Wednesday, 15 November 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 15.11.2017 11.00AM

आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
१५ नोव्हेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता
****
नऊ हजार कोटी रुपयांचं कर्ज चुकवून ब्रिटनमध्ये पळून गेलेला मद्य व्यावसायिक विजय मल्ल्या, याचं प्रत्यार्पण केल्यास त्याला पूर्ण सुरक्षा दिली जाईल आणि त्याच्या जिवाला धोका असणार नाही, असं प्रतिज्ञापत्र भारताकडून ब्रिटनच्या न्यायालयाला देण्यात येणार आहे.ब्रिटनच्या न्यायालयात मल्ल्याच्या प्रत्यार्पणाच्या कार्यवाहीबाबतची सुनावणी येत्या चार डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
*****
दक्षिण सुदान सारख्या हिंसाचारग्रस्त देशात केलेली समर्पित सेवा आणि दिलेलं बलिदान यासाठी भारताच्या एक हजार शांतीदूतांना, संयुक्त राष्ट्र पदकानं सन्मानित करण्यात येत असल्याची घोषणा संयुक्त राष्ट्रसंघानं केली आहे. जगभरात शांतता, मानव सेवा आणि आपत्ती निवारण अभियानासाठी या शांतीदूतांची नेमणूक करण्यात येते.
*****
केंद्रीय मंत्रीमंडळानं राज्यातल्या रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले असल्यानं राज्यातल्या रेल्वेमार्ग आणि रस्त्यांच्या कामाला गती येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. राज्यात वर्धा-नांदेड, परळी-बीड,नगर-बीड-परळी,गडचिरोली-वडसा देसाईगंज या रेल्वेमार्गांचं काम लवकरच सुरु होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मनमाड- इंदौर, या महाराष्टृ आणि मध्यप्रदेशमधून जाणाऱ्या नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गाच्या कामाला मंजुरी देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं .राज्यात सांगली आणि नाशिक या ठिकाणी ड्राय पोर्ट उभारण्यास केंद्रीय परिवहन मंत्रालयानं मंजुरी दिली असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
*****

पुणे जिल्ह्यातल्या आळंदी इथे कार्तिकी यात्रेनिमित्त राज्यभरातल्या भाविकांची गर्दी झाली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांच्या सातशे बावीसाव्या संजीवन समाधी सोहळ्याला आळंदीत सुरुवात झाली आहे. एकादशीच्या महापूजेला काल रात्री बारा वाजता सुरुवात झाली आणि नंतर अभिषेक आणि दूध आरती करण्यात आली.
*****
हिंगोली ग्रंथोत्सव २०१७, या दोन दिवसीय ग्रंथमहोत्सवाचं काल हिंगोली इथं उद्घाटन झालं.जिल्ह्यातल्या नागरिकांना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ आणि साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं या उत्सवाचं आयोजन करण्यात आल्याचं सहायक ग्रंथालय संचालक अ.मा.गाडेकर यांनी सांगितलं.
*****
पडिक जमिनीवरही येऊ शकणाऱ्या बांबू या पिकाला उसाप्रमाणे भाव देण्याची शासनाची तयारी असून, अमरावती, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यातल्या शेतक-यांनी बांबू लागवडीवर लक्ष केंद्रित करावं, असं आवाहन केंद्रीय परिवहन मंत्री नीतिन गडकरी यांनी केलं आहे. नागपूर इथल्या ॲग्रोव्हिजन या कृषी प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी ते काल बोलत होते.
*****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 12 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...