Sunday, 21 September 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.09.2125 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 21 September 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २१ सप्टेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      वस्तू आणि सेवा कर सुधारणांमुळं सर्व सामन्यांची स्वप्न साकारतील - पंतप्रधान मोदी यांना विश्वास

·      नमो युवा रन मॅरेथॉनला ठिकठिकाणी मोठा प्रतिसाद

·      नदीपात्रात होणाऱ्या अतिक्रमणांचे सर्वेक्षण करण्याच्या पर्यावरण मंत्री मुंडे यांच्या सूचना

आणि

·      आशिया चषक टीट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान दरम्यान आज सामना

****

उद्यापासून लागू होत असलेल्या वस्तू आणि सेवा कर सुधारणांमुळं प्रत्येकाचा लाभ होईल, सर्व सामान्यांची स्वप्न साकार होतील, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. त्यांनी आज संध्याकाळी पाच वाजता देशवासियांना संबोधित करताना या संदर्भातली माहिती दिली. ते म्हणाले

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

देश नागरिक देवो भव हा मंत्र घेऊन पुढे जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

आता खाद्यपदार्थ स्वस्त होतील, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. हे नियम सर्व राज्यं आणि केंद्राच्या एकत्रित प्रयत्नांतून साध्य झाले. केंद्र आणि राज्य सरकार मिळून एकत्र चालले तर देशाची सर्व स्वप्न साकारली जातील असंही मोदी यांनी यावेळी नमूद केलं. लघू, सुक्ष्म आणि कुटीर उद्योगांकडून देशाला मोठ्या अपेक्षा असल्याचं ते यावेळी म्हणाले. उद्यापासून सुरू होत असलेल्या नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छाही पंतप्रधान मोदी यांनी दिल्या.

****

व्यसनमुक्त भारत, व्यसनमुक्त महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित नमो युवा रन मॅरेथॉनआज ठिकठिकाणी उत्साहात घेण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या अर्थात अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त हा उपक्रम घेण्यात आला. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मॅरेथॉन झाली. नमो रन मॅरेथॉनमुळे तरुणाई देशभक्ती, देशाला सर्वोच्च स्थानी नेण्याचं तसंच देशाला आत्मनिर्भर करण्याच्या ध्यासानं प्रेरित होईल, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनानिमित्त संपूर्ण भारत आत्मनिर्भरतेसाठी वचनबद्ध झाला आहे. आत्मनिर्भर भारतामध्ये आत्मनिर्भर युवा ही संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. आपण सर्वांनी ऑपरेशन सिंदुरमध्ये भारताची शक्ती बघितलेली आहे. ही शक्ती आणि भारताची हवाई संरक्षण यंत्रणा अशी आहे की, भारताला कोणी पराजित करू शकत नाही. पण एक गोष्ट भारताला पराजित करु शकते, ती म्हणजे अंमली पदार्थ. त्यामुळं आपला युवा जर व्यसनमुक्त असला, तर भारतावर कुठलंही आक्रमण चालू शकणार नाही, असंही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. छत्रपती संभाजीनगर इथंही आज नमो रन मॅरेथॉन शर्यंत

घेण्यात आली. बीड जिल्हात या मॅरेथॉनला भाजप नेत्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी हिरवा झेंडा दाखवला. परभणी शहरातही आज परभणी भाजप शहर आणि जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीनं मॅरेथॉन आयोजित करण्यात आली. या मॅरेथॉनला माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांनी हिरवा झेंडा दाखवला. छत्रपती संभाजीनगर इथं नमो युवा रन मॅरेथॉनला बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार संजय केणेकर उपस्थित होते.

****

सेवा आणि सुशासन या सुत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नरत आहे. सेवापर्व निमित्तच्या विशेष मालिकेच्या आजच्या भागात सरकारनं शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या आर्थिक उपाययोजनांविषयी जाणून घेऊ.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं केंद्रित सुधारणांच्या प्रवाहातून शेतकऱ्यांना अनियमित उत्पन्नापासून निश्चित समृद्धीकडे नेलं आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले होते -

 

साथीयों हमारे लिये अपने किसानों का हीत सर्वोच्च प्राथमिकता है। भारत अपने किसानों के, पशुपालकों के और मछुआरे भाई बहनों के हितों के साथ कभी भी समझोता नही करेगा। मै जानता हूं, व्यक्तिगत रूप मे मुझे बहोत बडी किमत चुकानी पडेगी, लेकिन मै इसके लिये तयार हूं। मेरे देश के किसानों के लिये, मेरे देश के मछुआरों के लिये, मेरे देश के पशुपालकों के लिये आज भारत तयार है।

 

२०१३-१४ मध्ये अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठीची तरतूद २७ हजार कोटी रुपये होती, ती वाढवून १ लाख ३७ हजार कोटी रुपयांहून अधिक करण्यात आली आहे. पीएम-किसान योजनेच्या माध्यमातून ११ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना थेट उत्पन्नाचा आधार मिळाला आहे. किसान क्रेडिट कार्ड्समुळे आर्थिक सक्षमीकरण अधिक मजबूत झाले आहे. तसंच प्रधानमंत्री पीक विमा योजना हवामान आणि बाजारपेठेच्या अनिश्चिततेविरुद्ध सुरक्षितता प्रदान करत आहे.

****

भारत - अमेरीका, उभय देशातील व्यापार विषयक चर्चेच्या अनुषंगानं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्या नेतृत्वातलं एक शिष्टमंडळ उद्या अमेरीका दौऱ्यावर जाणार आहे. या चर्चेतून दोन्ही देशांसाठी परस्पर लाभदायक करार निश्चिती करणं हा या भेटीचा उद्देश आहे. १६ सप्टेंबर रोजी अमेरीकी शिष्टमंडळानं भारत भेटीत संबंधीत विविध मुद्द्यांवर चर्चा केलेली आहे.

****

राज्याच्या पर्यावरण मंत्री म्हणून आपण नदीपात्रात होणाऱ्या अतिक्रमणांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती मंत्री पंकजा मुंडे यांनी आज बीडमध्ये दिली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे प्रशासनाकडून सुरू आहे. बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असल्याने त्याचे पंचनामे पूर्ण करुन शेतकऱ्यांना भरीव मदत दिली जाणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. अतिवृष्टी झाली तिथे नुकसान तर असायचेच परंतु जिथं पर्जन्यमान कमी आहे, त्या ठिकाणी देखील पिकांचं नुकसान झालं असेल तर त्या ठिकाणीही पंचनामे केले जाणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं.

****

केंद्र शासनाने गेल्या दशकभराच्या काळात अनेक कालबाह्य कायदे रद्द करून, या क्षेत्रात सुसुत्रता आणली. हे बदल सर्वसामान्यांसाठी लाभदायक असल्याचं, छत्रपती संभाजीनगर इथल्या ज्येष्ठ विधीज्ञ गीता देशपांडे यांनी आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हटलं आहे.

बाईट - गीता देशपांडे, ज्येष्ठ विधीज्ञ

विधीज्ञ देशपांडे यांची ही मुलाखत, विशेष प्रासंगिकच्या उद्या सकाळी दहा वाजून ४५ मिनिटांनी प्रसारित होणाऱ्या चौथ्या भागात आपण ऐकणार आहोत.

****

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज सुपर फोर मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे. दुबईत भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता या सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघानं या स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या या आधीच्या सामन्यात सहज विजय नोंदवला आहे. सुपर फोर गटामध्ये काल झालेल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या संघानं श्रीलंकेवर विजय मिळवला.

****

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील बरकतपूर आणि शेलगांव भागातील अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागाची आज पाहणी केली. परिसरातील शेतीच्या झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने तातडीनं पंचनामे करणं अत्यंत आवश्यक असून, राज्य शासनानं या गंभीर स्थितीची दखल घेऊन सरसकट नुकसान भरपाई घोषित केली पाहीजे अशी मागणी त्यांनी या प्रसंगी केली.

****

लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं मराठवाडा साहित्य परिषद -मसापच्या उदगीर शाखेतर्फे काल मुक्तिसंग्रामात साहित्य परिषदेची भूमिका’ या विषयावर प्राध्यापक डॉ.दत्ताहरी होनराव यांचं व्याख्यान झालं. ज्या राजवटीत सामान्य जनतेच्या नशिबी अन्यायच होता त्या काळी सामान्य माणसाला विचारप्रवण करण्याचं आणि सरंजामशाही विरुद्ध लढण्याचं कार्य मसापनं केल्याचं मत होनराव यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

पुढच्या पाच दिवसांत रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, परभणी, लातूर, नांदेड, धाराशिव इथं मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे, तर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर, सातारा, सांगली इथं हलका ते मध्यम पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

बीड जिल्ह्यात मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेऊन धरण पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज सकाळी क्रमांक एक आणि सहा अशी दोन दारं पाव मिटरनं उघडण्यात आली आहेत. याद्वारे मांजरा नदी पात्रात एक हजार सातशे सत्तेचाळीस पुर्णांक चौदा शतांश क्युसेक्स इतकं पाणी सोडण्यात येत आहे. तसंच, पाणी आवक बघूनच पाणी सोडणं नियंत्रीत केलं जाणार असल्यानं नदी काठ आणि पूर बाधित गावच्या नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 25 دسمبر 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 25 December-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خب...