Tuesday, 23 September 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.09.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 September 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ सप्टेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      सिनेमा हा फक्त उद्योग नसून, समाजाला जागृत करण्याचं सशक्त माध्यम; ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपतींचं प्रतिपादन

·      अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत

·      नुकसानग्रस्तांना तातडीचा दिलासा देण्यात कमी पडणार नाही-मुख्यमंत्र्यांची ग्वाही

·      हवामान खात्याकडून २७-२८ सप्टेंबरदरम्यान पुन्हा अतिवृष्टीचा इशारा 

आणि

·      जायकवाडी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग-पैठणचा गोदाघाट पाण्याखाली

****

सिनेमा हा फक्त उद्योग नसून, समाजाला जागृत करण्याचं सशक्त माध्यम असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. ७१ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. श्यामची आई या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाने यावेळी गौरवण्यात आलं, याचा राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला. त्या म्हणाल्या

बाईट - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

चित्रपट क्षेत्रातला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार, ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेते मोहनलाल यांना यावेळी प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार शाहरुख खान आणि विक्रांत मेस्सी यांना विभागून प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार राणी मुखर्जी यांना, तर सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार ट्वेल्थ फेल या चित्रपटाला प्रदान करण्यात आला. नाळ दोन या चित्रपटातल्या कलाकारांसह सहा बालकलाकारांना यावेळी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यावेळी उपस्थित होते. चित्रपटाशी संबंधित नियमावली अधिक सुलभ करण्याचं सुतोवाच वैष्णव यांनी यावेळी केलं. ते म्हणाले

बाईट - अश्विनी वैष्णव, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री

****

अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीच्या मदतीसाठी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत केली आहे. आवश्यक त्या ठिकाणी निकषामध्ये शिथिलता आणून मदत करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा आज मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात आला, त्यानंतर मुख्यमंत्री माध्यमांशी बोलत होते. सध्या पूरग्रस्त भागात एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या १७ तुकड्या कार्यरत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, ते म्हणाले

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या नुकसान भरपाईसाठी केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात येईल. पण शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. मदतीच्या पद्धतीत सुधारणा करण्यात आली असून, आता एकत्रित मदत न देता, पंचनामे येतील, त्या त्या भागाला मदत केली जात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हवामान खात्याने २७-२८ सप्टेंबरदरम्यान पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, नागरिक आणि शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन सरकारने केले आहे.

****

परभणी जिल्ह्यात एकूण ५२ महसूल मंडळांपैकी ५० मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे.

****

लातूर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १११ टक्के म्हणजेच ७८३ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील ठिकठिकाणी पुरामुळे पुलावरून पाणी वाहत असल्यास कुणीही पूल ओलांडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठणच्या जायकवाडी धरणाची सर्व २७ दारं उघडून  सुमारे ८५ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीच्या पात्रात सोडलं जात आहे. यामुळे पैठणला गोदावरी नदीकाठचे सर्व घाट पाण्याखाली गेले असून, नदीचं पाणी सखल भागापर्यंत पोहोचलं आहे. परिसरातल्या तसंच गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील नारंगी प्रकल्प जवळजवळ ८५ टक्के भरल्याने नदी पात्रात पाणी सोडण्यात आलं आहे. वैजापूर तसंच कन्नड तालुक्यात प्रत्येकी एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे.

****

सेवा आणि सुशासन या सूत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नरत आहे. सेवापर्व निमित्त विशेष मालिकेत आजच्या भागात सरकारनं प्रधानमंत्री कौशल विकास योजनेच्या माध्यमातून युवकांचं केलेलं सक्षमीकरण याविषयी जाणून घेऊ

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता हाती घेतली तेव्हा त्यांचे एक स्वप्न होते...लाखो युवकांना कुशल बनवण्याचे स्वप्न. यासाठी, स्किल इंडिया योजना सुरू करण्यात आली... प्रधानमंत्री कौशल विकास योजना या योजनेचा एक भाग आहे. १५ जुलै २०१५ रोजी सुरू झालेल्या या योजनेने एक दशकाचा प्रवास पूर्ण केला आहे. या स्वप्नाबाबत पंतप्रधान म्हणतात -

 

साथीयों, लंबे समय तक सरकारों ने स्कील डेवेलपमेंट को लेकर ना वैसी गंभीरता थी, और ना ही वैसी दूरदृष्टी थी। इसका बहोत बडा नुकसान हमारे नौजवानों को उठाना पडा। इंडस्ट्री मे डिमांड होने के बावजूद, नौजवानों मे टॅलेंट होने के बावजूद, स्कील डेवलपमेंट न होने से युवाओं के लिये नोकरी पाना अत्यंत कठीण हो गया था। ये हमारी सकरार है, जिसने युवाओं मे स्कील डेवलपमेंट की गंभीरता को समझा। हमने स्कील डेवलपमेंट के लिये अलग मंत्रालय बनाया। और भारत मे पहली बार स्कील इसी एक विषय के लिये डेडीकेटेड मंत्रालय है। मतलब की देश के नौजवानों के लिये विशेष डेडीकेटेड एक मंत्रालय है।

 

या योजनेअंतर्गत, जुलै २०२५ पर्यंत अंदाजे १.६३ कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, ज्यामध्ये ४५ टक्के महिला आहेत. या योजनेचा चौथा टप्पा सुरू झाला आहे जो आणखी वर्षभर सुरु राहणार आहे. कौशल्य भारत अभियान केवळ देशातच नाही तर परदेशातही भारतीय तरुणांच्या क्षमतेला नवीन ओळख देत आहे. पंतप्रधानांच्या सक्षम नेतृत्वामुळे आणि दूरदृष्टीमुळे हे शक्य झाले आहे.

****

छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा रुग्णालयात दहावा आयुर्वेद दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील निवडक गावांमध्ये सॅटेलाइट आयुष दवाखाने सुरू करण्याची तयारी सुरू असल्याचं, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. शेख शकील अहमद यांनी या वेळी सांगितलं.

****

नांदेड जिल्ह्यात किनवट इथं आज मूळ आदिवासी समाजाच्या वतीनं उपविभागीय कार्यालयावर आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. मूळ आदिवासी समाजाच्या अनुसूचित जमाती प्रवर्ग आरक्षणात बंजारा समाजाला समाविष्ट करण्याच्या मागणीला यावेळी विरोध करण्यात आला.

****

शेतकऱ्यांच्या गायरान जमिनीच्या हक्कासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यात मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते.

****

No comments: