Friday, 19 January 2018

Text - AIR News Bulletin, Aurnagabad 19.01.2018 - 11.00


   आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१९ जानेवारी २०१८ सकाळी ११.००

****

जम्मू काश्मीरमधल्या आर एस पुरा, अर्निया आणि रामगढ इथल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी सैन्यानं आज सकाळी मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. भारतीय जवानांनीही या हल्ल्याला चोख प्रत्यूत्तर दिलं. या चकमकीत तीन स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला.

****

मुंबईतल्या लोअर परळ भागातल्या एका औद्योगिक इमारतीला काल रात्री आग लागल्याचं वृत्त आहे. सेनापती बापट मार्गावर टोडी मिल परिसरात असलेल्या नवरंग स्टुडिओत ही आग लागली. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. या घटनेत अग्निशमन दलातला एक अधिकारी जखमी झाला. हा स्टु़डिओ गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. दरम्यान, ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याची माहिती अद्यापपर्यंत स्पष्ट झालेली नाही. 

****

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी काल माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांचे पूत्र कार्ती चिदंबरम यांची ११ तास चौकशी केली. संचालनालयानं काल कार्तीला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर व्हायला सांगितलं होतं. यावेळी कार्ती यांना त्यांच्या या प्रकरणातल्या भूमिकेविषयी अनेक प्रश्न विचारण्यात आले आणि त्यांचा जबाब मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत नोंदवण्यात आला.

****

राज्यातल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या शिक्षण विभागात केंद्रप्रमुख पद निर्माण करणं आणि या शाळेतल्या शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गट विमा योजना, कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक असल्याचं, नगर विकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी सांगितलं आहे. या कर्मचाऱ्यांच्या समस्यांसंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रातल्या पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी देणं, पूर्णवेळ प्रशासन अधिकारी नेमणं, रिक्त पदे भरणं आदी मागण्यासंदर्भात राज्य शासन योग्य तो निर्णय घेईल. तसंच या क्षेत्रातल्या शाळांना वीज बिल, पाणी बिल आणि इतर कर, घरगुती दरानं मिळण्यासंदर्भातही पाठपुरावा करण्यात येईल असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 06 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...