Friday, 13 October 2017

Text - AIR NEWS BULLETIN AURANGABAD 13.10.2017 11.00




आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

१३ ऑक्टोबर २०१७ सकाळी ११.०० वाजता

****

जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानकडून आज सलग दुसऱ्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. कृष्णाघाटी सेक्टर परिसरात सकाळी पावणे आठच्या सुमारास पाकिस्तानी सैन्यानं सीमेपलिकडून अंदाधुंद गोळीबार सुरु केला. भारतीय जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्यूत्तर दिल्याचं संरक्षण प्रवक्त्यानं पीटीआयशी बोलताना सांगितलं. 

****

दरम्यान, काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले वायुदलातले कमांडो मिलिंद खैरनार यांच्या पार्थिवावर काल नंदुरबार जिल्ह्यातल्या बोराळे इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. परवा बुधवारी जम्मू-काश्मीरमधल्या बंदिपुरा जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत खैरनार यांना वीरमरण आलं होतं.

****

औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आजपासून तीन दिवस सूक्ष्म जीवशास्त्रज्ञांची २३ वी राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. हवेच्या माध्यमातून पसरणाऱ्या आजारांपासून कसा बचाव करावा यावर या परिषदेत तज्ज्ञ डॉक्टर्स मार्गदर्शन करणार आहेत.

****

यवतमाळ जिल्हयात आणि राज्याच्या इतर भागात पिकांवर फवारणी करतांना झालेल्या विषबाधेच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, औरंगाबाद जिल्ह्यात अशा प्रकारच्या दुर्घटना होवू नयेत यासाठी किटनाशकं फवारतांना आणि हाताळतांना शेतकऱ्यांनी सर्वतोपरी काळजी घेण्याचं आवाहन औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी केलं आहे. काल औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

****

ग्रामीण भागात कृषी ग्राम सभा घेण्याचा नाशिक पॅटर्न संपूर्ण राज्यात राबवण्यात येणार असल्याचं कृषी आणि फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. ते काल नाशिक इथं कृषी प्रशिक्षण केंद्रात आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. या सभा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचं खोत यांनी नमूद केलं.

****

१७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत भारताचं आव्हान काल संपुष्टात आलं. नवी दिल्ली इथं झालेल्या ‘अ’ गटातल्या लढतीत घानानं भारतावर चार शून्य अशी मात केली आणि बाद फेरीतला आपला प्रवेश निश्चित केला. यापूर्वी झालेल्या दोन सामन्यांमध्येही भारताला अमेरिका आणि कोलंबियाकडून पराभव पत्करावा लागला. 

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्...