Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 09 September 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ सप्टेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
उपराष्ट्रपतिपदासाठी आज निवडणूक, राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांच्यात
थेट लढत
·
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल
१५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
·
छत्रपती संभाजीनगर शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेत बेघर झालेल्या
परिवारांना मोफत घर देण्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
·
जीएसटी पुनर्रचनेमुळं नागरिकांना दिलासा, गंभीर आजारावरच्या
औषधांवर आता शून्य टक्के कर
आणि
·
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून प्रारंभ, युएई संघासोबत
भारतीय संघाची उद्या पहिली लढत
****
उपराष्ट्रपतिपदासाठी आज
मतदान होत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार, महाराष्ट्राचे
राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश
न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत होणार आहे. लोकसभेचे ५४२ आणि राज्यसभेचे
२३९ सदस्य मिळून ७८१ सदस्य उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी
मतदान करतील. या निवडणुकीत उमेदवाराला विजयासाठी किमान ३९१ मतांची
आवश्यकता आहे.
****
व्हिजन
डॉक्युमेंट २०४७ ही भविष्यासाठीची आपली मार्गदर्शक तत्त्वं असून, या व्हिजन
नुसार भविष्यातील राज्याची धोरणं तयार करावीत असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी केलं आहे. सह्याद्री अतिथीगृह इथं विकसित महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट २०४७
बाबत झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते.
दरम्यान, वैनगंगा-नळगंगा
नदीजोड प्रकल्पाला गती देण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सादर
करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे विदर्भ
आणि मराठवाडा विभागातील पाणीटंचाई दूर करण्यासोबतच शेतीला शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध
होणार आहे. याबाबतच्या आर्थिक नियोजनासाठी केंद्र सरकारकडे निधी संदर्भात पत्र पाठवून
पाठपुरावा केला जाईल असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं अतिक्रमण हटाव मोहिमेत बेघर झालेल्या परिवारांना मोफत घर देण्यात येईल, त्यासाठी
म्हाडाकडून घरं मिळवण्याची प्रक्रिया राबवावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. काल छत्रपती संभाजीनगर इथं यासंदर्भातल्या आढावा बैठकीत
त्यांनी हे निर्देश दिले. मोकळ्या झालेल्या रस्त्यांचा विकास आराखडा तयार करण्यात आला
असल्याचं, यावेळी सांगण्यात आलं. शहराच्या
पाणी पुरवठा व्यवस्थेबाबतही उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर काल सादरीकरण करण्यात
आलं. दररोज पाणी पुरवठ्यासाठीच्या उपाययोजना, सांडपाणी प्रक्रिया
इत्यादीबाबतही या बैठकीत आढावा घेण्यात आला.
दरम्यान, अतिवृष्टीग्रस्त
शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
ते काल पत्रकारांशी बोलत होते...
बाईट
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
****
जीएसटी
पुनर्रचनेत सरकारने अनेक औषधांवरचा कर शून्य टक्के केला आहे. यामुळे नागरिकांना मोठा
दिलासा मिळणार आहे. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून...
‘‘वैद्यकीय
क्षेत्रात उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तू, रसायनं
आणि उपकरणांवरचा जीएसटी कर आता ५ टक्क्यांवर आणला आहे. वैद्यकीय
वापरासाठीचा ऑक्सीजन, अमोनिया, तसंच
सल्फ्युरिक आणि नायट्रिक अॅसिड वरचा
कर पूर्वी १८ टक्के होता. रबरी हातमोजे, थर्मामीटर, विविध
तपासण्यांसाठीचे संच, उपकरणं, चष्म्याची
भिंगं, कॉन्टॅक्ट लेन्सेस, गॉगल्स
मलमपट्टीसाठी वापरली जाणारी बँडेजेस, या सर्वांवरचा कर आता १२
टक्क्यांऐवजी ५ टक्के राहील.
याखेरीज अनेक गंभीर
आजारावरच्या औषधांवरचा कर आता शून्य टक्के झाला आहे.’’
****
राष्ट्रीय
अंधत्व निवारण आणि दृष्टिदोष नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जागतिक आरोग्य संघटनेचा ‘स्पेक्स
२०३०- वन साईट प्रकल्प” राज्यातल्या गडचिरोली जिल्ह्यासह देशातल्या पाच मागास जिल्ह्यांमध्ये
राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, जनजागृती,
शाळा आणि ग्रामपंचायत स्तरावर आरोग्यविषयक संवाद यासारखे विविध उपक्रम
राबवले जाणार आहेत.
****
मराठा समाजाला
ओबीसींतून सरसकट आरक्षण, ही बाब अन्यायकारक असल्याची टीका, ओबीसी
नेत्यांनी केली आहे. काल राज्यातील विविध ओबीसी संघटनाची बैठक झाली, त्या बैठकीत ही भूमिका मांडण्यात आली. ओबीसी नेते तथा काँग्रेसचे विधान सभेतले
पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी उपस्थित होते. यासंदर्भातल्या शासन निर्णयाविरोधात
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नागपुरात ओबीसींचा महामोर्चा काढणार येण्यात
आहे. तसंच विविध ओबीसी संघटना या आठवड्यात न्यायालयात याचिका देखील दाखल करणार असल्याचं
वडेट्टीवर यांनी सांगितलं.
****
इतर मागास
वर्ग - ओबीसींचं नुकसान होईल असा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही, अशी ग्वाही
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते काल नागपूर इथं माध्यमांशी बोलत
होते. ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक
बोलावली असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.
****
हैदराबाद
गॅझेटनुसार एसटी आरक्षणात बंजारा समाजाचा समावेश करावा या प्रमुख मागणीसाठी येत्या
१५ तारखेला बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अनुसुचित जमातीच्या
आरक्षणासाठी काल बीड इथं बंजारा समाजाची बैठक घेण्यात आली, त्यात हा
निर्णय घेण्यात आला. दरम्यान, बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांनी
काल आमदार विजयसिंह पंडित यांना यासंदर्भात निवेदन सादर केलं. पंडित यांनी या मागणीला
पाठिंबा दर्शवत, यासाठी आपण प्रयत्न करणार
असल्याची ग्वाही दिल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
ईद ए मिलादुन्नबी
निमित्त काल छत्रपती संभाजीनगरातून जुलूस ए मोहमंदी काढण्यात आला. मुस्लीम धर्मियांचे
प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीदिनी, गेल्या शुक्रवारी
हा जुलूस काढला जाणार होता. मात्र अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाच्या
आवाहनाला प्रतीसाद देत, हा जुलूस काल काढण्यात
आला. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी या जुलूसला हिरवा झेंडा दाखवत, आयोजकांच्या या भूमिकेचं कौतुक केलं.
****
धाराशिव
शहरात वक्फ मंडळाच्या जमिनीवरील अतिक्रमणे काढून नियमानुसार केलेल्या बांधकामांना सुविधा
उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी यांनी दिले आहेत.
काझी यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत
होते. जबरदस्तीने जमिनी ताब्यात घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल तसंच संबंधितांविरुद्ध
गुन्हे दाखल करण्यात येतील, असं काझी यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्यात
धारणगाव इथल्या नदीवरील पुलाच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
आंदोलन केलं. ई-पीक पाहणीसाठी नदी ओलांडून
जात असताना गजानन डुकरे या युवकाचा मृत्यू झाला. गावकऱ्यांनी त्याचा मृतदेह जिल्हाधिकारी
कार्यालयात आणत सदर नदीवर पुल बांधून देण्याची मागणी केली.
**
दरम्यान, पालम तालुक्यातल्या
खोरस गावातले परमेश्वर खंडागळे यांचाही पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला.
त्यांच्या पत्नी रंजनाबाई खंडागळे यांना आमदार रत्नाकर गुट्टे, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्या उपस्थितीत चार लाख रुपये मदतीचा धनादेश
काल देण्यात आला.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर वैजापूर महामार्गावर काल सकाळी दुचाकी आणि चारचाकीचा अपघात
झाला. या अपघातात एका कुटुंबातील सुमारे वर्षभराच्या अर्भकासह तीन जणांचा घटनास्थळी
मृत्यू झाला.
****
लातूर जिल्ह्यात
निलंगा इथं काल अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं
रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या शेतकऱ्यांना सरकारने तातडीनं एकरी पन्नास हजार
रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पक्षाच्या वतीनं करण्यातं आली.
****
बीड ते
परळी वैजनाथ रेल्वे मार्गातील भूसंपादनाचे अडथळे दूर करून, ही प्रक्रिया
वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिल्या आहेत. ते काल
याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. बीड रेल्वे स्थानकाची जिल्हाधिकाऱ्यांनी काल पाहणी
केली.
****
डॉ. बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत धाराशिव जिल्हा युवा महोत्सवाला कालपासून अणदूर
इथल्या जवाहर महाविद्यालयात प्रारंभ झाला. कुलगुरू डॉ. विजय फुलारी, सिने अभिनेते
उमेश जगताप यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. आजच्या तरुणाईने मोबाईलच्या
विळख्यातून बाहेर पडण्याचं आवाहन जगताप यांनी यावेळी केलं. यावेळी काढण्यात आलेल्या
शोभायात्रेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
****
जालना जिल्ह्यात
शेवगा सारवाडी ग्रूप ग्रामपंचायत सदस्याच्या पतीला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने काल तीन
हजार रुपये लाच घेतांना रंगेहाथ अटक केली. नारायण खंडागळे असं या आरोपीचं नाव आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाचा पहिला हप्ता देण्यासाठी आरोपीने लाच
मागितली होती.
****
नांदेड
विभागातील परतूर आणि सेलू रेल्वे स्थानकावरील जनशताब्दी एक्सप्रेसच्या प्रायोगिक थांब्याला
पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदत १४ सप्टेंबरला संपणार होती.
****
आशिया चषक
क्रिकेट स्पर्धेला आजपासून प्रारंभ होत आहे. संयुक्तअरब अमिराती युएई मध्ये होत असलेल्या
या स्पर्धेत आज पहिला सामना अबुधाबी इथं अफगाणिस्तानआणि हाँगकाँग संघात होईल. भारताचा
पहिला सामना उद्या दुबईत युएई संघासोबत तर येत्या १४ तारखेला पाकिस्तान सोबत होणार
आहे.
****
आशियाई
महिला हॉकी चषक स्पर्धेत भारताच्या संघानं सिंगापूरवर १२-० असा दणदणीत विजय मिळवत सुपर
फोर फेरीत धडक मारली आहे. भारताचा उद्या दक्षिण कोरियासोबत पुढचा सामना होणार आहे.
****
पैठणच्या
जायकवाडी धरणात सध्या सुमारे ३६ हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक
होत असून, ३७ हजार ७२८ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू आहे.
****
हवामान
विदर्भातल्या
बहुतांश जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
****
No comments:
Post a Comment