Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 16 November 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६
नोव्हेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.
*******
- अहमदनगर जिल्ह्यात ऊस दरासाठीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर ऊस उत्पादकांना दोन हजार ५१५ रूपये प्रतिटन पहिली उचल देण्यास मान्यता; आंदोलन मागे घेण्याची घोषणा
- ऑनलाइन नोंदणी केलेल्या ८० टक्के शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम ह्या महिन्याच्या अखेरीस त्यांच्या खात्यात जमा केली जाईल- सहकार मंत्री सुभाष देशमुख
- भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यास पाच कोटी रूपयांपर्यंत खर्च करण्याची तयारी दर्शवल्याच्या कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांचा
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर
आरोप
आणि
- भारत - श्रीलंका यांच्यात आजपासून कोलकाता इथं पहिला क्रिकेट कसोटी सामना
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या ऊस
दरासाठीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागताच, काल प्रशासनानं कारखानदार आणि आंदोलकांची
बैठक घेऊन या प्रश्नावर समाधानकारक तोडगा काढला. यानुसार आता या ऊस उत्पादकांना दोन
हजार ५१५ रूपये प्रतिटन पहिली उचल देण्यास मान्यता देण्यात आली आहे, त्यामुळे हे आंदोलन
मागे घेण्यात आल्याचं आंदोलकांच्यावतीनं जाहीर करण्यात आलं.
मात्र तत्पूर्वी ऊस उत्पादक
शेतकरी कृती समिती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीनं, ऊस दरासाठी सुरू केलेल्या
या आंदोलनाला, काल अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव तालुक्यात हिंसक वळण लागल्यामुळे वातावरण
तणावपूर्ण बनलं. पैठण-शेवगाव रस्त्यावर घोटण, खानापूर, कऱ्हेटाकळी, एरंडगाव आणि कुडगाव
इथं आंदोलनकर्त्यांनी काल रस्ता रोको आंदोलन करत काही ठिकाणी जाळपोळ केली. आंदोलकर्त्यांना
पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूर आणि लाठीमाराचा वापर केला. यात पैठण तालुक्यातल्या
तेलवाडी गावातले दोन शेतकरी जखमी झाले.
या हिंसक आंदोलनाची गांभीर्यानं
दखल घेत साखर आयुक्तांनी काल सायंकाळी तातडीनं बैठक घेवून यावर तोडगा काढला. या बैठकीत
उसाला दोन हजार ५१५ रूपये प्रतिटन याप्रमाणे पहिली उचल आणि ७०: ३० पद्धतीनुसार पुढील
भाव देण्याचं प्रशासनाच्यावतीनं मान्य करण्यात आलं. कार्यकर्त्यांवरील दाखल गुन्हे
मागं घेण्याचं आश्वासनही प्रशासनानं बैठकीत दिल्यामुळं आंदोलन स्थगीत झाल्याची माहिती
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिली.
दरम्यान, उसाच्या किमान आधारभूत
मूल्यामध्ये केंद्र सरकारनं यावर्षी दोनशे पन्नास रुपयांची वाढ केली असून, साखर कारखान्यांनी
उसाला हा भाव द्यावा, यावर सरकार ठाम असल्याचं सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी म्हटलं
आहे. हमीभावापेक्षा कमी दर देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले.
****
अहमदनगर जिल्ह्यात शेवगाव
इथं शेतकऱ्यांवर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील
यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी असल्याचं त्यांनी
म्हटलं आहे. आंदोलन हाताळण्यात प्रशासनाला अपयश आल्याचा आरोप करुन या घटनेची चौकशी
करण्याची आणि दोषींविरूद्ध तातडीनं कारवाई
करण्याची मागणी त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नांवर शासन गंभीर नाही.
कर्जमाफीच्या मुद्द्यावरून हे अधिक स्पष्ट झालं असून शेतकऱ्यांचा सरकारच्या विरोधातला
उद्रेक आता रस्त्यावर आला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली. विधान
परीषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीदेखील या घटनेचा निषेध करत चौकशीची मागणी
केली आहे.
****
ऑनलाइन
नोंदणी केलेल्या ७७ लाख शेतकऱ्यांपैकी जवळपास ८० टक्के शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम
ह्या महिन्याच्या अखेरीस त्यांच्या खात्यात जमा केली जाईल, असं राज्याचे सहकार मंत्री
सुभाष देशमुख यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. आघाडी सरकारच्या काळात
बँकांच्या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली गेली, त्याला तब्बल ८ महिन्याचा
कालावधी लागला होता, मात्र युती सरकारमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जलद गतीनं
शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असा दावा देशमुख यांनी यावेळी केला.
****
आपण भारतीय जनता पक्षात आल्यास,
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाच कोटी रूपयांपर्यंत खर्च करण्याची तयारी दर्शवली
असल्याचा आरोप कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. भाजपत आल्यास आपल्या मतदारसंघाची कामं करण्याचं
आश्वासनही पाटील यांच्याकडून दिलं गेलं असल्याचं जाधव यांनी काल प्रसार माध्यमांशी
बोलतांना सांगितलं. आपण शिवसैनिक असून शिवसेनेतच खुश आहोत असं जाधव म्हणाले.
****
नोटाबंदी, जीएसटी आणि शेतमालाचे
पडलेले भाव यामुळे शेतकरी, मजूर, व्यापारी तसंच सर्वसामान्य नागरिकांमध्ये सरकारबद्दल
तीव्र असंतोष खदखदत असून, २०१९ च्या निवडणुकीत भाजपला सत्ता घालवावी लागेल, असे चित्र
असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. गडचिरोली
इथं ते काल वार्ताहरांशी बोलत होते. सध्या राष्ट्रीय कृषी विकासाचा दर ३ ते सव्वा तीन
टक्केच आहे, परंतु वस्तुस्थिती झाकण्यासाठी केंद्र सरकार निकषांत बदल करुन कृषी विकास
दर जास्त असल्याचा देखावा करीत आहे. असा आरोप त्यांनी यावेळी केला. सरकार पडले तर आम्ही
कुणालाही पाठिंबा देणार नाही, तसंच मुदतपूर्व निवडणुकीची शक्यता नसल्याचं त्यांनी स्पष्ट
केलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या आष्टी
गाव समुहामध्ये केंद्र शासनाच्या रुरबन प्रकल्पाअंतर्गत कृषी माल उद्योग प्रक्रिया
सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती, पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर
यांनी दिली. या प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालावर प्रक्रिया करण्यासाठी
उद्योग समूह स्थापन करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. यात एकूण ५९ प्रकल्पांचा
समावेश असणार आहे, असं ते म्हणाले.
****
शौचालयं बांधण्याच्या कामात
राज्यात नांदेड जिल्ह्याचा पहिला क्रमांक आहे. नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या
सात महिन्यांच्या कालावधीत एक लाख बारा हजार दोनशे तीन शौचालयं बांधण्यात आली आहेत.
याबाबतीत राज्यात बीड जिल्हा दुसऱ्या आणि सोलापूर
जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. नांदेड तालुका ‘उघड्यावर शौचापासून मुक्त’ झाला असल्याचंही
काल घोषित करण्यात आलं. हा लौकिक कायम राहण्यासाठी गावागावांमधून गुड मॉर्निंग पथकांद्वारे
जनजागृती करणार असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी म्हटलं आहे.
****
जालना शहरातल्या दवाबाजार
परिसरात असलेल्या, इमारतीत बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेला, २ लाख, १८ हजार, ७२४ रुपयांच्या औषधांचा साठा, अन्न आणि औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी काल जप्त केला.
****
नांदेड जिल्ह्यात मूग, उडीद आणि सोयाबिन खरेदी करण्यासाठी
देगलूर, धर्माबाद आणि बिलोली इथं तर फक्त सोयाबीन खरेदीसाठी नांदेड, भोकर, उमरी, हदगाव, लोहा, नायगाव
आणि मुखेड इथं खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत.
भारतीय राष्ट्रीय कृषी आणि सहकारीता विपणन महासंघानं ही खरेदी केंद्र सुरू
केली असल्याची पणन महासंघाच्यावतीनं सांगण्यात आलं आहे.
****
भारत आणि श्रीलंका यांच्यात
आजपासून तीन सामन्यांच्या क्रिकेट मालिकेस प्रांरभ होत आहे. कोलकाता इथल्या ईडन गार्डन
मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे.
****
मांजरा परिवारातील साखर कारखाने
चालू गळीत हंगामात ऊसाला पहिली उचल म्हणून दोन हजार दोनशे रूपये प्रति मेट्रीक टन रक्कम
देणार आहे. आमदार दिलीपराव देशमुख यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यां
समवेत झालेल्या बैठकीत काल ही घोषणा केली.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठात योगशास्त्र विभाग सुरू होत आहे. येत्या शुक्रवारी, सतरा तारखेला,
केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत या विभागाचं उद्घाटन होणार
आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात
येत्या अठरा तारखेला, जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली
समाधान शिबिर होणार आहे. महाराजस्व अभियांतर्गत होणाऱ्या या शिबिरामध्ये, औसा तालुक्यातल्या
शेतकरी आणि नागरिकांच्या, शासकीय विभागांशी संबंधित तक्रारी सोडवण्यात येणार आहेत.
****
घराच्या
विद्युत मीटरचे पीटीआर देण्यासाठी तीन
हजार रूपयांची लाच घेताना बीड तालुक्यातील
कुटेवाडी इथला ग्रामसेवक जगन्नाथ टूले याला लाच लुचपत प्रतिबंधक
विभागानं काल
पंचायत समिती परिसरात अटक केली. इंदिरा आवास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलात विद्युत मीटर बसवण्यासाठी लागणारे पीटीआर
देणासाठी टुले याने ५ हजार रूपयांची मागणी केली होती.
****
अमृतसरहून येणारी सचखंड जलदगती रेल्वेगाडी
बारा तास उशिरा आल्यामुळे नांदेडहून अमृतसरला जाण्यासाठी सुटणारी सचखंड जलद गती गाडी,
आज नांदेड इथून दुपारी दीड वाजता सुटणार आहे.
*******
No comments:
Post a Comment