Thursday, 16 November 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 16.11.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 November 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ नोव्हेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

केंद्रीय मंत्रिमंडळानं डाळींच्या निर्यातीवर घातलेली बंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली. एकात्मिक बाल विकास योजनेत असलेल्या सगळ्या उपयोजना कायम ठेवण्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ११ कोटींहून अधिक लहान मुलं, मुली आणि महिलांना या योजनांचा लाभ होतो. पंतप्रधान आवास योजनेत व्याज सवलतीसाठी पात्र असलेल्या मध्यम उत्पन्न गटासाठी घराच्या प्रत्यक्ष उपयोगात येणाऱ्या क्षेत्रफळात वाढ करण्याचा, तसंच जीएसटीअंतर्गत कर कपातीचा लाभ प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय नफेखोर विरोधी प्राधीकरण स्थापन करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे.

****

गुंतवणुकीसाठी उद्योजकांची महाराष्ट्राला सर्वाधिक पसंती असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुणे जिल्ह्यातल्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या देशातल्या पहिल्या इंडस्ट्रियल पार्कचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. हायर इंडिया इंडस्ट्रियल पार्कच्या माध्यमातून या परिसरात रोजगार निर्मितीबरोबरच विविध करांच्या रूपाने महसुलातही मोठी वाढ होणार आहे. तसंच, या परिसरातल्या पायाभूत सुविधांमध्येही आमूलाग्र बदल होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

****

राज्यातल्या भटक्या आणि विमुक्त जाती जमातीतल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारणार असल्याची माहिती विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि इतर मागास प्रवर्ग मंत्री राम शिंदे यांनी दिली आहे. सोलापूर इथं ते आज वार्ताहरांशी बोलत होते. तांडा वस्ती सुधार योजनेला जास्तीत जास्त निधी देण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

****

ज्येष्ठ पत्रकार सोमनाथ पाटील यांचं आज मुंबईतल्या खासगी रुग्णालयात अल्पशा आजारानं निधन झालं. ते ६४ वर्षांचे होते. शासकीय सेवेतून बाहेर पडून पत्रकारितेत आपला ठसा उमटवणाऱ्या पाटील यांनी, विस्तारित मुंबई तसंच आंतरराष्ट्रीय राजकारणावर प्रदीर्घ लेखन केलं आहे.

****

नांदेड रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक डॉ.ए.के.सिन्हा यांनी आज पूर्णा, परभणी आणि गंगाखेड रेल्वे स्थानकांना भेट देऊन त्याठिकाणी सुरु असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. पूर्णा रेल्वे स्थानकावर मालगाडी परिक्षण केंद्र तयार करण्यात आलं असून, त्याच्या आधुनिकीकरणाच्या कामाचीही त्यांनी पाहणी केली. परभणी रेल्वे स्थानकावर सरकत्या जिन्याचं काम डिसेंबर महिन्यात पूर्ण होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. परभणी स्थानकातिसरा पादचारी पूल, नवीन उपाहारगृह, गंगाखेड स्थानकात प्रतिक्षालय, दिव्यांगांसाठी स्वच्छतागृह, तसंच सीसीटीव्ही यंत्रणा बसवणार असल्याचं सिन्हा यांनी यावेळी सांगितलं.

****

औरंगाबाद इथं राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयासमोर वृत्तपत्रांसंबंधी आणि पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करण्यात आलं. पत्रकार पेन्शन योजना, छोट्या वृत्तपत्रांचे जाहिरात विषयक आणि अन्य प्रश्न, पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी आणि मजीठिया आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आदी मागण्यांचं निवेदन पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, मराठी पत्रकार परिषद तसंच विविध पत्रकार संघटनांच्या वतीनं विभागीय आयुक्त डॉक्टर पुरूषोत्तम भापकर यांना देण्यात आलं.

कोल्हापूर इथंही झालेल्या या आंदोलनात महाराष्ट्र मराठी पत्रकार संघ, कोल्हापूर प्रेस क्लबसह बेळगावातले पत्रकार सहभागी झाले होते.

****

औरंगाबाद जिल्हा माहिती कार्यालय आणि महात्मा गांधी मिशन वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या वतीनं ‘माध्यमांसमोरील आव्हानंया विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रादेशिक भाषेच्या माध्यमांच्या श्रोत्यांत वाढ होताना दिसत असल्याचं मत, लातूरच्या विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक यशवंत भंडारे यांनी व्यक्त केलं.
लातूरच्या जिल्हा माहिती कार्यालयातही राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त प्राचार्य शिवशंकर पटवारी यांचं व्याख्यान झालं.

****

औरंगाबाद शहरातल्या छावणी परिसरात गॅस्ट्रोच्या साथरोगासंबंधी आरोग्य सहसंचालकांनी आज बैठक घेतली. गॅस्ट्रोवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाणी गळतीचा शोध घेण्याच्या आणि पाण्याचं निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

****

चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूनं महिला एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात सिंधूनं चीनच्या युए हानचा पराभव केला.     

****

भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलकाता इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज पहिल्या दिवसअखेर भारताच्या ११ षटकं पाच चेंडूंत तीन बाद १७ धावा झाल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे आज निर्धारित षटकं खेळता आली नाही.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 11 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...