Monday, 13 November 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 13.11.2017 13.00PM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 13 November 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  १३ नोव्हेंबर २०१ दुपारी १.०० वा.

*******

३१वं आसियान शिखर संमेलन आज फिलिपाईन्सची राजधानी मनीला इथं सुरु झालं. या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आसियानच्या दहा सदस्य राष्ट्रांचे नेते सहभागी झाले आहेत. रामायणावर आधारित  रामा हरी हा संगीत कार्यक्रम उद्घाटन समारंभात मुख्य आकर्षण ठरला.

दहशतवाद आणि हिंसक अत्याचाराचा शांतता, स्थिरता आणि सुरक्षेला धोका असल्याचं फिलिपाईन्सचे राष्ट्रपती आणि आसियानचे अध्यक्ष रोद्रिगो दुतेर्ते यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितलं. मूलतत्ववाद, हिंसक अत्याचार, तस्करी, अंमली पदार्थांचा व्यापार, महिलांची सुरक्षा, आरोग्य आणि युवक कल्याण यासारख्या विषयांवर सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे, असं ते म्हणाले.    

संमेलनाच्या उद्घाटन सत्रानंतर पंतप्रधान मोदी यांनी मनीलातल्या आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था आणि 'महावीर फाउंडेशन'ला भेट दिली.

आसियान शिखर संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आज ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फिलिपाईन्सचे राष्ट्रपती रोद्रिगो दुतेर्ते यांची भेट घेणार आहेत. तसंच आसियान आणि पूर्व आशिया शिखर परिषदेला उपस्थित अन्य देशांच्या नेत्यांची देखील ते भेट घेतील. आज संध्याकाळी आसियान व्यापार आणि गुंतवणूक संमेलनाला पंतप्रधान संबोधित करणार आहेत. त्यानंतर फिलिपाईन्समधल्या भारतीय राजदूतांनी आयोजित केलेल्या समारंभामध्ये ते सहभागी होणार आहेत.

****

देशातल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये जलदगती ब्रॉडबॅण्ड इंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या भारतनेट या योजनेच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्याचा शुभारंभ आज नवी दिल्लीत करण्यात आला. दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद, मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर आणि विविध राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री यावेळी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या योजनेद्वारे येत्या मार्च २०१९ पर्यंत एकूण दीड लाख ग्रामपंचायतींना ब्रॉडबॅण्ड सेवेनं जोडण्यात येणार आहे.

****

आंध्रप्रदेशात कृष्णा नदीत नाव बुडाल्यानं जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. या घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांसोबत आपण असल्याचं पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे. विजयवाडानजीक इब्राहिमपट्टनम इथं काल ही दुर्घटना घडली.

****

आरोग्य मंत्री कालीचरण सराफ आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांशी आठ तास चाललेल्या चर्चेनंतर काल रात्री राजस्थानमधल्या सेवारत डॉक्टरांनी त्यांचा संप मागे घेतला. आठवडाभर चाललेल्या संपानंतर, नऊ हजाराहून जास्त डॉक्टर्स आज पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. १० हजार रुपयांचं `ग्रेड पे` आणि थकबाकीच्या मागणीसह डॉक्टरांच्या सर्व ३३ मागण्या सरकारनं मान्य केल्याची माहिती डॉक्टरांच्या संघटनेचे अध्यक्ष अजय चौधरी यांनी दिली.  

****

दिल्ली आणि सभोवतालच्या परिसरात आज धुक्याच्या वातावरणात किंचित सुधारणा झाली, मात्र अद्यापही हवेच्या गुणवत्तेत पुरेशी सुधारणा झालेली नाही. सकाळी सहा वाजता हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ४७९ एवढा होता, अशी माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिली आहे. या निर्देशांकाची कक्षा शून्य ते ५०० अशी असून, निर्देशांकाची ५०० ही पातळी हवा सर्वाधिक खराब असल्याचं सूचित करते. आज पहाटे साडेपाच वाजता दृश्यमानता ३०० ते ५०० मीटर इतकी असल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. हवेच्या गुणवत्तेत उद्यापासून लक्षणीय सुधारणा होईल असा विभागाचा अंदाज आहे.

****

भारतीय चलनातल्या बनावट नोटा बदलून देण्याचं आश्वासन देत लोकांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीला राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयएनं ताब्यात घेतलं आहे. ठाण्याचा रशीदखान, साताऱ्याचा गगनकुमार व्यास आणि पालघरचा अहमद अन्सारी या तिघांना काल राजस्थानमधून ताब्यात घेतलं असून, मुंबईत दोन तर कोल्हापुरात एका ठिकाणी शोध मोहीम राबवली असल्याचं एनआयएनं सांगितलं. ही टोळी दीर्घ काळापासून महाराष्ट्र, दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये कारवाया करत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.



****

ऊस दर निश्चित करण्यासाठी आज पुणे इथं सोलापूर जिल्ह्यातले सर्व साखर कारखानदार आणि सर्व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. मात्र ऊस दराबाबत या बैठकीत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे ऊस दर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.

पंढरपूर इथंही ऊस दरवाढीच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचं आंदोलन सुरु आहे.

****

अमेरिकेतल्या ए टी पी चॅलेंजर्स टेनिस स्पर्धेमध्ये भारताच्या लिएंडर पेस - पुरव  राजा जोडीनं  नोव्हिल  चॅलेंजर्स पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. काल रात्री झालेल्या अंतिम सामन्यात  त्यांनी  जेम्स सिरेटनी - जॉन पॅट्रिक या अमेरिकन -ऑस्ट्रेलियन जोडीचा ७-६, ७-६ असा  पराभव केला.

*******

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...