Friday, 19 September 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.09.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 19 September 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

ट्रॅक्टर आणि इतर कृषी उपकरणांवर कमी करण्यात आलेला वस्तु आणि सेवा कर- जी एस टी चा थेट लाभ शेतकऱ्यांना झाला पाहिजे, असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं आहे. आज नवी दिल्लीत कृषी औजारं आणि उपकरणांची विक्री करणाऱ्या संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. कृषी औजारं आणि उपकरणांवरील जीएसटी १२ ते १८ टक्क्यांवरुन पाच टक्के इतका कमी केल्यामुळे ट्रॅक्टर आणि इतर उपकरणांच्या किंमतीमध्ये लक्षणीय घट होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ही घट २३ हजार ते ६३ हजार रुपयांपर्यंत असणार असून, हा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा असं आवाहन त्यांनी या प्रतिनिधींना केलं. ते म्हणाले,

बाईट - केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान

****

दरम्यान, जीएसटी कररचनेत केलेल्या बदलांमुळे ऑटोमोबाईल उद्योगावर सकारात्मक परिणाम होणार आहेत. नवीन जीएसटी सुधारणांअंतर्गत, सरकारने ३५० सीसी पर्यंतच्या दुचाकी वाहनांवरील जीएसटी दर २८ टक्क्यांवरून १८ टक्के केला आहे. यामुळे निम्न आणि मध्यमवर्गीय कुटुंबं, तरुण व्यावसायिक आणि त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी परवडणाऱ्या वाहतुकीवर अवलंबून असलेल्या गिग कामगारांना दिलासा मिळेल. छोट्या कारवरील जीएसटी देखील मागील २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे. या निर्णयामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी कार खरेदी अधिक परवडणारी होईल आणि या क्षेत्राला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. नवीन जीएसटी दर सोमवारपासून लागू होतील.

****

हैदराबाद गॅझेटियरच्या सरकारच्या शासन निर्णयामुळे मराठवाडा पेटला असून, ओबीसी समाजात अस्वस्थता वाढत असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. या प्रश्नावर सरकारने बैठक बोलवावी, ओबीसी आरक्षणाला धक्का लागला आहे याचे पुरावे आम्ही देऊ, असं त्यांनी सांगितलं. ओबीसी उपसमितीचे सदस्य असलेले ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे बाहेर एक भूमिका मांडत आहे तीच भूमिका त्यांनी बैठकीत मांडावी, असंही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

****

परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर यामुळे शेतपिकांच्या नुकसानीसाठी राज्य शासनाने १२८ कोटी ५५ लाख रुपये इतका निधी मंजूर केला आहे. यावर्षी जून, जुलै आणि ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे परभणी जिल्ह्यातल्या दोन लाख ३८ हजार ५३० शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं आहे. या नुकसान भरपाईबद्दल पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी राज्य सरकारचे आभार मानले. सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं आहे, त्याचे पंचनामे सुरू असून लवकरात लवकर मदत उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

****

श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला असून, भाविकांच्या सोयीसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तुळजापूर कडे येणाऱ्या प्रत्येक मार्गावर २२ आरोग्य पथकं कार्यान्वित करण्यात आली असून, तुळजापूर शहरात १३ प्रथमोपचार केंद्र सुरु करण्यात आली आहेत. यात्रा मार्गावर आणि शहरात प्रत्येकी १० साथरोग प्रतिबंधात्मक पथकं असतील, याद्वारे यात्रा मार्गावरच्या आणि शहरातल्या सर्व पाणी स्त्रोतांची, तसंच हॉटेल, धाबे, लॉज आदी ठिकाणची पाणी तपासणी आणि शुद्धीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय रुग्णवाहिका, आयसीयू सेंटर, आरोग्य दूत, आदी सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्याचं, आरोग्य विभागानं कळवलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात काल ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे डोंगरगाव पूल इथं कयाधु नदीला पुन्हा पूर आला असून, शेतात पाणी शिरल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

माजलगाव धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीपताळीत वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातून सध्या पाच हजार ९१९ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सिंदफणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

****

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना ओमानशी होणार आहे. अबूधाबीच्या शेख झायेद मैदानावर रात्री आठ वाजता हा सामना सुरू होईल.

दरम्यान, काल या स्पर्धेत श्रीलंकेच्या संघानं अफगाणिस्तानचा सहा गडी राखून पराभव करत सुपर फोर मध्ये स्थान मिळवलं.

****

पालघर जिल्ह्यातल्या लिंबानी सॉल्ट इंडस्ट्रीज केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. त्यापैकी दोघांची स्थिती गंभीर असून त्यांना मुंबईला उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. प्राथमिक तपासानुसार, काल संध्याकाळी केमिकल मिसळताना अचानक स्फोट झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.12.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 28 December 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी...