Thursday, 12 October 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 12.10.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 12 October 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ ऑक्टोबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

नांदेड वाघाळा महापालिका निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. महापालिकेतल्या एकूण ८१ जागांपैकी, ७३ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये काँग्रेसनं ६६, भारतीय जनता पक्षानं पाच, शिवसेनेनं एक, तर एक जागा अपक्ष उमेदवारानं जिंकली आहे.
या निवडणुकीत काँग्रेसनं सर्व ८१ जागांवर उमेदवार उभे केले होते. भाजपनं ८० जागांवर, तर एका ठिकाणी पुरस्कृत उमेदवार दिला होता. शिवसेनेनं ७३ ठिकाणी उमेदवार दिले होते तर तीन उमेदवार पुरस्कृत केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसनं ५७, एमआयएम ३२ जागा, समाजवादी पक्षानं २४ आणि बहुजन समाजवादी पक्षानं १७ जागा लढवल्या होत्या. एमआयएम आणि बहुजन समाजवादी पक्षानं युती करून ही निवडणूक लढवली होती. २० वर्षांपूर्वी अस्तिवात आलेल्या या महानगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता असून मावळत्या महापालिकेत काँग्रेसचे ४२ सदस्य होते, त्याखालोखाल शिवसेना १४, एमआयएमचे ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे १० सदस्य होते.

****

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात ९ नोव्हेंबर रोजी घेण्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त अचल कुमार ज्योती यांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत केली. विधानसभेच्या ६८ जागांसाठी ही सार्वत्रिक निवडणूक असून १८ डिसेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. तत्पूर्वी गुजरात विधानसभेची सार्वत्रिक निवडणूकही १८ डिसेंबरपूर्वी होईल असंही ज्योती यांनी यावेळी सांगितलं.

****

बहुचर्चित आरुषी आणि हेमराज हत्याकांड प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयानं आरोपी राजेश आणि नुपूर तलवार यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात सीबीआय न्यायालयानं २६ नोव्हेंबर २०१३ रोजी आरुषीचे आई-वडील राजेश आणि नुपूर तलावर यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात राजेश आणि नुपूर तलवार यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात अपील केलं होतं. १६ मे २००८ रोजी आरुषी त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळली होती, तिची नोकराने हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता, मात्र दुसऱ्या दिवशी नोकर हेमराजचाही मृतदेह घराच्या गच्चीवर आढळून आला होता.

****

स्मार्ट सिटीच्या विकासासाठी उपयुक्त तंत्रज्ञान तसंच घनकचरा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापन क्षेत्रात अधिकाधिक सहकार्य वाढवण्याबाबत स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लॉफवेन यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखालील राज्याचं शिष्टमंडळ स्वीडनच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर असून, या शिष्टमंडळानं पहिल्या दिवशी विविध उद्योगसमूह तसंच मान्यवरांशी संवाद साधला. भारत आणि स्वीडन बिझनेस लीडर्स राउंड टेबल या परिषदेला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी, महाराष्ट्रात गुंतवणुकीसह औद्योगिक विकासासाठी उपलब्ध असलेल्या संधींची विस्तारानं माहिती दिली.

****

रक्ताचे नाते असल्यास कुटुंबातील अन्य व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र देण्यासंदर्भात राज्य सरकारच्या निर्णयामुळे बनावट प्रमाणपत्र धारक आदिवासींना संरक्षण मिळेल अशी भिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आदिवासी विकास विभागाचे माजी मंत्री मधुकर पिचड आणि पद्माकर वाळवी यांनी नाशिक इथं वार्ताहरांशी बोलतांना आज व्यक्त केली. हा निर्णय राज्य सरकारनं मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा विधानसभेचे आमदार चंद्रकांत सोनवणे, गडचिरोलीचे आमदार कृष्णा गजबे तसंच नाशिक जिल्ह्यातल्या बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांचं आदिवासी जातीचं प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोपही पिचड आणि वळवी यांनी केला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

राज्याचं आपत्ती प्रतिसाद दल हे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या धर्तीवर सक्षम करण्यात येत असून, कुठल्याही आपत्ती निवारणासाठी हे दल सज्ज असल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. जागतिक आपत्ती निवारण आणि व्यवस्थापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित प्रदर्शनाचं आणि महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या लोगोचं अनावरण आज पाटील यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. आपत्तीच्या काळात दुर्गम ठिकाणी पोहोचता यावं यासाठी २९ वाहनं खरेदी करण्यात आली आहेत, अशी माहितीही पाटील यांनी दिली.

****

माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस राज्यभरात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. येत्या १५ ऑक्टोबरला रविवारी सार्वजनिक सुट्टी असल्यानं उद्या १३ तारखेला वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही सर्व शासकीय कार्यालयांना उद्या वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्...