावी, असं आवाहन सीतारामन यांनी केलं.
जीएसटी सुधारणेमुळे सकल राष्ट्रीय
उत्पादनात २० लाख कोटी रुपयांची भर पडणार असून, देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी
चालना मिळेल, असा विश्वास माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला आहे.
ते काल नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. हा मध्यमवर्गासाठी मोठा दिलासा असल्याचं
वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले,
बाईट- माहिती
आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव
दरम्यान, या पुनर्रचनेमुळे
वस्त्र आणि पादत्राणं स्वस्त झाली आहेत. हाताने विणलेले कपडे आणि भरतकाम केलेल्या शाली
यांच्यावर पूर्वी १२ टक्के कर आकारला जात होता, तो आता पाच टक्के करण्यात
आला आहे. यासंदर्भात पैठणी विणकर कविता ढवळे यांनी आपलं मत या शब्दांत नोंदवलं...
बाईट- पैठणी विणकर
कविता ढवळे
टोप्या तसंच छत्र्यांवरचा करही १२ वरून ५ टक्के झाला आहे.
अडीच हजारांपेक्षा कमी दर असलेल्या पादत्राणांवरही पाच टक्के कर लागू असेल, तर अडीच
हजारांपेक्षा जास्त दर असलेल्या कपड्यांवरचा कर १२ टक्क्यांवरून वाढवून १८ टक्के झाला
आहे.
****
मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद
गॅझेटियर लागू करण्याच्या राज्यशासनाच्या निर्णयाविरोधात
ओबीसी संघटनांनी महामोर्चाचा इशारा दिला आहे. विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांच्या ओबीसी
संघटनांची काल नागपूर इथं बैठक झाली, ओबीसी नेते तथा काँग्रेसचे
विधान सभेतले पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी उपस्थित होते. राज्य सरकारने मराठा समाजाला
ओबीसींतून आरक्षण देण्यासाठी काढलेल्या पहिल्या शासन निर्णयात पात्र असा शब्द वापरला
होता. मात्र नंतर दुसरा शासन निर्णय काढून पात्र हा शब्द वगळण्यात आला. याविरोधात ऑक्टोबर
महिन्यात नागपुरात ओबीसींचा महामोर्चा काढणार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज
बी. रघुनाथ स्मृती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. टिळक नगरातील ग्रंथमित्र भास्करराव
आर्वीकर सभागृहात होणाऱ्या या सोहळ्यात, प्रसाद कुमठेकर यांच्या 'इतर गोष्टी' या कथा
संग्रहाला बी. रघुनाथ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मान्यवर कवींच्या कवितांवर
आधारीत शताब्दी कवितांचं सादरीकरणही यावेळी केलं जाणार आहे.
परभणी इथंही मराठवाडा साहित्य
परिषदेची परभणी शाखा आणि अक्षर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं आज बी. रघुनाथ
महाविद्यालयात कविसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
आशिया करंडक पुरूष हॉकी स्पर्धेचा
अंतिम सामना आज भारत आणि दक्षिण कोरियादरम्यान होणार आहे. बिहारच्या राजगिर इथं सायंकाळी
साडेसात वाजता हा सामना होईल. काल भारतानं सुपर फोरच्या सामन्यात चीनवर सात - शून्य
असा दणदणीत विजय मिळवत पदकतालिकेत पहिला क्रमांक मिळवला.
दरम्यान, चीन मध्ये
सुरु असलेल्या महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत-जपान सामना दोन-दोन असा अनिर्णित
राहिला. भारतीय संघाचा उद्या सिंगापूरसोबत सामना होणार आहे.
****
नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर
वाढल्यामुळे पैठणच्या जायकवाडी धरणातली आवक वाढली असून, सध्या धरणात १७ हजार दशलक्ष
घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत आहे
****
हवामान
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर
आणि जालन्यासह राज्यात आज कोकण तसंच विदर्भातल्या काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
तर पालघर आणि नाशिक जिल्ह्याच्या काही भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment