Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 November 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ नोव्हेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
बुलडाणा
जिल्ह्यात खामगाव इथल्या बँक ऑफ महाराष्ट्रचे ग्राहक सेवा प्रतिनिधी भागवत साबळे यानं,
दोनशे शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून जवळपास ३६ लाख रुपये लंपास केले आहेत. शेतकऱ्यांचा
आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी संलग्न करून देण्याच्या बहाण्याने साबळे यानं
हे पैसे लुबाडल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी साबळे याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा
दाखल झाला असून, विशेष तपास पथक - एसआयटी मार्फत या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी
संबंधित शेतकऱ्यांकडून केली जात असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
रिजर्व्ह
बॅंकेच्या ताज्या आकडेवारीनुसार संपूर्ण देशभरात रोखरहित व्यवहारांमध्ये चढता कल दिसून
आला आहे. सप्टेंबर महिन्यात सुमारे १२५ लाख कोटी रुपयांचे रोखरहित व्यवहार झाले, ऑगस्ट
महिन्याच्या तुलनेत या व्यवहारांच्या प्रमाणात साडे १३ टक्के वाढ दिसून आली. या आर्थिक
वर्ष अखेरपर्यंत रोखरहित व्यवहारांचं प्रमाण २५ बिलियन रुपयांपर्यंत नेण्याचं, केंद्र
सरकारचं उद्दीष्ट दृष्टीपथात असल्याचं मत अर्थतज्ज्ञांनी नमूद केलं आहे. इंटरनेट बँकिंग,
भारतीय राष्ट्रीय देयक महामंडळाची इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धती, भीम, ई व्यापार, कार्डवर
आधारित व्यवहार, आधार संलग्न देयकं आदींवरुन हा कल असाच वाढत राहण्याचे संकेत आहेत.
****
सर्वोच्च
न्यायालय तसंच उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली
असून, वेतनवाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे
महासचिव तसंच उच्च न्यायालयांच्या महानिबंधकांना पाठवलेल्या पत्रात केंद्रीय विधी मंत्रालयानं
ही माहिती दिली. महागाई भत्ता १३६ टक्क्यांवरून १३९ टक्के करण्यात आला असून, तो एक
जुलैपासून पूर्वलक्षी प्रभावानं लागू होणार असल्याचं, या पत्रात म्हटलं आहे. वेतनवाढीच्या
प्रस्तावाला येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळाची मान्यता मिळण्याची शक्यता असून, हे
विधेयक संसदेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात सादर होण्याची शक्यता, याबाबतच्या वृत्तात
वर्तवण्यात आली आहे.
****
‘राष्ट्रीय
परीक्षा मंडळा’च्यावतीनं जानेवारी-२०१८ मध्ये वैद्यकीय क्षेत्रातल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या
प्रवेशासाठी ‘नीट-पीजी’ परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र सदरील परीक्षेसाठी यंदा औरंगाबाद
केंद्र वगळण्यात आलं आहे. त्यामुळे ‘नीट-पीजी’ परीक्षेसाठी औरंगाबादला केंद्र देण्यात
यावं, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केंद्रीय मनुष्यबळ
विकास मंत्री प्रकाश जावडेकर, तसंच राष्ट्रीय परीक्षा मंडळाकडे केली आहे. मराठवाडा
विभागात नांदेड हे एकमेव केंद्र आहे, त्यामुळे औरंगाबाद इथंही केंद्र देण्याचा विचार
करावा, असं चव्हाण यांनी यासंदर्भात लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या
विविध विकास कामांच्या नियोजनासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था - इस्रो ची मदत घेण्यात
येत आहे. त्याअंतर्गत सिन्नर तालुक्यातल्या ब्राह्मणपाडे इथं इस्रो मार्फत खड्ड्यांचं
सर्वेक्षण करण्यास प्रारंभ झाला आहे. येत्या तीन ते चार महिन्यात जिल्ह्याचं सर्वेक्षण
पूर्ण होणार असल्याची माहिती नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. राज्यात इसरोच्या
मदतीनं नियोजन करण्याचा हा पथदर्शी प्रकल्प असून, तंत्रज्ञानाच्या मदतीनं सर्वेक्षणाचं
काम अचूक आणि वेळेत होणार असल्याचं गोडसे यांनी सांगितलं.
****
मराठी रंगभूमी
दिन आज साजरा होत आहे. या अनुषंगानं ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं
आहे. औरंगाबाद इथं आज सायंकाळी परिवर्तन संस्थेच्या वतीनं औरंगाबाद इथले लेखक तसंच
गीतकार अरविंद जगताप यांना परिवर्तन नाट्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
यावेळी वेदातल्या संवादसुक्तांवर आधारित वेदरंग या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं
आहे. शहरातल्या तापडिया नाट्यमंदिरात सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
****
लातूर कृषी
उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी अत्यल्प दरात भोजन उपलब्ध करून दिलं जाणार
आहे. या भोजन कक्ष उभारणीच्या कामाचा शुभारंभ समितीचे सभापती ललितभाई शहा यांच्या हस्ते
करण्यात आला. शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात पोटभर जेवण मिळावं,
यासाठी बाजार समितीनं हा उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. असा उपक्रम राबवणारी
ही मराठवाडयातली एकमेव बाजार समिती आहे.
****
आशिया चषक
महिला हॉकी स्पर्धेचा अंतिम सामना आज जपानमधल्या काकामिगाहारा इथं भारत आणि चीन या
संघादरम्यान होणार आहे. दुपारी तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. उपान्त्य सामन्यात
भारतानं यजमान जपान संघाचा चार दोन असा पराभव केला होता.
**
No comments:
Post a Comment