Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 OCT. 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ ऑक्टोबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
शिवसेना
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अत्यंत खालच्या दर्जाचं राजकारण केलं असल्याचं महाराष्ट्र
नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. अशा प्रकारच्या राजकारणामुळेच
आपण शिवसेनेतून बाहेर पडलो, असंही राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. मुंबई
महापालिकेतले मनसेचे सहा नगरसेवक नुकतेच शिवसेनेत दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना,
ठाकरे यांनी या पक्षांतराच्या मागे आर्थिक व्यवहार झाल्याचा अप्रत्यक्ष आरोप केला.
या व्यवहारांशी आपला काहीही संबंध नसल्याचं ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
****
माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची आज जयंती. यानिमित्त देशभरात विविध उपक्रमांच्या माध्शयमातून
कलाम यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद
यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष अभिवादन सभेत
अब्दुल कलाम यांना अभिवादन
करताना, राष्ट्रनिर्माणात अब्दुल कलाम यांचं योगदान देश कधीच विसरणार
नाही, असं नमूद
केलं. यावेळी राष्ट्रपतींनी कलाम संदेश वाहिनी - व्हिजन २०२० या वाहनाचं स्वागत केलं. याअंतर्गत १६ राज्यात २०२० मधल्या
भारताबद्दलच्या कलामांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यात आला.
राज्यभरात हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून
साजरा करण्यात येतो.
औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय
आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन
अभिवादन केलं. या
निमित्तानं गेल्या दोन दिवसांपासून राज्यात वाचन प्रेरणा उपक्रम आयोजित केले जात आहेत.
****
भारतीय अर्थव्यवस्थेची मध्यावधीमध्ये
दमदार वाटचाल सुरु असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिर्स्टन लिगार्ड
यांनी म्हटलं आहे. वॉशिंग्टनमध्ये आयोजित एका वार्ताहर परिषदेत त्या बोलत होत्या. कमी
झालेली आर्थिक तूट आणि चलन वाढ, तसंच, पायाभूत सुधारणा यामुळे तरुण भारतीयांना अपेक्षित
नोकऱ्या मिळू शकतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, वॉशिंग्टन इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय
नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी, गतिमान
अर्थव्यवस्थांना पाठबळ देणाच्या दृष्टीनं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून वित्तपुरवठयात
वाढ करण्यात यावी, अशी मागणी केली. २०१९ सालच्या वार्षिक बैठकीपूर्वी नियोजन वेळापत्रकानुसार
हा आढावा पूर्ण व्हावा, तसंच, जागतिक स्तरावर आर्थिक स्थैर्य प्रभावित करणाऱ्या घटकांवर नाणेनिधीच्या सहाकार्यातून नियंत्रण मिळवणं शक्य होईल,
असंही जेटली
यांनी नमूद केलं.
****
जम्मू - काश्मीरमध्ये दहशतवाद आता अंतिम टप्प्यात
आला असून,
दहशतवादी आता पळून जात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी
म्हटलं आहे. ते जम्मू इथं वार्ताहरांशी बोलत होते. जम्मू - काश्मीर
पोलिसांचा खास कारवाई गट दहशतवाद्यांविरुध्दच्या कारवाईत, सुरक्षा फौजांबरोबर उकृष्ट
काम करत असल्याचं ते म्हणाले. राज्यात दहशतवाद भडकावण्यासाठी पाकिस्तान करत असलेले प्रयत्न हे त्यांच्या नैराश्याचं
प्रतीक असल्याचंही सिंग यावेळी म्हणाले.
****
हिमाचल प्रदेश सरकारमधले राज्य मंत्री तसंच वरिष्ठ काँग्रेस नेते अनिल शर्मा, भारतीय जनता पक्षात सामिल
झाले आहेत. भाजपामध्ये प्रवेश करुन आपण पंतप्रधान मोदी यांची स्वप्न साकार करण्याचा
प्रयत्न करु असं शर्मा यांनी सांगितलं.
****
पुणे-सोलापूर महामार्गावर शेटफळ इथं अज्ञात
वाहनानं धडक दिल्यानं एकाचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी हा अपघात झाला. या अपघातानंतर
संतापलेल्या नागरिकांनी मृतदेह रस्त्यावरच ठेवून हा महामार्ग सुमारे
दीड तास रोखून धरला. या ठिकाणी भुयारी मार्गाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत
आंदोलनाचा पवित्रा भारतीय दलित महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी
घेतला. मोहोळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी याबाबतचं लेखी निवेदन स्वीकारल्यानंतर
आंदोलन मागे घेण्यात आलं.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर नजीक कर्नाटक राज्य
परिवहन मंडळाची बस शेल्हाळच्या पुलावरून उलटल्यानं
एकाचा मृत्यू झाला, तर २८ जण जखमी झाले. आज सकाळी हा अपघात झाला. जखमींना उदगीर उपजिल्हा
रुग्णालयात दाखल करण्यात आलं
आहे.
****
राज्यात दुसऱ्या
टप्प्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचाराची
मुदत काल संपली. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या १६५ सरपंच पदासाठी तर एक हजार ५६१ सदस्य पदांसाठी
ही निवडणूक होत आहे.
राज्यात ठाणे ४१, पालघर ५६, रायगड २४२, रत्नागिरी २२२,
सिंधुदुर्ग ३२५, पुणे २२१, सोलापूर १९२, सातारा ३१९, सांगली ४५३, कोल्हापूर ४७८,
नागपूर २३८, वर्धा ११२, चंद्रपूर ५२, भंडारा ३६२, गोंदिया ३५३, आणि गडचिरोली
जिल्ह्यातल्या २६ ग्रामपंचायतींसाठीही उद्या मतदान होणार आहे.
****
No comments:
Post a Comment