Saturday, 14 October 2017

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 14.10.2017 11.00




आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

१४ ऑक्टोबर २०१७ सकाळी ११.०० वाजता

****

जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळी झालेल्या चकमकीत लष्कर ए तय्यबाचे दोन दहशतवादी ठार झाले. वसीम शाह आणि हाफिज निसार अशी या दोघांची नावं आहेत. पुलवामा जिल्ह्यातल्या लितर गावात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी शोधमोहीम सुरु केली. त्यावेळी ही चकमक झाली. 

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहारच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते पाटणा विद्यापीठाच्या शतक महोत्सव समारंभाला उपस्थित राहणार आहेत.'नमामि गंगे' योजनेअंतर्गत चार मलनि:स्सारण प्रकल्पाचा तर मोकामा इथल्या चार राष्ट्रीय महामार्गांच्या एकूण ३७ अब्ज रुपयांच्या रस्ते निर्माण योजनांचा शुभारंभही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

****

नाशिक इथं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तीन अभियंत्यांना, काल तीन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. रस्ता दुरुस्तीचं देयक मंजूर करण्यासाठी त्यांनी लाचेची मागणी केली होती.

तर, औरंगाबाद इथं एका न्यायालयीन प्रकरणात, तारीख वाढवून देण्यासाठी चारशे रूपये लाच स्वीकारतांना सेवानिवृत्त कोतवाल महिलेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली.

****

औरंगाबादनजीकचा मांडकी इथला कचरा डेपो हटवावा, या मागणीसाठी परिसरातल्या तेरा गावांमधल्या ग्रामस्थांनी काल गावामध्ये आंदोलन केलं. औरंगाबाद शहरातला दररोज सुमारे साडेचारशे टन कचरा या परिसरात टाकला जातो.

****

जालना जिल्ह्यात काल दोन महिलांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. घनसावंगी आणि बदनापूर तालुक्यात या घटना घडल्या. या पावसामुळे मका, सोयाबीन तसंच वेचणीस आलेल्या कापसाचं नुकसान झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यात काल झालेल्या जोरदार पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुरात एक माजी सैनिक वाहून गेल्याची घटना घडली. त्यांचा मृतदेह सुमारे दीड किलोमीटर अंतरावर सापडला.

****

लातूर इथले ज्येष्ठ शिक्षक शशिकांत बोकील यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं, ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. अर्थक्रांतीचे प्रणेते अनिल बोकील यांचे ते वडील होत.

****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...