Thursday, 12 October 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 12.10.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 12 OCT. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ ऑक्टोबर २०१७ दुपारी १.०० वा.

****

नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या मतमोजणीत आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेस पक्षानं आघाडी घेतली असून निकाल जाहीर झालेल्या जागांपैकी १३ जागा काँग्रेसनं जिंकल्या आहेत तर एका जागेवर भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विजयी झाला आहे. मतमोजणी सुरू असलेल्या जागांपैकी २८ जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. भाजप ३ तर शिवसेनेचे उमेदवार दोन जागांवर आघाडीवर आहे. हैदरबाग, भाग्यनगर, तसंच शिवाजी नगर या प्रभागातले काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. यापूर्वी हैदरबाग मतदारसंघात एमआयएमचे उमेदवार निवडून आले होते. माजी महापौर सुधाकर पांढरे यांची कन्या स्नेहा पांढरे या भाग्यनगरमधून पराभूत झाल्या आहेत. सुधाकर पांढरे हे १९९७ पासून या प्रभागातून निवडून येत होते. या निवडणुकीत काँग्रेसनं पक्षानं सर्व ८१ जागांवर उमेदवार उभे केले होते. भाजपनं ८० जागांवर उमेदवार उभे केले होते तर एका ठिकाणी पुरस्कृत उमेदवार दिला होता. शिवसेनेनं ७३ ठिकाणी उमेदवार दिले होते तर तीन उमेदवार पुरस्कृत केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसनं ५७, एमआयएम ३२ जागा, समाजवादी पक्षानं २४ आणि बहुजन समाजवादी पार्टीनं १७ जागा लढवल्या होत्या. एमआयएम आणि बहुजन समाजवादी पक्षानं युती करून ही निवडणूक लढवली होती. 

****

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भांडुप प्रभागातल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार जागृती पाटील विजयी झाल्या आहेत, त्यांनी शिवसेनेच्या उमेदवार मिनाक्षी पाटील यांचा पराभव केला.

****

राज्यपाल हे सहकारी संघवादात केंद्र आणि राज्य सरकारमधल्या संबंधात महत्त्वाचा दुवा असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित दोन दिवसीय राज्यपाल संमेलनात ते आज बोलत होते. राजभवनातली मूल्य आणि आदर्शामधून जनतेला प्रेरणा मिळत असल्याचं ते म्हणाले. २०२२ पर्यंत भ्रष्टाचार, गरीबी, अस्वच्छता यापासून मुक्ती मिळवून नवीन भारत निर्माण करायचा असल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाले. या संमेलनात विविध विषयांचर चर्चा करण्यात येणार आहे. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यावेळी उपस्थित होते.

****

जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्यानं आज पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. सकाळी दहा वाजेच्या सुमारास पाकिस्तानी सैन्यानं लष्करी तळ आणि रहीवाशी भागांना लक्ष्य करत गोळीबार सुरु केला. भारतीय जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं. यात कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही.

दरम्यान, बांदीपुरा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या वायुसेनेच्या दोन जवानांचे पार्थिव देह आज त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आले. यात नाशिक जिल्ह्यातले जवान मिलिंद किशोर आणि बिहारमधल्या भवालपूर इथले निलेश कुमार यांचा समावेश आहे.

****

गुजरात आणि हिमाचल प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज केंद्रीय निवडणूक आयोग जाहीर करण्याची शक्यता आहे. या दोन्ही राज्यात सध्याच्या सरकारचा कार्यकाळ येत्या जानेवारी महिन्यात संपत आहे. निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेबरोबरच आचारसंहीता लागू होईल. आज संध्याकाळी निवडणूक आयोग वार्ताहर परिषद घेणार असून, त्यावेळी ही घोषणा होण्याची शक्यता आहे.

****

गोपनियतेच्या अधिकारासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयामध्ये आधार क्रमांकाशी संबंधित माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी पुरेशा तरतुदी असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. कोलंबिया विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आधार मधल्या माहितीला कशा प्रकारे सुरक्षित ठेवता येईल, याची माहिती आधार कायद्यात समाविष्ट करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. या सगळ्या सुरक्षिततेसंबंधी तरतुदींना कायद्याचं रुप देण्यात आल्याचं ते म्हणाले.

****

जमिनीच्या कागदपत्रांच्या प्रती देण्यासाठी पाचशे रुपयांची लाच घेताना बीड  जिल्ह्यातल्या पाटोदा इथल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयातला शिपाई शेख जफर अब्दुल रहीम यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज रंगेहाथ पकडलं. कागदपत्रांच्या नकला देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****

बीड जिल्ह्यात गेले दोन दिवस झालेल्या पावसामुळे आंबाजोगाईचं मांजरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असल्यामुळे धरणातून ३३५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्या येत आहे.  त्यामुळे मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथलं जायकवाडी धरणही पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. धरणात सध्या २२ हजार ९९७ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु असून, धरणातून २३ हजार ८१४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

****

१७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा सामना घानाच्या संघाविरुद्ध होणार आहे. दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरु मैदानात रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. याव्यतिरिक्त आज अमेरिका विरुद्ध कोलंबिया, माली विरुद्ध न्यूझीलंड आणि पॅराग्वे विरुद्ध तुर्कस्तान यांच्यातही आज सामने होणार आहेत.

****

No comments:

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 11 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्...