Saturday, 20 September 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 20.09.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 20 September 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

भारताला दुसऱ्या देशावरील अवलंबित्व सातत्यानं कमी करावं लागेल, आत्मनिर्भरतेशिवाय आपल्याकडे कोणताही पर्याय नाही, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

गुजरातच्या भावनगर इथं आज समुद्र से समृद्धी या कार्यक्रमात ३४ हजार २०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घघाटन आणि भुमिपुजन त्यांनी केलं. या कार्यक्रमात त्यांनी दुरदृष्यप्रणालीद्वारे मुंबई इथल्या आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनलचंही उद्घघाटन केलं. त्यानंतर त्यांनी जनतेला संबोधित केलं. २०४७ पर्यंत विकिसित होण्यासाठी आत्मनिर्भर होण्याची गरज व्यक्त करत जीएसटी कपातीमुळे बाजारात मोठे चैतन्य निर्माण होणार असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले.

****

जम्मू काश्मिरच्या उधमपूर जिल्ह्यातल्या सेओजधार भागात आज सकाळी भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराचा एक जवान गंभीर जखमी झाला. मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर जवानांकडून काल संध्याकाळपासून शोध मोहिम सुरु आहे. सध्या चकमक सुरुच असून राष्ट्रीय सुरक्षा दल, पोलिस आणि सेनेची संयुक्त पथकं या मोहीमेत सहभागी आहेत. दरम्यान, लष्करानं पुंछ इथं जम्मू कश्मीर पोलिसांच्या सहकार्यानं शोधमोहीम राबवून शस्त्रास्त्र आणि स्फोटकं जप्त केली आहेत.

****

परराष्ट्र मंत्रालयानं भारतीय नागरिकांना इराणमध्ये नोकरीच्या आश्वासनांना किंवा प्रस्तावाला बळी न पडण्याचा सल्ला दिला आहे. अलिकडेच, भारतीय नागरिकांना इराणमध्ये नोकरी देण्याचं किंवा नोकरीसाठी इतर देशांमध्ये पाठवण्याचं आमिष दाखवून फसवण्यात आल्याची प्रकरणं समोर आली आहेत. इराणमध्ये पोहोचल्यानंतर, या भारतीय नागरिकांचं गुन्हेगारी टोळ्यांकडून अपहरण करुन त्यांच्या सुटकेसाठी त्यांच्या कुटुंबियांकडून खंडणी मागिण्यात आली. इराण सरकार केवळ पर्यटनाच्या उद्देशानं भारतीयांना व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी देतं आणि नोकरी किंवा इतर उद्देशांसाठी इराणमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाचं आश्वासन देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांचा संबंध गुन्हेगारी टोळ्यांशी असू शकतो, असंही परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं आहे.

****

ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील मुरीदके शहरातील मरकझ तैयबा इथल्या दहशतवादी गटाचे मुख्यालय उद्ध्वस्त केलं होतं, अशी कबुली लष्कर-ए-तोयबा या दहशवादी संघटनेच्या कमांडरनं दिली आहे. यामुळं ऑपरेशन सिंदूरबाबत जागतिक स्तरावर पाकिस्ताननं केलेले दावे निराधारच असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

ऑपरेशन सिंदूरमध्ये नष्ट झालेल्या मुरीदके दहशतवादी तळाची पुनर्बांधणी केली जात असून तिथं अनेक दहशतवादी प्रशिक्षण घेत होते, असंही या दहशतवाद्यानं सामाजिक माध्यमावर जारी केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

****

आसामचे लोकप्रिय गायक आणि अभिनेते जुबिन गर्ग यांचं सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंगदरम्यान काल अपघाती निधन झालं, ते ५२ वर्षांचे होते. ‘गँगस्टर’, ‘क्रिश थ्री’, ‘झूम बराबर झूम’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी गीतं गायली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक प्रसार माध्यमावरील संदेशातून जुबिन गर्ग यांच्या अपघाती निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

****

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घणसोली आणि शिळफाटा दरम्यानच्या पाच किलोमीटरच्या बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे. हा बोगदा बीकेसी आणि शिळफाटा दरम्यानच्या २१ किलोमीटरच्या समुद्राखालील बोगद्याचा भाग आहे, यामध्ये ठाणे खाडीखालील सात किलोमीटरचा भाग समाविष्ट आहे. हा बोगदा खोदण्याचं काम मे २०२४ मध्ये सुरु झालं होतं. दरम्यान, मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान भारतातील पहिला ५०८ किलोमीटर लांबीचा बुलेट ट्रेन कॉरिडॉर बांधला जात असून ३२१ किलोमीटर वायाडक्ट आणि ३९८ किलोमीटर घाटाचं काम पूर्ण झालं आहे.

****

नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा पोलिसांनी विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या एक कंटेनरवर कारवाई करत ८४ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी कंटेनरसह चालकाला ताब्यात घेतलं. जप्त केलेल्या या मद्याची किंमत तब्बल ६९ लाख १२ हजार रुपये तर जप्त केलेल्या कंटेनर वाहनाची किंमत १५ लाख रुपये आहे.

****

चायना मास्टर्स बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत, भारताच्या सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा सामना आज मलेशियन जोडी आरोन चिया आणि सोह वूई यिक यांच्याशी होईल. कालच्या उपांत्यपूर्व फेरीत रेन झियांग यू आणि झी हाओनान या चिनी जोडीला पराभूत करून रँकीरेड्डी आणि शेट्टी यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.

****

महिला क्रिकेटमध्ये नवी दिल्लीत सुरू असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना आज नवी दिल्लीत होणार आहे. काल भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

****

No comments: