Friday, 13 October 2017

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 13.10.2017 6.50




Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 13 OCT. 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ ऑक्टोबर २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·     नांदेड वाघाळा महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा एकतर्फी विजय, ८१ पैकी ७३ जागा काँग्रेसला, भाजपला सहा तर शिवसेनेला एक जागा, एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा दारूण पराभव

·     स्मार्ट सिटीच्या विकासासाठी उपयुक्त तंत्रज्ञान तसंच घनकचरा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापन क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वीडनच्या पंतप्रधानांसोबत चर्चा

·     पावसामुळे झालेल्या पीकांच्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरपाई देण्याची विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची मागणी

·     तुळजापूर यात्रा अनुदान घोटाळाप्रकरणी फरार असलेल्या तुळजापुरच्या नगराध्यक्षा अर्चना गंगणे पोलिसांना शरण

आणि

·     औरंगाबाद महापौर पदाची २९ ऑक्टोबरला निवडणूक

****

नांदेड वाघाळा महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षानं एकूण ८१ जागांपैकी ७३ जागा पटकावत एकतर्फी विजय मिळवला आहे, भारतीय जनता पक्षानं सहा, शिवसेनेनं एक, तर अपक्ष उमेदवारांनी एका ठिकाणी विजय मिळवला.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षाला एकही जागा मिळाली नाही. २० वर्षांपूर्वी अस्तिवात आलेल्या या महानगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता असून, ती टिकवण्यात काँग्रेसला यश आलं आहे.

नांदेडकरांनी काँग्रेसच्या कठीण काळात साथ दिली, त्यांचे आपण आभार मानतो, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं. फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपचा आता परतीचा प्रवास सुरु झाला आहे, परभणी, भिवंडीमध्येही जनतेनं काँग्रेसवर विश्वास दाखवला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

****

कोल्हापूर महापालिकेच्या एका प्रभागातल्या पोटनिवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीचे उमेदवार प्रज्ञेश शिरोडकर विजयी झाले आहेत. मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ११३ च्या पोटनिवडणुकीत भाजपच्या जागृती पाटील यांनी काँग्रेसच्या प्रमिला सिंग यांचा पराभव केला.

****

स्मार्ट सिटीच्या विकासासाठी उपयुक्त तंत्रज्ञान तसंच घनकचरा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापन क्षेत्रात अधिकाधिक सहकार्य वाढवण्याबाबत स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लॉफवेन यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखालील राज्याचं शिष्टमंडळ स्वीडनच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर असून, या शिष्टमंडळानं पहिल्या दिवशी विविध उद्योगसमूह तसंच मान्यवरांशी संवाद साधला. भारत आणि स्वीडन बिझनेस लीडर्स राउंड टेबल या परिषदेला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी, महाराष्ट्रात गुंतवणुकीसह औद्योगिक विकासासाठी उपलब्ध असलेल्या संधींची विस्तारानं माहिती दिली.

****

राज्यात गेल्या काही दिवसांत परतीच्या पावसामुळे पीकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. याबाबत धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्रही पाठवलं आहे. मराठवाड्यात सोयाबीनसह मका, कापूस, उडीद या पीकांचं नुकसान झालेलं आहे. विदर्भात कापूस, सोयाबीन भिजल्यानं शेतकरी धास्तावला आहे. फळबागा, भाजीपाला यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याकडे मुंडे यांनी या पत्रात मुख्यमंत्र्याचं लक्ष्य वेधलं आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

****

रक्ताचे नाते असल्यास कुटुंबातील अन्य व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे. या राज्य सरकारच्या निर्णयामुळे बनावट प्रमाणपत्र धारक आदिवासींना संरक्षण मिळेल अशी भिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आदिवासी विकास विभागाचे माजी मंत्री मधुकर पिचड तसंच काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी नाशिक इथं वार्ताहरांशी बोलतांना काल व्यक्त केली. हा निर्णय राज्य सरकारनं मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा विधानसभेचे आमदार चंद्रकांत सोनवणे, गडचिरोलीचे आमदार कृष्णा गजबे तसंच नाशिक जिल्ह्यातल्या बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांचं आदिवासी जातीचं प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोपही पिचड आणि वळवी यांनी केला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

राज्याचं आपत्ती प्रतिसाद दल हे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या धर्तीवर सक्षम करण्यात येत असून, कुठल्याही आपत्ती निवारणासाठी हे दल सज्ज असल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. जागतिक आपत्ती निवारण आणि व्यवस्थापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित प्रदर्शनाचं आणि महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बोधचिन्हाचं अनावरण काल पाटील यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. आपत्तीच्या काळात दुर्गम ठिकाणी पोहोचता यावं यासाठी २९ वाहनं खरेदी करण्यात आली आहेत, अशी माहितीही पाटील यांनी दिली.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवासाठी शासनाकडून मिळालेल्या अनुदानात गैरव्यवहार केल्याप्रकरणी, गेल्या सहा महिन्यांपासून फरार असलेल्या तुळजापुरच्या नगराध्यक्षा अर्चना गंगणे काल पोलिसांना शरण आल्या. तूळजापुर पोलिसांनी त्यांना अटक केली असून आज त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. २०११ मधल्या नवरात्र महोत्सवासाठी एक कोटी ६२ लाख रूपयांच्या अनुदानात गैरव्यवहार केल्याप्रकरणी गंगणे यांच्यासह तत्कालीन मुख्याधिकारी आणि लेखापाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या सहा महिन्यांपासून गंगणे या पोलिसांना गुंगारा देत होत्या. अखेर काल त्यांना अटक करण्यात आली.

****

औरंगाबाद महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या २९ आक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. त्याआधी २५ ते २७ आक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज स्विकारले जाणार असून २९ तारखेला  सकाळी अकरा वाजता अर्जांची छाननी केली जाणार आहे. अर्जांच्या छाननी नंतर अर्ज मागे घेण्यासाठी अर्धा तासाचा अवधी दिला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

****

माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस राज्यभरात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. येत्या रविवारी सार्वजनिक सुट्टी असल्यानं आज वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही सर्व शासकीय कार्यालयांना आज वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत.

****

जालना ते वडीगोद्री या रस्त्याचं चौपदरीकरण करण्यात यावं, या मागणीसाठी काल बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. अंबडपासून ३० बैलगाड्यांसह जालन्याकड़े निघालेला हा मोर्चा सात किलोमीटरपर्यंत आल्यानंतर महसूल अधिकाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेऊन मागण्यांचं निवेदन स्वीकारलं. भारतीय जनता पक्ष वगळता सर्व राजकीय पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, डॉक्टर, वकील, व्यापारी आणि विद्यार्थ्यांनी या मोर्चात सहभाग घेतला.

****

राज्यात कालही अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. जालना शहरासह जिल्ह्यात बहुतांश भागात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह पाऊस झाला. या पावसामुळे जालन्यातला कुंडलिका नदीवरील बंधारा ओसंडून वाहत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. उस्मानाबाद इथंही काल सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद इथंही हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.

****

उस्मानाबादचे माजी नगराध्यक्ष शेख सत्तार शेख हुसेन यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं. ते ६५ वर्षांचे होते. शेख अनेक सामाजिक कार्यातही अग्रेसर होते. उस्मानाबाद इथं आज सकाळी त्यांचा दफनविधी होणार आहे.

****

जमीन व्यवहार प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल न करण्यासाठी ३५ हजार रूपयांची लाच घेतांना औरंगाबाद इथल्या बेगमपुरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसीम हाश्मी यांना काल रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ पकडलं. हाश्मी यांच्या घराची रात्री उशिरापर्यंत झडती सुरू होती. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

बीड जिल्ह्यात गेले दोन दिवस झालेल्या पावसामुळे मांजरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून धरणातून ३३५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्...