Friday, 19 September 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 19.09.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 19 September 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ सप्टेंबर २०२ सकाळी .०० वाजता

****

राज्य सरकारनं केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया सोबत मुंबईत सामंजस्य करार केला. महाराष्ट्रात विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या मोठी असून केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया कडे कौशल्य आहे. दोघांमधील सामंजस्य करार हा राज्यातल्या शालेय शिक्षणाला जागतिक दर्जा प्राप्त होण्यासाठीचा नवा टप्पा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. या सामंजस्य कराराअंतर्गत शिक्षकांसाठी विषयानुरूप प्रशिक्षण कार्यक्रम, राष्ट्रीय शिक्षण धोरणास अनुरूप आणि सीबीएसई-सुसंगत शैक्षणिक साधनसामग्री, आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे तसंच विद्यार्थ्यांसाठी ‘क्लायमेट क्वेस्ट’ सारखा हवामान शिक्षण कार्यक्रम आणि पूर्व- प्राथमिक अभ्यासक्रम केंब्रिज उपलब्ध करून देणार आहे.

****

कृषी क्षेत्रात हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी बांबू लागवड उपयुक्त ठरणार आहे; बांबू लागवडीकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वळावं, यासाठी बांबूची शाश्वत बाजारपेठ तयार करण्यात येईल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त आयोजित बांबू परिषदेमध्ये ते काल बोलत होते. हरित महाराष्ट्राचं स्वप्न साकार करण्यासाठी राज्य शासन २१ लाख हेक्टरवर बांबू लागवड करण्यास कटिबद्ध असल्याचं रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी या परिषदेत सांगितलं.

****

परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर यामुळे शेतपिकांच्या नुकसानीसाठी राज्य शासनाने १२८ कोटी ५५ लाख रुपये इतका निधी मंजूर केला आहे. यावर्षी जून, जुलै आणि ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे परभणी जिल्ह्यातल्या दोन लाख ३८ हजार ५३० शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं आहे. या नुकसान भरपाईबद्दल पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी राज्य सरकारचे आभार मानले. सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं आहे, त्याचे पंचनामे सुरू असून लवकरात लवकर मदत उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. त्या म्हणाल्या,

बाईट - पालकमंत्री मेघना बोर्डीकर

****

डिजिटल व्यक्तिगत डेटा संरक्षण नियमांचं काम अंतिम टप्प्यात आलं असून, येत्या काही दिवसांतच ते प्रसिद्ध केले जातील, अशी माहिती केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. एआय इम्पॅक्ट समिट २०२६चं बोधचिन्ह आणि महत्त्वाच्या उपकरणांच्या प्रकाशनाच्या वेळी ते बोलत होते. पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ही परिषद होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात एआय मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून, विविध क्षेत्रांमध्ये एआय सुविधा पोहोचायला याद्वारे मदत होत असल्याचं वैष्णव म्हणाले.

****

हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुक्यातल्या कंजारा इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत "बाल संसद" स्थापन करण्यात आली आहे. ही मुलांची संसद, जिथे मुले त्यांच्या शाळा आणि समाजाशी संबंधित समस्यांवर चर्चा करतात आणि निर्णय घेण्यात भाग घेतात. या बाल संसद स्थापन प्रक्रियेमध्ये शाळेतले विद्यार्थी, शिक्षक, गावातल्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

****

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातल्या वडगाव कोल्हाटी, दौलताबाद आणि रामपुरीसह अनेक ठिकाणी वीजचोरीचे प्रकार महावितरणच्या धडक मोहिमेत उघड झाले असून, याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात ३१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महावितरणच्या वाळूज महानगर शाखा तसंच दौलताबाद शाखेच्या कर्मचाऱ्यांनी हि तपासणी मोहीम राबवली.

****

बुलडाणा जिल्ह्यात मलकापूर तालुक्यातल्या चिखली रणथम परिसरात झालेल्या एका रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. मृत्यूमुखी पडलेले सर्व जण जळगाव जिल्ह्यातले रहिवासी होते.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात काल ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे डोंगरगाव पूल इथं कयाधु नदीला पुन्हा पूर आला असून, शेतात पाणी शिरल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

माजलगाव धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीपताळीत वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातून सध्या पाच हजार ९१९ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सिंदफणा नदीपात्रात सोडण्यात त आहे.

****

जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू सचिन यादव यानं उत्तम कामगिरी केली, मात्र त्याचं कांस्यपदक थोडक्यात हुकलं आणि त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. ८६ पूर्णांक २७ शतांश मीटर भाला फेकत त्यानं व्यक्तिगत सर्वोत्तम कामगिरी केली. तर दोनवेळा ऑलिम्पिक पदकविजेता नीरज चोप्रा आठव्या स्थानावर राहिला.

****

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना ओमानशी होणार आहे. अबूधाबीच्या शेख झायेद मैदानावर रात्री आठ वाजता हा सामना सुरू होईल.

****

No comments: