Saturday, 14 October 2017

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 14.10.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 14 OCT. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ ऑक्टोबर २०१७ दुपारी १.०० वा.

****

अवैध घुसखोरांचा आणि रोहिंग्यांचा हस्तांतरणाचा प्रश्न ही कार्यकारी बाब असून केंद्रीय गृह मंत्रालय याबाबत योग्य ती कारवाई करेल, असं केंद्रीय गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं काल नवी दिल्लीत म्हटलं आहे. दोन्ही देशांचे हितसंबंध, अंतर्गत सुरक्षा आणि लोकसंख्येमधील बदल या सर्व गोष्टी विचारात घेऊनच याबाबत काय तो निर्णय घेण्यात येईल, असंही या प्रवक्त्यानं म्हटलं आहे. रोहिंग्या मुस्लिमांना म्यानमारमध्ये परत पाठवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालय २१ नोव्हेंबरपासून तपशीलवार सुनावणी घेणार आहे. त्यावर केंद्रीय गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं ही प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय सुरक्षा आणि मानवाधिकारामध्ये समतोल साधला गेला पाहिजे, असं मत नोंदवलं आहे.

                                    ****

पुढील दोन दशकांमध्ये भारताकडे चांगल्या वृद्धीदरानं प्रगती करण्याची क्षमता असल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. ते काल वॉशिंग्टनमध्ये आयोजित अमेरिका-भारत सामरिक आणि भागीदारी मंचच्या कार्यक्रमात बोलत होते. देशात केंद्र सरकारकडून करण्यात येत असलेल्या रचनात्मक बदल, अर्थव्यवस्थेतले सकारात्मक बदल आणि भारतीय अर्थव्यवस्थेत गुंतवणूकीच्या निर्माण झालेल्या संधी यामुळे हा बदल होत असल्याचं जेटली यावेळी म्हणाले. वस्तू आणि सेवा कर यामुळे देशात परिणामकारक व्यवस्था निर्माण झाली असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.

****

पुढच्या आठवड्यात १६ ते १९ ऑक्टोबरदरम्यान बहामसमध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थच्या कायदेमंत्र्यांच्या बैठकीत दहशतवाद आणि कट्टरवादसारखे मुद्दे उचलणार असल्याचं कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं. ते नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते. त्याचप्रमाणे डिजिटल इंडिया कार्यक्रमाबाबत भारतीय शिष्टमंडळ त्यांचे विचार यावेळी मांडणार आहे, तसंच जनधन कार्यक्रम, मोबाईल आणि आधार कार्डच्या माध्यमातून अनुदान थेट खात्यावर जमा करण्यात येत असल्याचा मुद्दाही उपस्थित करणार असल्याचं प्रसाद यांनी सांगितलं.

****

जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात सीमा सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला. आज पहाटेच्या सुमारास ही चकमक झाली. या चकमकीत लष्कर ए तय्यबाचे दोन दहशतवादी ठार झाले.  

****

गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा न करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं निवडणूक आयोगावर दबाव टाकला असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. निवडणूक आयोगानं दिल्ली इथं हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचीच घोषणा केली, मात्र गुजरातच्या निवडणुकीची कोणतीही माहिती दिली नसल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं हा आरोप केला. मात्र भाजपनं हा आरोप फेटाळून लावला आहे.

दरम्यान, हिमाचल प्रदेशात नऊ नोव्हेंबरला मतदान होणार असून, आचासंहिता लागू करण्यात आली आहे.

****

जालना औद्योगिक वसाहतीत ड्रायपोर्टच्या कामाला पुढच्या महिन्यात सुरुवात होईल, जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी काल ही माहिती दिली. जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत डिग्गीकर बोलत होते. यामध्ये ड्रायपोर्टसाठी रेल्वे रुळ अंथरणं, नियोजित समृद्धी महामार्गापर्यंत स्वतंत्र चौपदरी रस्ता तयार करणं, आदी कामांचा समावेश आहे.

****

औरंगाबाद शहरात सार्वजनिक ठिकाणी असलेल्या आठ धोकादायक पेट्रोल पंपांपैकी सहा पंप दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार असल्याचं शपथपत्र पोलिस आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलं आहे. सामाजिक कार्यकर्ते शहीद अस्लम यांनी यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे.शहरातल्या सार्वजनिक ठिकाणांसह वारसा स्थळांच्या परिसरात असलेले आठ धोकादायक पेट्रोल पंप शहराबाहेर हलवण्याची विनंती या याचिकेत केली होती. यावर जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांना शपथपत्र दाखल करण्याचे आदेश खंडपीठानं दिले होते.

****

औरंगाबाद शहरातल्या जिल्हा परिषद मैदानावर औरंगाबाद फटाका संघटनेला यावर्षी फटाका बाजार उभारण्यास मनाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षी या मैदानावर फटाका बाजाराला आग लागून मोठं नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषद मैदान शहराच्या मध्यवस्तीत येत असल्यानं परवानगी नाकारण्यात आली असून, त्याऐवजी गावाबाहेर असलेल्या अयोध्यानगरी परिसरात हा बाजार उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत.

****

डच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आश्विनी पोनप्पा आणि सात्विक साईराज ही भारतीय जोडी, मिश्र दुहेरीच्या उपान्त फेरीत पोहचली आहे. काल नेदरलँड्समधल्या अलमेरे इथं झालेल्या उपान्तपूर्व सामन्यात त्यांनी, आयर्लंडच्या स्कॉट इव्हान्स आणि स्वीडनच्या अमँडा हॉग्स्टॉर्म या जोडीचा २१ - १८, २१ - १४ असा पराभव केला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...