Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 30 November
2025
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
उद्यापासून सुरू होणाऱ्या
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक
·
मन की बातमधून पंतप्रधान नरेंद्र
मोदी आज देशवासियांशी संवाद साधणार
·
केवळ सव्वा तीन लाख शेतकऱ्यांनी
घेतला रब्बी हंगामासाठी पीक वीमा
·
येत्या निवडणुकांसाठी राजकीय
पक्षांचा प्रचार शिगेला-मतदार जनजागृतीसाठी सर्वत्र विविध कार्यक्रम
आणि
·
सुलतान अजलनशाह चषक हॉकी स्पर्धेत
आज विजेतेपदासाठी भारत – बेल्जियम लढत
****
संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्या सोमवारपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं
आज सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. लोकसभा आणि राज्यसभेतल्या सर्व पक्षांच्या नेत्यांशी
संसदीय कार्य मंत्री किरेन रीजिजू चर्चा करणार आहेत. अधिवेशनाचं कामकाज सुरळीत चालावं
यासाठी सरकार सर्व पक्षाच्या सदस्यांना सहकार्याचं आवाहन करेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे. हे अधिवेशन १९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून
देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा १२८वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी
आणि दूरदर्शन नेटवर्क, वेबसाइट तसंच न्यूजऑनएआयआर मोबाइल ॲपवर प्रसारित केला जाईल.
****
बदलत्या तंत्रज्ञानानुसार आत्मनिर्भर होण्यासाठी सैन्य दलात दाखल होणाऱ्या छात्रांनी
सक्षम असण्याची आवश्यकता, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे प्रमुख डॉ. अजय कुमार यांनी व्यक्त केली. काल पुण्यात
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी- एनडीएच्या १४९ व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळ्यात ते बोलत
होते. यावेळी ३२९ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. विज्ञान शाखेचं रौप्य पदक कार्तिक महेश्वरी, संगणक विज्ञानातलं रौप्य पदक अनन्या बालोनी, कला शाखेतलं रौप्य पदक अनुराग
गुप्ता, तर बी टेक अभ्यासक्रमाचं रौप्य
पदक पुण्याचा विश्वेश भालेराव यांना प्रदान करण्यात आलं.
****
महाराष्ट्रासह तीन राज्यातल्या पायाभूत सुविधांसाठी आशियायी विकास बँक कर्जपुरवठा
करणार आहे. याबाबतचे कर्ज प्रस्ताव काल मंजूर करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातल्या
वीज वितरण व्यवस्थेसाठीच्या पन्नास कोटी डॉलर कर्जाचा समावेश आहे.
****
रब्बी हंगामातील पीक विम्यासाठी आत्तापर्यंत केवळ ३ लाख २६ हजार १६८ शेतकऱ्यांनी
२ लाख ६ हजार ९९५ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला आहे. गेल्या वर्षी सुमारे ५५ लाख शेतकऱ्यांनी
हा विमा उतरवला होता. राज्यातील विमा उतरवलेल्या क्षेत्राची एकंदर विमा रक्कम ८२० कोटी
रुपये आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ५० हजार ४६२ शेतकऱ्यांनी
३३ हजार १२ हेक्टरवरील क्षेत्राचा विमा उतरवला आहे. त्यापाठोपाठ बीड आणि लातूर जिल्ह्याचा
क्रमांक आहे. शेवटच्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात अर्ज येतात. त्यामुळे तांत्रिक
समस्या निर्माण होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी मुदत संपण्यापूर्वीच
पीक विमा उतरवण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.
****
राज्यातल्या २४३ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला
आहे. विविध पक्षांचे ज्येष्ठ नेते प्रचार सभा तसंच प्रचार फेऱ्या काढत मतदारांना आपापल्या
उमेदवारांना मत देण्याचं आवाहन करत आहेत. मुख्यमंत्री
तथा भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भंडारा, चंद्रपूर तसंच गडचिरोली इथं
प्रचार सभा घेतल्या.
उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी लातूर जिल्ह्यात उदगीर
इथं शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या ठिकाणी परिवर्तनाचे वारे सुरू
असल्याचा दावा करत, उदगीर तसंच लातूरच्या विकासाचा त्यांनी आढावा घेतला.
उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी माजलगाव इथं आपल्या
उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. तालुक्यात पायाभूत सुविधांसह दळणवळणाच्या
सुविधांबाबत त्यांनी यावेळी चर्चा केली.
परवा दोन डिसेंबरला मतदान होणाऱ्या या निवडणुकीसाठी उद्या एक तारखेच्या रात्री
दहा वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे.
**
धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विकासाची पंचसूत्री राबवणार
आहे. पक्षाचा वचननामा काल आमदार राणाजगजीतसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या उपस्थितीत प्रकाशित
करण्यात आला. त्यावेळी ही माहिती देण्यात आली.
****
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर इथं स्वीप मतदान जनजागृती
फेरी काढण्यात आली. शहरातल्या २३ शाळांचे सुमारे तीन हजार सातशे विद्यार्थी या फेरीत
सहभागी झाले होते. शिक्षक तथा स्वीपचे सदस्य अशोक चव्हाण आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी
मतदान जनजागृतीपर विविध गीते तसंच पथनाट्य सादर करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
**
परभणी जिल्ह्यात सेलू इथल्या नूतन विद्यालयात दोन हजार शंभर विद्यार्थ्यांनी तब्बल
२० हजार चौरस फुटांची ‘वोट फॉर सेलू’ मानवी साखळी उभारून मतदान जनजागृतीचा संदेश दिला.
****
केंद्र सरकारच्या चार नव्या कामगार कायद्यांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे
खासदार अरविंद सावंत यांनी टीका केली आहे. हे कायदे कामगारांचे अधिकार नष्ट करून अनिश्चितता
तयार करतील, असं त्यांनी म्हटलं आहे. भारतीय
कामगार सेना या कायद्यांच्या अंमलबजावणीला विरोध करेल, या कायद्यांना न्यायालायात आव्हान दिले जाईल, असं त्यांनी माध्यमांना सांगितलं.
****
शैक्षणिक संस्थांनी शिक्षित, दीक्षित आणि उत्तम नागरिक घडवण्याचं आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केलं
आहे. काल मुंबईत शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत एका राष्ट्रीय संघटनेच्या वतीनं राज्यपालांचा
सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. आजच्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांना माहिती मिळत आहे, परंतु जीवनाचं उद्दिष्ट सांगितलं
जात नाही. त्यामुळे शिक्षण संस्थांमधून अपूर्ण व्यक्तिमत्त्व निर्माण होत असल्याकडे
राज्यपालांनी लक्ष वेधलं.
****
मानवी जीवन सुखी व्हावं, असं साहित्यसृजन लेखकांनी करण्याचं आवाहन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
यांनी केलं आहे. नागपूर इथं रेशीम बाग मैदानावर सुरू असलेल्या नागपूर बुक फेस्टिवल
मध्ये, भारत बोध हा युवा लेखक संवाद
कार्यक्रम काल पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. लेखक हे शब्दसृष्टीचे ईश्वर असतात, या शब्दांत साहित्यकांचा गौरव
करत, आपल्याला मिळालेली माहिती
ही व्यवहारिक जीवनात उपयुक्त असली पाहिजे, याकडे भागवत यांनी लक्ष वेधलं.
****
मलेशियात होणाऱ्या सुलतान अजलान शाह चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारत
आणि बेल्जियम संघात लढत होणार आहे. काल झालेल्या उपान्त्य सामन्यात भारतानं कॅनडावर
१४ विरुद्ध ३ अशा गोलफरकाने दणदणीत विजय मिळवला. जुगराज सिंगने चार, अन्य तीन खेळाडूंनी प्रत्येकी
दोन तर चार खेळाडूंनी प्रत्येकी एक गोल केला.
****
बॅडमिंटनपटू किदंबी श्रीकांत याने सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत
धडक मारली आहे. पुरुष एकेरीच्या उपांत्य लढतीत श्रीकांतने मिथुन मंजूनाथचा २१-१५, १९-२१, २१-१३ असा पराभव केला. महिला
दुहेरीत गायत्री गोपीचंद आणि त्रिशा जॉली यांनीही मलेशियन जोडीचा पराभव करत अंतिम फेरी
गाठली. त्यांचा आज जपानच्या जोडीसोबत अंतिम सामना होणार आहे.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेला आजपासून प्रारंभ
होत आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना आज रांची इथं, दुसरा सामना तीन डिसेंबरला
रायपूर इथं तर तिसरा सामना सहा डिसेंबरला विशाखापट्टणम् इथं खेळवला जाणार आहे. या मालिकेपाठोपाठ
दोन्ही संघात पाच टी– ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
****
दिल्लीतल्या विशेष न्यायालयानं कुख्यात गँगस्टर अनमोल बिश्नोईच्या एनआयए कोठडीत
७ दिवसांची वाढ केली आहे. अमेरिकेतून प्रत्यार्पण झाल्यानंतर तो ११ दिवस एनआयए कोठडीत
होता. आता त्याची कोठडी ५ डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे
नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या, अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेला गोळीबार यासह अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा हात
असल्याचा आरोप आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेच्या मतदार यादीत संभ्रम असल्याचा आरोप जिल्ह्याचे
पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते. महानगरपालिकेचे
प्रशासक तथा आयुक्त जी. श्रीकांत यांनी याकडे तत्काळ लक्ष देत, योग्य उपाय योजना करण्याच्या
सूचना पालकमंत्री शिरसाट यांनी केल्या आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत कालपासून गोविंदभाई श्रॉफ
संगीत महोत्सव सुरू झाला. यावेळी उत्कर्षा बोरीकर आणि त्यांच्या चमूने भरतनाट्यम चं
सादरीकरण करून रसिकांची मनं जिंकली. यानंतर उस्ताद दिलशाद खान यांच्या सारंगीवादनाचा
कार्यक्रम पार पडला. आज या महोत्सवाचा समारोप होणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यात नायगाव तालुक्यातल्या कृष्णूर औद्योगिक वसाहत परिसरात बिबट्याने
एका कामगारावर हल्ला चढवला, त्यानंतर या बिबट्याच्या शोधात निघालेल्या वनविभागाच्या कर्मचार्यांवरही त्याने
हल्ला केला. काल संध्याकाळी ही घटना घडली. नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असं आवाहन जिल्हा उपवनसंरक्षक
केशव वाबळे यांनी केलं आहे.
****
No comments:
Post a Comment