Tuesday, 7 November 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 07.11.2017 01.00PM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 07 November 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  नोव्हेंबर २०१ दुपारी १.०० वा.

*****

विमुद्रीकरणामुळे काळा पैसा बाहेर आणण्यासाठी, बनावट नोटा नष्ट करणं आणि रोख व्यवहार कमी करण्यासाठी मदत झाली असल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. चार ऑगस्ट पर्यंत रोख व्यवहार १८ लाख कोटीवरुन १५ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले असल्याचं मंत्रालयानं ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे. नवीन नोटा आल्यानंतर फक्त ८३ टक्के नगद चलनात असल्याचंही मंत्रालयानं सांगितलं आहे. अर्थव्यवस्थेसाठी विमुद्रीकरणासह अन्य उपाययोजनांचा उल्लेख करत मंत्रालयानं, यामुळे दहशतवादाला निधी पुरवणाऱ्यांना मोठा झटका बसला असल्याचं म्हटलं आहे. या निर्णयामुळे डिजिटल व्यवहारांनाही चालना मिळाली असल्याचं मंत्रालयानं नमूद केलं आहे.

****

प्राप्तीकर विभागानं आतापर्यंत एक हजार ८३३ कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त केल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष सुशील चंद्रा यांनी दिली आहे. बेहिशेबी मालमत्ताधारकांवरची कारवाई यापुढेही सुरु राहील, असं चंद्रा यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

****

मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाला जोडण्याच्या दूरसंचार विभागाच्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय येत्या सोमवारी १३ नोव्हेंबरला सुनावणी घेणार आहे. दूरसंचार विभागाची ही अधिसूचना असंवैधानिक असून, ती रद्द करावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

****

हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपत आहे. राज्यभरात आज अनेक राजकीय नेत्यांच्या प्रचार संभांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातल्या ६८ जागांसाठी परवा नऊ तारखेला मतदान होणार असून, १८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.  

****

अपघाताच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं आठवी ते बारावीपर्यंत शालेय अभ्यासक्रमात वाहतुक नियमांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं, पाठ्यपुस्तक  निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती यांना पत्र पाठवून तशा सूचना दिल्या आहेत. जालना इथल्या भागिरथी मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक विकास काळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवून तशी मागणी केली होती.

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुढच्या वर्षी मार्च मध्ये घेण्यात येणाऱ्या  दहावीच्या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत येत्या १४ तारखेपर्यंत वाढवण्यात आली आहे. विलंब शुल्कासह हे अर्ज येत्या ३० तारखेपर्यंत भरता येतील, असं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.

****

पालघर जिल्हा मुख्यालयाचं भूमिपूजन उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हा मुख्यालय आणि नवीन शहर विकसित करण्यासाठी राज्यशासनातर्फे पालघर नवीन शहरे विकास प्राधिकरणाची नियुक्ती करण्यात आली आहे. पाच हजार तीनशे ४४ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेल्या पालघर नवीन शहामध्ये पालघर, कोळगाव, मोरेकुरण, नांदोरे, दापोली, टेंभाडे आणि शिरगाव या ७ गावांचा समावेश असेल.

****

औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या रोटेगाव इथं विविध रेल्वेगाड्या थांबवाव्यात, यासाठी प्रयत्न करू, त्यासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार, असं आश्वासन आमदार अतुल सावे यांनी दिलं आहे. रेल्वे प्रवासी कृती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सावे यांना यासंदर्भात एक निवेदन सादर केलं, त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिलं.

****

विएतनाम इथं सुरु असलेल्या आशियाई महिला मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताची एम सी मेरी कोम आज उपान्त्य फेरीचा सामना खेळणार आहे. ४८ किलो वजनी गटात होणाऱ्या या सामन्यात तिच्यासमोर जपानच्या सुबासा कोमुराचं आव्हान असेल. ६४ किलो वजनी गटात सरिता देवी, ५७ किलो वजनी गटात सोनिता लाथर, ५४ किलो वजनी गटात शिक्षा, ६० किलो वजनी गटात प्रियंका चौधरी आणि ६९ किलो वजनी गटात लवीना बोर्ग्रोहीन यांचेही आज उपान्त्य फेरीतले सामने होणार आहे.

****

ऑस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट इथं झालेल्या राष्ट्रकुल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं २० पदकांची कमाई केली. काल शेवटच्या दिवशी पुरुषांच्या ५० मीटर रायफल प्रकारात सत्येंद्र सिंगनं सुवर्ण, तर संजीव राजपुतनं रौप्य पदक जिंकलं. या स्पर्धेत भारतानं सहा सुवर्ण, सात रौप्य आणि सात कांस्य पदकं पटकावली.

****

दरम्यान, आशिया हॉकी चषक जिंकलेला महिलांचा संघ काल रात्री जपानहून दिल्ली इथं परतला. या संघाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

*******

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...