Friday, 19 September 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 19.09.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 19 September 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ सप्टेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      अन्नप्रक्रिया तसंच सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी काही मर्यादेत अकृषक परवान्याची अट रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय 

·      मतदान प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आरोप, ऑनलाइन पद्धतीनं मतदार वगळता येत नसल्याचं निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण

·      आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचा आज सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन

·      नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी ५५३ कोटी ४८ लाख रुपये निधी मंजूर

आणि

·      मराठवाड्यात नांदेड आणि हिंगोली वगळता उर्वरीत जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट

****

अन्नप्रक्रिया, तसंच सूक्ष्म आणि लघु उद्योग यासाठी काही मर्यादेत अकृषक परवान्याची अट रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यात मोठ्या औद्योगिक वसाहतींच्या ठिकाणी 'इंडस्ट्रियल टाऊनशिप' उभारुन, या टाऊनशिप मध्ये संपूर्ण नागरी सुविधा मिळतील, याची व्यवस्था करावी, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

हैदराबाद गॅझेटबाबतच्या शासन निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं काल फेटाळून लावली. याच मुद्द्यावरची याचिका न्यायालयासमोर पूर्वीपासून प्रलंबित आहेत, त्यामुळे एकाच विषयावरच्या अनेक याचिका दाखल करून घेता येणार नाहीत, असं मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या पीठानं यावेळी नमूद केलं.

****

देशभरातल्या मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याच्या आरोपाचा लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुनरुच्चार केला. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. महाराष्ट्रातल्या राजुरा विधानसभा मतदार संघाचा उल्लेख करत, काही सॉफ्टवेअर वापरुन मतदारांची नावं वगळणं, बोगस मतदार घुसवणं हे प्रकार झाल्याचा दावा गांधी यांनी केला.

दरम्यान, राहुल गांधी यांचे सर्व आरोप हे निराधार असून, ऑनलाइन पद्धतीने मतदार वगळता येत नाहीत, असं आयोगानं स्पष्ट केलं.

****

सेवा आणि सुशासन या सूत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नरत आहे. सेवा पर्वानिमित्त विशेष मालिकेत आजच्या भागात महिला सक्षमीकरणाच्या धोरणांविषयी जाणून घेऊ.

‘‘गेल्या ११ वर्षांत सरकारनं सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि कायदेशीर क्षेत्रात महिलांना सक्षम करण्यासाठी एक व्यापक, जीवनधारित धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. प्रत्येक महिलेला सन्मानाने, सुरक्षित आणि स्वावलंबी होण्यासाठी सक्षम करण्यावर सरकारने भर दिला आहे. हिंसाचार आणि भेदभावाविरुद्ध घटनात्मक संरक्षण आणि ऐतिहासिक कायद्यांपासून, परिवर्तनकारी योजनांच्या माध्यमातून महिला विकास ते महिला नेतृत्व केंद्रीत विकासाकडे सरकारने लक्ष पुरवले. गेल्या वर्षी हरियाणा विमा सखी योजनेची सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले....

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचे अपेक्षित परिणाम दिसून येत आहेत. जानेवारी २०१५ मध्ये सुरू करण्यात आलेली सुकन्या समृद्धी योजना देशभरातल्या लाखो युवतींसाठी आशेचा आणि सक्षमीकरणाचा किरण ठरती आहे.

सरकार लखपती दीदी उपक्रम देखील राबवत आहे, ज्याचा उद्देश बचतगटांच्या माध्यमातून महिलांना शाश्वत आधारावर दरवर्षी किमान एक लाख रुपये उत्पन्न मिळवून देणे हा आहे. प्रशासन, संरक्षण दल ते हवाई वाहतूकिपर्यंत,  प्रत्येक क्षेत्रात महिला आता नेतृत्व करत आहेत आणि समावेशक आणि शाश्वत राष्ट्रीय विकासाला चालना देत आहेत.’’

****

मुंबईसह राज्यात कुपोषण कमी करण्यास अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं योगदान मोलाचं असल्याचे गौरवोद्गार, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काढले आहेत. मुंबईत काल आठव्या राष्ट्रीय पोषण माह अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ केल्यानंतर त्या बोलत होत्या.

दरम्यान, तटकरे यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं सातारा परिसरातल्या भगवान बाबा बालिका आश्रमास भेट देऊन तिथल्या मुलींना मिळणाऱ्या सेवा सुविधांची पाहणी केली.

****

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत भारतातल्या सात नैसर्गिक स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पाचगणी आणि महाबळेश्वर पठाराचाही समावेश आहे.

****

आकाशवाणीचं छत्रपती संभाजीनगर केंद्र आज आपला पन्नासावा स्थापना दिन साजरा करत आहे. या निमित्तानं हा विशेष वृत्तांत...

‘‘आकाशवाणीचं हे औरंगाबाद केंद्र आहे. आमच्या सायंकालीन सभेत सर्व श्रोत्यांचं स्वागत...’

पन्नास वर्षांपूर्वी, घरोघरच्या रेडियो सेट्सवरून हा आवाज उमटलाअविनाश पायगुडे नावाच्या तरुणाचा हा चीरतरूण आवाज, इथल्या श्रोत्यांच्या मनावर कोरला गेला, तो आजतागायत. आकाशवाणीचं औरंगाबाद केंद्र आणि श्रोते यांचे अनोखे नाते आजही कायम आहे, बदलत्या युगासत आकाशवाणीनेही कात टाकलीये. तुमच्या आमच्याएवढीच आकाशवाणीही आता सोशल मीडियावर सक्रीय आहे. हातातल्या मोबाईलवर एक क्लिक करायचा अवकाश, तुम्ही असाल तिथे आकाशवाणी आजही तुम्हाला सोबत करेल.-’’

हर्षवर्धन दीक्षित, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

****

होमिओपॅथिक डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये स्वतंत्र नोंदणी करण्याच्या निर्णयाविरोधात ॲलोपॅथी शाखेच्या वैद्यकीय व्यावसायिकांनी काल लाक्षणिक संप केला. छत्रपती संभाजीनगर इथं इंडियन मेडिकल कौन्सिलच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली.

दरम्यान, हा निर्णय अद्याप न्यायप्रविष्ट असून मुंबई उच्च न्यायालयाचा अंतिम आदेश आल्यानंतरच पुढील कारवाई होणार आहे. रुग्णहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची वैद्यकीय संघटनेची परंपरा अबाधित ठेवण्याचं आवाहन, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं.

****

स्वस्थ नारी सशक्त परिवार या उपक्रमांतर्गत काल छत्रपती संभाजीनगर इथं, सात शिबीरं घेण्यात आली. सुमारे एक हजाराहून अधिक लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला. धाराशिव जिल्ह्यातही एकूण २५६ ठिकाणी आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.

लातूर जिल्ह्यात चाकूर इथं स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभ सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाला. आरोग्याविषयी सजग राहून नियमित तपासणी करणं गरजेचं असल्याचं ते यावेळी म्हणाले.

****

लातूर जिल्ह्यात सेवा पंधरवड्यानिमित्त ‘महसूल जनसंवादाची पंचसूत्री’ हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या विशेष उपक्रमात नागरिकांना आपली तक्रार, माहिती नोंदवण्यासाठी क्यूआर कोड प्रसिद्ध करण्यात आले आहेत. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होवून आपल्या तक्रारींचं निराकरण करून घ्यावं, असं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे.

****

वस्तू आणि सेवा कर - जीएसटी परिषदेनं केलेल्या कर सुधारणांची अंमलबजावणी २२ सप्टेंबरपासून होत आहे. याचा अर्थव्यवस्थेवर अनुकूल परिणाम होईल, असा विश्वास खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. ते काल नांदेड इथं पत्रकारांशी बोलत होते...

बाईट - खासदार अशोक चव्हाण

****

नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने ५५३ कोटी ४८ लाख ६२ हजार रुपये निधी मंजूर केला आहे. हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

****

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मधुभाई कुलकर्णी यांचं काल छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं, ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे पार्थिव शरीर आर के दमाणी वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आलं.

****

धाराशिव इथले ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाठक नारीकर यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालं, ते ६७ वर्षांचे होते. विभागीय पत्रकार अधिस्वीकृती समितीचे सदस्य, तसंच केशेगाव इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. नारीकर यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी धाराशिव इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

****

नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यातल्या किवळा साठवण तलाव इथं फोटोशूट करण्यासाठी गेलेल्या दोन १५ वर्षीय मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शेख बाबर शेख जाफर आणि मोम्मद रेहान मोम्मद युसुफ अशी मृतांची नावं असून, ते नांदेड शहरातले रहीवासी होते.

****

हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुक्यातल्या कंजारा इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत "बाल संसद" स्थापन करण्यात आली आहे. ही मुलांची संसद, जिथे मुले त्यांच्या शाळा आणि समाजाशी संबंधित समस्यांवर चर्चा करतात आणि निर्णय घेण्यात भाग घेतात.

****

हवामान

मराठवाड्यात नांदेड तसंच हिंगोली जिल्हा वगळता सर्वच जिल्ह्यात जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

****

No comments: