Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 19 September
2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ सप्टेंबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
· जीएसटी सुधारणांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून
व्यक्त
· पंतप्रधानांच्या मिशन ग्रीन स्टीलमध्ये महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची-मुख्यमंत्र्यांना
विश्वास
· राज्यातल्या १०९ शिक्षकांचा येत्या सोमवारी गुणगौरव पुरस्काराने सन्मान
· यंदाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्रसिद्ध हिंदी कवी कुमार अंबुज
यांना जाहीर
आणि
· संपूर्ण राज्यात आज पावसाचा यलो अलर्ट
****
कृषी उपकरणांवरील वस्तू आणि सेवा करामधल्या सुधारणांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत
पोहोचणं गरजेचं आहे असं केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह
चौहान यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्लीत कृषी उपकरणांसंबंधी
एका बैठकीत बोलत होते. कृषी यंत्रांवरचा कर १२ ते १८ टक्क्यांवरुन पाच टक्क्यांवर आणण्यात
आला आहे. या लाभांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठा फरक पडेल, असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला. ते म्हणाले –
बाईट - केंद्रीय
कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान
दरम्यान, जीएसटी कररचनेत केलेल्या बदलांमुळे
ऑटोमोबाईल उद्योगावर सकारात्मक परिणाम होणार आहेत. सरकारने ३५० सीसी पर्यंतच्या दुचाकी
वाहनांवरील जीएसटी दर २८ टक्क्यांवरून १८ टक्के तर छोट्या कारवरील कर २८ टक्क्यांवरून
१८ टक्के केला आहे. हे नवे दर सोमवारपासून लागू होतील.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिशन ग्रीन स्टीलमध्ये महाराष्ट्र
सर्वांत मोठी भूमिका बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत ए आय आय एफ ए स्टीलेक्स २०२५ या स्टील महाकुंभाचं
उदघाटन केल्यानंतर आज ते बोलत होते. २०२६ पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना दिली जाणारी
१६ हजार मेगावॅट वीज पूर्णपणे सौरऊर्जेतून दिली जाणार आहे. त्यामुळे उद्योगांसाठी वीजदर
पुढील पाच वर्षे दरवर्षी कमी होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्याच्या
स्टील क्षेत्रात सुमारे ८० हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे प्रकल्प आले असून, येत्या काळात महाराष्ट्र देशात स्टील उत्पादनात पहिल्या क्रमांकावर येईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी कंपन्यांना ग्रीन स्टील प्रमाणपत्राचं
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं.
****
सेवा आणि सुशासन या सूत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नरत
आहे. आज,
सेवापर्व या विशेष मालिकेत सरकारनं बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहिमेतून प्रत्येक मुलीसाठी सन्मान, संरक्षण
आणि शिक्षणाची केलेली सुनिश्चिती, याविषयी जाणून घेऊ.
हरियाणातील
ऐतिहासिक पानिपतच्या भूमीवर २२ जानेवारी २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
एक नवा इतिहास घडवला. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुलींना सन्मान
देण्यासाठी “बेटी बचाओ, बेटी पढाओ” या योजनेचा शुभारंभ केला.
आज से हमारे देश में एक हजार
बालक पैदा हो, तो इसके सामने एक हजार बालिकायें भी पैदा होनी चाहिये। वरना संसार चक्र
नही चल सकता। आज पुरे देश में ये चिंता का विषय है। यहीं आपके हरियाणा में झज्जर जिला
देख लिजीये, महेंद्रगढ जिला देख लिजीये, एक हजार बालक के सामने पौने आठ सौ बच्चीयां
है। हजार में करीब करीब सवा दो सौ बच्चे कुंवारें रहने वाले है। मै जरा माताओं से पुछ
रहां हूं, अगर बेटी पैदा नही होगी, तो बहू कहां से लाओगे।
देशाच्या
भविष्यासाठी महत्त्वाची असलेल्या या योजनेचा उद्देश मुलींचा सन्मान करणे आणि
त्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेद्वारे,
केवळ स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यात यश मिळाले नाही,
तर बाललिंग गुणोत्तर संतुलित करण्याचे प्रयत्नही केले जात
आहेत.
पंतप्रधान
मोदींचे स्वप्न देशाच्या विकासात महिलांचा सहभाग हे आहे. बेटी बचाओ,
बेटी पढाओ योजना ते प्रत्यक्षात आणण्याच्या प्रयत्नांचा भाग
आहे.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना
केवायसी प्रकिया सुलभपणे पुर्ण करण्यासाठी ई-केवायसी सुविधा देण्यात आली आहे. लाभार्थी
महिलांनी दोन महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन महिला आणि बालविकास मंत्री
आदिती तटकरे यांनी केलं आहे. ladakibahin.maharashtra.gov.in या पोर्टलवर ही प्रक्रिया करता येणार आहे.
****
शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सहाय्यक परिक्षण अनुदानाचा
पहिला हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उच्च तथा तंत्र शिक्षण मंत्री
चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. १० हजार ५४६ ग्रंथालयांच्या थेट बँक खात्यात
हे अनुदान जमा केलं जात आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज गोदावरी खोरे पाटबंधारे विकास महामंडळाच्या
नियामक मंडळाची विभागीय बैठक पार पडली. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या
उपस्थितीत झालेल्या या बैठकीत प्रलंबित प्रकल्पांना गती देणं, सिंचनासाठी वेळेत पाणी उपलब्ध करणं, यासह अनेक मुद्यांवर
चर्चा झाली.
****
राज्यातल्या १०९ शिक्षकांना गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात
येणार आहे. शिक्षक दिनानिमित्त दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. यंदा ३८ प्राथमिक, ३९ माध्यमिक, आदिवासी विभागातून १९, तर सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारासाठी ८ शिक्षिकांची निवड झाली आहे.
कला आणि क्रीडा तसंच स्काऊट गाईडसाठी प्रत्येकी दोन शिक्षकांना तर दिव्यांग शिक्षक
विभागात एक पुरस्कार मिळणार आहे. येत्या सोमवारी मुंबईत हे पुरस्कार प्रदान केले जातील.
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २८ वा
दीक्षान्त समारंभ उद्या होणार आहे. या समारंभात १९ हजार ४०० विद्यार्थ्यांना पदवी तसंच
पदविका प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विद्यापीठातून सर्वाधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यास
कुलगुरुंच्या सुवर्णपदकाने सन्मानित केलं जातं. यावर्षी हा बहुमान परभणीच्या डॉ. एपीजे
अब्दुल कलाम कॉलेज ऑफ एज्युकेशनची विद्यार्थिनी सईदा तयबा यांनी मिळवला आहे.
****
नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज
राष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्रसिद्ध हिंदी कवी कुमार अंबुज यांना जाहीर झाला आहे.
एक लाख रुपये,
मानचिन्ह आणि मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या बुधवारी
२४ सप्टेंबरला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
****
केंद्र शासनाने गेल्या दशकभराच्या काळात शेती तसंच शेतकऱ्यांसाठी
विविध योजना सुरू केल्या. या सर्व योजनांमुळे शेतकरी आणि पर्यायाने गावं समृद्ध झाल्याचं
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले प्रगतीशील शेतकरी दीपक जोशी यांनी म्हटलं आहे. सेवा
पर्वानिमित्त आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत जोशी बोलत होते.
बाईट – दीपक जोशी, शेतकरी
जोशी यांची ही सविस्तर मुलाखत, उद्या
विशेष प्रासंगिकच्या तिसऱ्या भागात आपण ऐकू शकाल.
****
बीड जिल्ह्यात केज इथे तहसील कार्यालयावर आज ओबीसी महामोर्चा
काढण्यात आला. या महामोर्चात ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके सहभागी झाले होते.
ओबीसींचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न झाला तर तो कदापि खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा हाके यांनी दिला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधीत गावांना रस्ते
आणि अन्य सुविधा त्वरीत उपलब्ध करुन द्यावेत असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
यांनी दिले आहेत. पैठण तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागातील समस्यांबाबत आढावा बैठकीत
आज ते बोलत होते.
****
बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची सरसकट भरपाई
देण्याची मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. आज अतिवृष्टीग्रस्त भागांची
पाहणी केल्यानंतर क्षीरसागर बोलत होते.
लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ तत्काळ जाहीर करण्याची मागणी काँग्रेसचे
लातूर जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी केली आहे. जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी
केल्यानंतर साळुंखे यांनी ही मागणी केली.
****
आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना ओमानशी होणार
आहे. अबूधाबीच्या शेख झायेद मैदानावर रात्री आठ वाजता हा सामना सुरू होईल.
****
हवामान
संपूर्ण राज्यात आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात
सर्व जिल्ह्यात जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जालना शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
****
पैठण इथल्या जायकवाडी धरणातून सध्या १४ हजार ६७२ घनफूट तर माजलगाव
धरणातून सुमारे २२ हजार घनफूट प्रतिसेकंद या वेगाने विसर्ग करण्यात येत आहे.
****
No comments:
Post a Comment