Thursday, 18 January 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 18.01.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 January 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ जानेवारी २०१८ दुपारी १.०० वा.

****

 अग्नि - पाच या आण्विक बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची आज भारतानं यशस्वी चाचणी घेतली. जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्राची चाचणी आज सकाळी ओडिसातल्या बेटावरुन करण्यात आली. संरक्षण संशोधन विकास संस्था - डीआरडीओनं हे अत्याधुनिक क्षेपणास्त्र विकसित केलं आहे. आणखी काही चाचण्या झाल्यानंतर हे क्षेपणास्त्र सेवेत दाखल केलं जाईल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. 

****

 उद्योजकांनी नवनवीन पद्धतींचा अवलंब करावा, असं आवाहन इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केलं आहे. नेतन्याहू आज मुंबई दौऱ्यावर असून, ताज हॉटेलमध्ये भारत - इस्राईल व्यापार शिखर परिषदेत ते बोलत होते. उद्योग जगतात परिवर्तनासाठी सरकारला अनुकूल स्पर्धात्मक वातावरण तयार करावं लागेल, असं ते म्हणाले. नेतन्याहू मुंबईतल्या ज्यू समाजाचं केंद्र असलेल्या छाबडा हाऊसला भेट देऊन त्याठिकाणी उभारण्यात आलेल्या स्मृतिदालनाचं उद्घाटन करणार आहेत.

****

 सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी आज न्यायालयाच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या चार न्यायमूर्तींची बैठक घेतली. यावेळी सरन्यायाधीशांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

 संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावत या चित्रपटावर बंदी घालण्याच्या गुजरात आणि राजस्थान सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती आणली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत या राज्य सरकारांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला बंदी घातली होती. मात्र न्यायालयाच्या आदेशावरुन आता पद्मावत संपूर्ण देशभरात येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. तसंच इतर कुठल्याही राज्याला अशी बंदी घालता येणार नाही, असंही न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलं आहे.

****

 राष्ट्रीय निवृत्तीवेतन व्यवस्थेत आवश्यक खर्चासाठी काही निधी काढून घ्यायची परवानगी निर्वाह निधी नियामक आणि विकास प्राधिकरण - पी एफ आर डी एनं दिली आहे. घराची खरेदी, गंभीर स्वरुपाच्या आजारावरचे उपचार, मुलांचं उच्च शिक्षण आणि लग्न, या कारणांसाठी निवृत्ती वेतन व्यवस्थेतल्या जमा रकमेपैकी २५ टक्के रक्कम आता काढून घेता येईल. राष्ट्रीय निवृत्ती वेतन व्यवस्थेत सहभागी झाल्यानंतर तीन वर्षांनी आणि जास्तीत जास्त तीन वेळा या सुविधेचा लाभ घेता येईल, असं पी एफ आर डी एनं काढलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.

****

 नवीकरणीय उर्जेच्या क्षेत्रात सर्वाधिक वेगानं प्रगति करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश असल्याचं ऊर्जा, नवी आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री आर. के. सिंग यांनी म्हटलं आहे. ते अबुधाबी इथं आकाशवाणीशी बोलत होते. नवीकरणीय ऊर्जेच्या क्षेत्रात एक लाख ७५ हजार मेगावॅट वीजनिर्मितीचं देशाचं उद्दिष्ट असून, ते २०२० च्या पूर्वी साध्य होईल, तर पवन ऊर्जा निर्मितीक्षेत्रात ६० हजार मेगावॅटचं लक्ष्य असून, ते निर्धारित वेळेत पूर्ण केलं जाईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

****

 जम्मू काश्मीरमधल्या आर एस पुरा, अर्निया आणि रामगड क्षेत्रातल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर काल रात्री पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात आणि उखळी तोफांच्या माऱ्यात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला, तर चार नागरिक जखमी झाले. या भागातली चकमक आज सकाळपर्यंत सुरु होती.

****

 औरंगाबाद इथं आज पाचव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरूवात होत आहे. चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर, हंसल मेहता, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, स्मिता तांबे, अभिनेते उपेंद्र यांच्या उपस्थितीत सायंकाळी साडे सहा वाजता शहरातल्या प्रोझोन मॉल मधल्या आयनॉक्स चित्रपटगृहात या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. येत्या २१ तारखेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात गाजलेले २७ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. अतनू मुखर्जी दिग्दर्शित आणि मनोज वाजपेयी अभिनीत ‘रुख’ या चित्रपटानं महोत्सवाची सुरुवात होणार आहे.

****

 जालना पोलिसांनी बदनापूरजवळ काल रात्री उशिरा नाकेबंदी करुन, औरंगाबादकडे जाणाऱ्या एका वाहनातून २१ लाख ३५ हजार रुपयांची रोकड जप्त केली. या कारवाईत पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

****

 ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्न इथं सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा जोडीदार फ्रान्सचा एडवर्ड रॉजर वेसेलीन यांनी विजयी सुरुवात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या सामन्यात या जोडीनं अमेरिकेचा रेयान हॅरिसन आणि कॅनडाचा वासेक पोसपिसिल या जोडीचा सहा - दोन, सात - सहा असा पराभव केला. दुसऱ्या एका सामन्यात भारताच्या लिएंडर पेस आणि पुरव राजा या जोडीनं पहिल्या फेरीत जॉर्जियाचा वेसिलास विली आणि ऑस्ट्रियाचा आंद्रेया हैदर या जोडीचा सहा - दोन, सहा - तीन असा पराभव केला.

****

 न्यूझीलंडमध्ये तौरंगा इथं सुरु असलेल्या चार देशांच्या निमंत्रित हॉकी स्पर्धेत, भारताचा दुसरा सामना आज बेल्जियमशी होणार आहे. भारताच्या पुरुष हॉकी संघानं काल जपानचा सहा - शून्य असं दणदणीत पराभव करत विजयी सुरुवात केली.

*****

***


No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...