Wednesday, 24 September 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 24.09.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 24 September 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ सप्टेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातल्या शेतकऱ्यांना सरकारकडून मदत जाहीर, ७० लाख एकरावरील पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज

·      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज लातूर आणि धाराशिव दौरा, पुरात अडकलेल्या नागरिकांसाठी बहुतांश ठिकाणी अद्याप मदत आणि बचावकार्य सुरु

·      ७१वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान

·      राज्यातल्या ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

आणि

·      आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सुपर फोर मध्ये आज भारत - बांगलादेश लढत

****

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचे शासन आदेश दिले असून, आतापर्यंत एक हजार ८२९ कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते काल वार्ताहरांशी बोलत होते. उर्वरित रक्कम येत्या दहा दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आतापर्यंत ९७५ मिलिमीटर पाऊस झाला असून, सरासरी पेक्षा १०२ टक्के जास्त आहे. पुरामुळे आठ जणांचा मृत्यू झाला असून, दहा जण जखमी झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. पूरग्रस्त भागात राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती दलाच्या सतरा तुकड्या तैनात केल्या असून, या भागांचा आढावा घ्यायला मंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांना सांगितलं असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस आज लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पूरपरिस्थितीची पाहणी करणार आहेत.

****

अतिवृष्टीमुळे ७० लाख एकरावरच्या पिकांचं नुकसान झालं असल्याचा अंदाज कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला. ते काल मुंबईत वार्ताहारंशी बोलत होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत पोहोचवली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.

****

मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक भागात पूर परिस्थिती कायम असून, प्रशासनाकडून बचावकार्य करण्यात येत आहे.

लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या उजनी गावात तेरणा नदीच्या पुराने अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १११ टक्के इतक्या पावसाची नोंद झाली. लातूर तालुक्यात जवळा इथल्या मांजरा नदीला पूर आल्याने नदीजवळील २५ लोकांना सुरक्षितपणे ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात हलवण्यात आलं आहे. अहमदपूर, जळकोट आणि औसा तालुक्यात काही ठिकाणी जनावरं वाहून गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पुलावरून पाणी वाहत असल्यास कुणीही पूल ओलांडू नये असं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केलं आहे.

**

परभणी जिल्ह्यात गोदावरी आणि दुधना नदीला पूर आल्याने आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. ३६ गावांचा संपर्क तुटला असून, ५७८ नागरिकांना भारतीय सैन्य दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या मदतीने स्थलांतरित करण्यात आलं आहे. खासदार संजय जाधव यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन नागरीकांना मदतीचं आश्वासन दिलं.

**

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठणच्या जायकवाडी धरणाची सर्व २७ दारं उघडून सुमारे ७५ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीच्या पात्रात सोडलं जात आहे. यामुळे पैठणला गोदावरी नदीकाठचे सर्व घाट पाण्याखाली गेले असून, नदीचं पाणी सखल भागापर्यंत पोहोचलं आहे.

वैजापूर तालुक्यातला नारंगी प्रकल्प जवळजवळ ८५ टक्के भरल्याने नदी पात्रात पाणी सोडण्यात आलं. जिल्ह्यात वैजापूर तसंच कन्नड तालुक्यात प्रत्येकी एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेला.

**

नांदेडच्या विष्णूपुरी प्रकल्पातून एक लाख ८१ हजार ६९१ घनफूट प्रतिसेकंद वेगाने गोदावरी पात्रात विसर्ग केला जात आहे. विसर्ग वाढवावा लागण्याची शक्यता असल्याने, नदी काठावरच्या गावातल्या नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केलं.

**

धाराशिव जिल्ह्यात २१ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी काल भूम तालुक्यात, तसंच बीड जिल्ह्यातल्याही काही गावांमध्ये पूर परिस्थितीची पाहणी केली.

बीड जिल्ह्यात ५७ मंडळात अतिवृष्टी झाली असून, केज, माजलगाव, गेवराई, बीड तालुक्यातल्या अनेक ठिकाणी पुरात अडकलेल्या नागरीकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. हिंगोली, जालना जिल्ह्यातल्या काही भागातही अतिवृष्टीची नोंद झाली असून, नद्यांचं पाणी शिरल्याचं अनेक गावांचा संपर्क तुटल्याचं वृत्त आहे. 

****

७१ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार काल नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. चित्रपट क्षेत्रातला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार, ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेते मोहनलाल यांना यावेळी प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार शाहरुख खान आणि विक्रांत मेस्सी यांना, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार राणी मुखर्जी यांना, तर सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार ट्वेल्थ फेल या चित्रपटाला प्रदान करण्यात आला. नाळ दोन या चित्रपटातल्या कलाकारांसह सहा बालकलाकारांना यावेळी गौरवण्यात आलं.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यावेळी उपस्थित होते. चित्रपटाशी संबंधित नियमावली अधिक सुलभ करण्याचं सुतोवाच वैष्णव यांनी यावेळी केलं. ते म्हणाले...

बाईट - केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

****

राज्यातल्या ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या मतदार यादीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने काल जाहीर केला. त्यानुसार प्रारुप मतदार यादीवर येत्या आठ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत हरकती तसंच सूचना दाखल करता येणार आहेत. अंतिम मतदार यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी २७ ऑक्टोबर रोजी जाहीर केली जाणार आहे.

****

सेवा आणि सुशासन या सूत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नरत आहे. सेवापर्व निमित्तच्या विशेष मालिकेच्या आजच्या भागात सरकार सेमीकंडक्टर मोहिमेच्या माध्यमातून करत असलेल्या उपाययोजनांविषयी जाणून घेऊ.

सेमीकंडक्टर हे आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सचा अत्यावश्यक भाग आहे. २०२१ मध्ये इंडिया सेमीकंडक्टर मिशनला प्रारंभ झाल्यापासून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं सेमिकंडक्टर क्षेत्रातील योजना प्रत्यक्षात उतरवण्यास सुरुवात केली. या महिन्यात नवी दिल्ली येथे सेमीकॉन इंडिया २०२५ ला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी सेमीकंडक्टर चिप्सचे वर्णन डिजिटल डायमंड्स असे केले होते.

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

७६ हजार कोटी रुपयांच्या इंडिया सेमीकंडक्टर मिशन सेमीकॉन कार्यक्रमातून सेमीकॉन आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंगसाठी ५०% पर्यंत अनुदान दिले जात आहे. डिझाइन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीमच्या माध्यमातून २८० हून अधिक शैक्षणिक संस्था आणि ७० हून अधिक स्टार्टअप्सना यात सहभागी करून घेतले आहे. तर स्पेक्स योजनेतून इलेक्ट्रॉनिक घटक निर्मितीसाठी २५% अनुदान देण्यात येत आहे.

देशाच्या सेमीकंडक्टर क्षेत्राने सेमिकॉन इंडिया २०२५ मध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठला. याठिकाणी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पंतप्रधान मोदींना मेड-इन-इंडिया चिप्सचा पहिला संच अधिकृतपणे सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे, “आजचा भारत जगाला आत्मविश्वास देतो आणि जगात जेव्हा अडचण निर्माण होते, तेव्हा जग भारतावर सहजगत्या विसंबू शकते”.

****

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सुपर फोर मध्ये आज भारत - बांगलादेश सामना होणार आहे. रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पराभव केला होता.

****

दहावा आयुर्वेद दिन काल साजरा झाला. नाशिक इथं आरोग्य विज्ञान विद्यापीठात काल ’आयुर्वेद आणि सौंदर्यशास्त्र’ याविषयावर कार्यशाळा झाली.

छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा रुग्णालयात जिल्ह्यातल्या निवडक गावांमध्ये सॅटेलाइट आयुष दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. काल आयुर्वेद दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात जिल्हा आयुष अधिकारी डॉ. शेख शकील अहमद यांनी ही माहिती दिली.

****

नांदेड जिल्ह्यात किनवट इथं मूळ आदिवासी समाजाच्या वतीनं काल उपविभागीय कार्यालयावर आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. मूळ आदिवासी समाजाच्या अनुसूचित जमाती प्रवर्ग आरक्षणात बंजारा समाजाला समाविष्ट करण्याच्या मागणीला यावेळी विरोध करण्यात आला.

****

हवामान खात्याने २७-२८ सप्टेंबरदरम्यान राज्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, नागरिक आणि शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असं आवाहन सरकारने केलं आहे.

****

No comments: