Tuesday, 23 September 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.09.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 23 September 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ सप्टेंबर २०२ सकाळी .०० वाजता

****

मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. धाराशिव, बीड, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, प्रशासनाकडून बचावकार्य सुरु आहे.

धाराशिव जिल्ह्यात परंडा तालुक्यातली अनेक गावं मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेली आहेत. पुरात अडकेलल्या ९९ नागरीकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. मांजरा नदीच्या पुराच्या पाण्यामुळे खोंदला गावातली २० कुटुंब ग्रामपंचायत कार्यालयात आसरा घेत आहेत. वागेगव्हण, कारंजा याठिकाणी देखील जोरदार पाऊस सुरु आहे.

**

बीड जिल्ह्यातल्या २९ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या १२५ टक्के पाऊस झाला. बिंदूसरा, गोदावरी, करपरा आणि सिंधफणा नदीला पुर आला असून, नदीकाठच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. खरिपातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, बाजरी आणि तुरीसारखी पिकं पूर्णपणे उध्वस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज बीड जिल्ह्यात कामखेडा, हिंगणी हवेली, पेंडगाव सह सिंधफना नदी काठच्या गावांना भेटी देऊन नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना केल्या.

अतिवृष्टीमुळे बीड मतदारसंघात अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांनी पूग्रस्त भागाचा दौरा करुन नागरीकांची मदत केली.

या अस्मानी संकटातून बाहेर काढण्यासाठी महायुती सरकारने तात्काळ बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख उल्हास गिराम यांनी केली.

**

हिंगोली जिल्ह्यात वसमत आणि औंढा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. औंढा तालुक्यात पिंपळदरी इथल्या गावालगतच्या ओढ्याला आलेल्या पुरात नामदेव रिठे हा तरुण वाहून गेला. त्यांचा मृतदेह आज आढळून आला. कुरुंदा गावात महावितरणच्या 33 केव्ही उपकेंद्रात पाणी शिरल्यानं परिसरातला विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. पांगरा शिंदे गावातही ढगफुटी सदॄश्य पावसामुळे गावात पाणी शिरलं असून, जवळपास १०० शेतकरी आणि शेतमजूर अडकले होते, त्यांना ग्रामस्थांनी गावात परत आणलं.

**

दरम्यान, या पावसामुळे पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे.

पैठणचं जायकवाडी धरण जवळपास पूर्ण भरलं असून, धरणात सध्या ९२ हजार ३९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातून सध्या एक लाख तीन हजार ७५२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

मांजरा धरणातून ४३ हजार ५१६, माजलगाव धरणातून एक लाख १५ हजार २४३, तर सिना कोळेगाव प्रकल्पातून ७० हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग होत आहे.

**

सोलापूर जिल्ह्यातल्या सीना नदीला महापूर आला असून, सीना नदीमध्ये कोळेगाव खासापुरी चांदणी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर या तालुक्यातल्या काही गावांना पुराचा वेढा पडला आहे. काल रात्रीपासून अनेक ठिकाणी प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू असून, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने माढा तालुक्यातल्या रिधोरे गावात पुरात अडकलेल्या आठ लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून, इतर २८ लोकांना सुरक्षित स्थळी हळवण्यात आलं आहे.

****

दहावा राष्ट्रीय आयुर्वेद दिन आज साजरा होत आहे. आयुर्वेद प्रत्येकी मानवासाठी; आयुर्वेद पृथ्वीसाठी अशी यावर्षीची या दिनाची संकल्पना आहे. यानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. गोव्यात अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत आयुर्वेद दिनानिमित्त होणार्या मुख्य कार्यक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आयुर्वेद क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्यांना राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.

****

राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचं सक्षमीकरण करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, काल या विभागाच्या आढावा बैठकीत सांगितलं. शासनाच्या सर्व सेवा, डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देणं, कृत्रिम बुद्धिमत्ता, बिग डेटा आणि सायबर सुरक्षितता यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याला शासनाचं प्राधान्य असल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

****

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काल मुंबईत क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गौरव पुरस्कार वितरित करण्यात आले. यावेळी राज्यातील १११ आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. पुरस्कारप्राप्त शिक्षक, राज्याचे ब्रँड ॲम्बेसेडर असल्याचे गौरवोद्गार पवार यांनी यावेळी काढले. जिल्हास्तरावर आदर्श शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना अनुक्रमे पाच, तीन आणि दोन कोटी रुपयांची पारितोषिकं दिली जातील असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी जाहीर केलं.

****

शेतकऱ्यांच्या उसाला अधिकाधिक दर तसंच कामगारांना वेळेत वेतन तसंच बोनस देणाऱ्या साखर कारखान्यांना राज्य शासनाच्या वतीनं सहकार्य केलं जाईल असं आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलं. ते काल पुण्यात द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या 70व्या वार्षिक अधिवेशन आणि साखर प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

****

No comments: