Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 15 November 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५
नोव्हेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.
*******
- राज्यातल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये सिंचन क्षमता निर्माण करण्यासाठी दहा हजार कोटी रूपयांच्या १०७ प्रकल्पांचं काम पूर्ण करण्यास केंद्र सरकारची तत्वतः मंजुरी
- तीन महिन्यात परवाना न घेणाऱ्या हॉटेल आणि रेस्टॉरंटसना टाळे ठोकण्याचा अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा इशारा
- जालना जिल्ह्यातल्या ३६ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित
आणि
- औरंगाबादमधल्या गॅस्ट्रोची लागण झालेल्या छावणी परिसराला तात्काळ शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
****
मराठवाड्यातल्या
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आणि राज्यातल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात
सिंचन निर्माण करण्याची क्षमता असणाऱ्या १०७ प्रकल्पांचं काम पूर्ण करण्यासाठी राज्यानं सादर केलेल्या
प्रस्तावास केंद्र
सरकारनं तत्त्वत: मान्यता दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी दिली. या मान्यतेमुळे पुढील दोन
वर्षात या प्रकल्पांसाठी दहा हजार कोटी रुपये राज्याला
प्राप्त होणार असल्याचं
ते म्हणाले.
****
तीन महिन्यात परवाना न घेणाऱ्या हॉटेल आणि रेस्टॉरंटसना
टाळे ठोकण्याचा इशारा अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण- एफएसएसआयनं दिला आहे. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवनकुमार अग्रवाल यांनी काल नवी
दिल्लीत ही माहिती दिली. ज्या संस्था मोफत अन्नछत्र चालवतात त्यांनादेखील हा नियम लागू
असणार आहे. छोट्या-मोठ्या किरकोळ विक्रेत्यांना आणि रस्त्यांवर विक्री करणाऱ्यांना
मात्र या नियमातून वगळण्यात आलं आहे.
****
देशाचे
पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त काल ठिकठिकाणी त्यांना
अभिवादन करण्यात आलं. यानिमित्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते काल राष्ट्रीय
बाल कल्याण पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातल्या तीन पुरस्कारांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन
केलं.
बाल दिनही
काल मराठवाड्यासह राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबई इथं महाराष्ट्र
राज्य जवाहर बालभवन मंडळच्या वतीनं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भावी आयुष्य निकोपपणे
घालवण्यासाठी मुलांनी आयुष्यभर त्यांची निरागसता जोपासली पाहिजे, असं मत शालेय शिक्षणमंत्री
विनोद तावडे यांनी यावेळी व्यक्त केलं. औरंगाबाद इथंही बाल दिनानिमित्त विविध स्पर्धांचं आयोजन
करण्यात आलं होतं.
स्वच्छ भारत अभियानाला
गती देण्यासाठी बालदिनाच्या निमित्तानं लातूर जिल्ह्यात एक अभिनव कल्पना राबवण्यात आली. जिल्ह्यातल्या
७० हजार विद्यार्थ्यांनी सुदृढ आरोग्यासाठी आपल्या पालकांना शौचालय
बांधकाम करून देण्याचं भावनिक आवाहन करणारं पत्र लिहीलं आहे.
याविषयी माहिती देत आहेत आमचे वार्ताहर…
पत्रात
जे आव्हान केलं आहे त्यात म्हटलं आहे. प्रिय आई बाबा आज बालदिन आहे. तुम्ही जगातील
सर्वात छान आई बाबा आहात. माझे आरोग्य चांगले राहण्यासाठी माझी एक मागणी आहे. फक्त
शौचालय बांधून द्या. अशी भावना या पत्रात व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील
स्वच्छतेची चळवळ अधिक गतीमान होण्यासाठी मदत नक्की होईल असा विश्वास प्रभारी मुख्य
कार्यकारी अधिकारी महेश कुमार मेघमाळे यांनी व्यक्त केला आहे.
****
माजी मंत्री नारायण राणे यांच्या राजीनाम्यामुळं रिक्त
झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी येत्या सात डिसेंबरला निवडणूक होणार आहे. २७ नोव्हेंबरला
अर्ज दाखल करता येणार असून ३० नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.
****
येत्या
२५ नोव्हेंबरपर्यंत सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही तर हल्लाबोल आंदोलन करण्याचा
इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिला आहे. ते काल मुंबईत वार्ताहर
परिषदेत बोलत होते. सरकारची कर्जमाफी योजना नसून कर्जवसुलीची योजना आहे अशी टीका पवार
यांनी यावेळी केली.
****
जालना जिल्ह्यातल्या ३६ कृषी सेवा केंद्रांचे परवाने कृषी विभागानं काल निलंबित केले.
यवतमाळ इथं कीटकनाशक फवारणीनंतर काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर
जालना कृषी विभागानं कृषी सेवा केंद्रांची
तपासणी सुरू केली आहे. आतापर्यंत केलेल्या तपासणीमध्ये जवळपास १०० कृषीसेवा केंद्रांमध्ये
कीटकनाशक विक्रीच्या नियमांचं पालन होत नसल्याचं समोर आल्यानंतर कृषी विभागानं ही कारवाई
केली. ५० कृषी सेवा केंद्रचालकांना नोटीसा बजावण्यात आल्याचं जिल्हा
परिषदेचे कृषी विकास अधिकारी हरिश्चंद्र झनझन यांनी आकाशवाणी प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं.
****
औरंगाबाद
इथल्या गॅस्ट्रोची
लागण झालेल्या छावणी परिसराला तात्काळ शुद्ध पाण्याचा पुरवठा
करण्याचा आदेश जिल्हाधिकारी
नवल किशोर राम यांनी दिला आहे. दूषित पाण्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर
नियंत्रण मिळवण्यासाठी घेण्यात आलेल्या आपत्कालीन बैठकीत ते काल बोलत होते. तत्पूर्वी
जिल्हाधिकाऱ्यांनी रूग्णालयात जाऊन रूग्णांची भेट घेतली तसंच पाणीपुरवठा करणाऱ्या
जलवाहिनीची पाहणी केली. प्रशासनानं या भागातल्या पिण्याच्या
पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून, रूग्णांची संख्या जास्त असली तरी परिस्थिती
नियंत्रणात असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे
****
मागासवर्गीय समाजतल्या सर्व
घटकांना काँग्रेसकडे वळवण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती पक्षाच्या अनुसूचित जाती
विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांनी दिली. बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई
इथं ते काल वार्ताहरांशी बोलत होते. विभागाच्यावतीनं सामाजिक परिवर्तन हाती घेण्यात
आल्याचं त्यांनी सांगितलं. भाजपा सरकारच्या काळात या समाज घटकावर अन्याय झाला असल्याची
टिका त्यांनी यावेळी केली.
****
शेतकऱ्यांच्या
विविध मागण्यांसाठी उस्मानाबाद लोकसभा युवक काँग्रेसच्यावतीनं काल आंदोलन करण्यात आलं.
शेतकऱ्यांचा शेतमाल हमीभावानं सरसकट खरेदी करावा, ऑनलाईन शेतमाल नोंदणी आणि शेतमाल
खरेदीच्या जाचक अटी रद्द कराव्या आदी मागण्या करत आंदोलनकर्त्यांनी नाफेडच्या कार्यालयाला
टाळं ठोकलं तसंच मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात
फुलंब्री इथल्या भोईदेव शिक्षण संस्थेत नोकरीला लावण्याचं आमिष दाखवत ४६ लाख
रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी, चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला
आहे. संस्थाचालक राजेंद्र वानखेडे यांच्यासह त्यांच्या कुटुबियांनी २०१४ ते २०१६
या कालावधीत संस्थेत शिक्षक, शिपाई आदी पदांसाठी नोकरी
देण्याचं अनेकांना आमिष दाखवून फसवणूक
केल्याची तक्रार नांदेडचे माजी सैनिक दत्ता चोपवाड यांनी दाखल केल्यानंतर वानखेडे
कुटुंबियांवर गुन्हा दाखल दाखल करण्यात आला.
****
क्रांतीगुरू
लहुजी साळवे यांची २२३वी जयंती काल औरंगाबाद इथं उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातल्या बळीराम पाटील शाळेजवळील क्रांतीगुरू लहुजी साळवे चौकातल्या पुतळ्यास महापौर नंदकुमार
घोडले, उपमहापौर विजय औताडे यांनी पुष्पहार अर्पण करून
अभिवादन केले. यावेळी जिल्हा जयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांसह विविध सामाजिक
संघटना आणि मान्यवरांची उपस्थिती होती.
****
जालना जिल्ह्याच्या
घनसावंगी तालुक्यातल्या दैठणा गावात इंजिन दुरुस्त करण्यासाठी विहिरीत उतरलेल्या पिता-पुत्रासह
तिघांचा मृत्यू झाला. काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. इंजिन दुरुस्त
करत असतांना इंजिनच्या धुरामुळे तिघांचा श्वास
गुदमरला आणि त्यात ते मरण पावले. या तिघांना वाचवण्यासाठी गेलेले अन्य तिघेजण जखमी
झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
****
हिंदी चित्रपट सृष्टीवर आपला ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ
अभिनेत्री श्यामा यांचं काल मुंबईत निधन झालं. त्या ८२ वर्षांच्या होत्या. श्यामा यांनी
सुमारे १७५ हून अधिक चित्रपटातून भूमिका केल्या.
****
अमृतसरहून नांदेडला येणारी
सचखंड एक्स्प्रेस
ही गाडी दहा तास उशिरा आल्यामुळे नांदेडहून अमृतसरकडे जाणारी सचखंड एक्स्प्रेस ही
गाडी आज सकाळी साडेनऊ ऐवजी दुपारी दीड वाजता सुटेल असं दक्षिण मध्य रेल्वेच्या
नांदेड कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
*******
No comments:
Post a Comment